Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
¨
बोंड
अळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी
केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करील- केंद्रीय
कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांची
ग्वाही
¨ औद्योगिक वसाहतीत पाच वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास
उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर सवलती देण्याची मुख्यमंत्र्याची घोषणा
¨ गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी
¨ विशाखापट्टणमच्या अंतिम सामन्यात विजय
मिळवत श्रीलंकेविरूद्धची एकदिवसीय क्रिकेट सामन्याची मालिका भारतानं जिंकली.
आणि
¨
दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधुला उपविजेतेपद
****
बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या राज्य
सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही केंद्रीय
कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी दिली आहे. राज्यात कापसावरील बोंड
अळीच्या प्रादुर्भावाबाबत काल नागपूर इथं सिंग यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक
पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे
कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर तसंच उच्च पदस्थ अधिकारी आणि या क्षेत्रातील विविध
मान्यवर उपस्थित होते. याचवेळी पुढच्या वर्षी यासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि
त्यासाठीचे उपाय यासह किटकनाशक फवारणीच्या समस्येंवरही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांना चांगले बियाणे
देण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही
बैठकीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग
घेतला.
****
राज्यात औद्योगिक वसाहतीत जागेचा ताबा
घेतल्यापासून पाच वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर
सवलती देण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ इथं उभारण्यात आलेल्या वस्त्रोद्योग पार्कमध्ये
रेमंड उद्योग समुहाच्या लिनन यार्न आणि कापड निर्मिती द्योगांचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं
जिगाव प्रकल्पासह आठ लघुसिंचन पाटबंधारे प्रकल्पांचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. जिगाव प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही तसंच खारपाण पट्ट्यातल्या शेतीसाठी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय
परिवहन, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री
पांडुरंग फुंडकर यावेळी उपस्थित होते.
****
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या
विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. गुजरातच्या १८२ जागांसाठी नऊ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यात,
तर हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांसाठी गेल्या
महिन्यात नऊ तारखेला मतदान झालं होतं. गुजरात मध्ये ६८
पूर्णांक ४१ शतांश टक्के तर हिमाचल प्रदेशात ७४
पूर्णांक ६१ शतांश टक्के मतदान झालं होतं.
****
दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेमुळे
औरंगाबाद विभागाची भरभराट होईल, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं ‘रोटरी जालना औद्योगिक एक्स्पो २०१७’च्या
समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. मेक इन इंडिया, कौशल्य भारत यासारख्या उपक्रमातून
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. दिल्ली
मुंबई औद्योगिक मार्गिकेमुळे औरंगाबाद आणि जालना हे दोन शहरं येत्या सात ते आठ वर्षात
एक होणार असल्याचं सांगतांना खासदार दानवे म्हणाले…....
औरंगाबाद
आणि जालना हे दोन्ही शहरं हे सात ते आठ वर्षामध्ये
टू-इन-वन सिटी झाल्या शिवाय राहणार नाही. हे दोन्ही शहर एक होणारंच आहे.
कारण. डि.एम.आय.सिटीचा ऐवढा विस्तार आहे. ड्रॅाय फूड होउू राहिलायं, रेल्वेचा
विस्तार होउू राहिलायं. तुमची मागणी राहिल
की, इनटर सिटी लिंकिंग सिटी साठी तुम्हाला मेट्रो रेल्वेची मागणी करावी लागणारं आहे. दोन्ही एक होणार आहे. उद्योग
वाढणार आहे. पुढचा काळ हा जालण्यासाठी अंत्यद चांगला काळ आहे.उद्योगाच्या दुष्टिने
,रोजगाराच्या दुष्टिने आहे.
****
दुग्ध व्यवसायासाठी महादूध योजना महत्त्वाची असून या योजनेला
शासकीय पाठबळाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेड
जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत काल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
पशू, अश्व, शेळी, श्वान, कुक्कुटपालन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी
ते बोलत होते. पशुधन विकासासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जात असल्याचं
त्यांनी सांगितलं.
दरम्यान, खंडोबाच्या या यात्रेला काल मोठ्या प्रमाणात भाविकांनी
हजेरी लावली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आंबेडकरवाद हा महाराष्ट्राचा, भारताचा नसून तो वैश्विक
विचार असल्याचं प्रतिपादन विचारवंत यशवंत मनोहर यांनी केलं आहे. काल नांदेड इथं अखिल
भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेच्या वतीनं पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचं उद्धाटन
करतांना ते बोलत होते. मानवी समुदायाच्या कक्षा
विस्तारणं म्हणजे आंबेडकरवाद होय असं त्यांनी पुढं नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला
मदत दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावानं
झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्ह्यात सुरु असलेल्या पंचनाम्याबाबतच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचं काम सुरु असल्याचं
संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात काल सर्वत्र वेळ अमावास्या उत्साहात साजरी
करण्यात आली. यंदा
पाऊस चांगला झाला असल्यानं सर्वांनी आनंदाच्या वातावरणात एकमेकांसोबत वनभोजनाचा आनंद
घेतला.
*****
औरंगाबाद इथं काल औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठी
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली टी. व्ही.सेंटर परिसरात धरणं आंदोलन करण्यात
आलं.
****
विशाखापट्टणम इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर मात करुन
भारतानं दोन-एक अशा फरकानं ही मालिका जिंकली आहे. कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं
प्रथम श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. श्रीलंकेनं ४५षटकात सर्वबाद २१६ धावा
केल्या. भारतानं हे आव्हान तेहतीसाव्या षटकात आठ गडी राखून पूर्ण करत सामन्यासह मालिका
जिंकली. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला सामनावीर तर शतकवीर शिखर धवनला मालिकावीराचा किताब
देण्यात आला.
****
दुबई
इथं झालेल्या दुबई सुपर सिरीज बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधुला उपविजेतेपद मिळालं आहे. काल झालेल्या अंतिम
सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधुचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव करत
दुबई सुपर सीरीजचं विजेतेपद पटकावलं.
****
आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक
बातमी…..
जालना
जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथले शेतकरी शिवाजी जाधव यांना शेततळ्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत पाच लाख रुपयांचं
अनुदान मिळालं. याविषयी त्यांनी दिलेली ही माहिती –
माझं
नाव शिवाजी काशीनाथ जाधव , मुक्काम माळशेंन्द्रा
तालुका जिल्हा जालना. मि महाराष्ट्र शासंनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत पाच लाख रुपयांचं अनुदान
भेटले.खोद काम करण्यासाठी दिड लाख रुपये व पण्णी टाकण्यासाठी साडेतिन लाख रुपये.हे
खोदकाम करुन मि त्यामध्ये पावसाळ्या मध्ये पाणी साठवून जवळपास एक कोटी लिटर पाणी साठूंनीक
केलेली आहे. त्यापासून माझे जवळपास दहा लाख हेक्कटर क्षेत्र हे वोळीता खाली आलेलं आहे.
त्या ओळीता खाली आलेल्या क्षेत्रामध्ये मि आज रोजी मिरची, कपासी व इतर फळबाग आणि मोसंबी
इतर फळबाग पिके घेतलेली आहे. त्या पासून मला खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि भविष्यात
मला पाणी टणंचाई जाणंवणार नाही.अशी मला अपेक्षा आहे. आणि या पाणी टंचाईवर मात केल्या
मुळं मि महाराष्ट्र शासंनाचे आभार व्यक्त करत आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूरजवळ डोणवाडा पाटी परिसरात काल संध्याकाळी
औरंगाबादकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकनं दोन दुचाकींना धडक दिली, यात एका महिलेसह
दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अन्य एका घटनेत काल
संध्याकाळी जिंतूर इथं साठे चौकात पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या बसनं दुचाकीला धडक दिल्यानं
झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या माळवठा इथल्या
एम.आय.डी सी. मधल्या हळद प्रक्रिया कारखान्यात काल सकाळी आग लागल्यामुळं कारखान्यातल्या
हळद आणि अन्य साहित्याचं जळून मोठं नुकसान झालं. शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं.
*****
No comments:
Post a Comment