Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
Ø गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता
पक्षाला स्पष्ट बहुमत
Ø कर्जमाफीसाठी खुल्या बाजारातून २० हजार कोटी रुपयांचं
कर्ज उभारणीस अनुमती देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
Ø मुंबईत एका फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा
भाजून मृत्यु
आणि
Ø नंदुरबार आणि नवापूर नगरपालिका काँग्रेसकडे, तळोदा आणि
डहाणू नगरपालिका भाजपच्या ताब्यात.
****
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काल झालेल्या मतमोजणीत गुजरातमध्ये भाजपला
सलग सहाव्यांदा सत्ता कायम राखण्यात यश आलं आहे. इथं भाजपनं १८२ जागांपैकी ९९ जागा
मिळवत बहुमत प्राप्त केलं. काँग्रेसला ७७ आणि त्यांच्या मित्र पक्षांना ३ जागा मिळाल्या
असून अन्य अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता बदल होऊन भाजपला बहुमत
मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी भाजपला ४४, तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या. तीन ठिकाणी अपक्ष
उमेदवार विजयी झाले. मात्र या निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, प्रेमकुमार धुमल पराभूत झाले.
हा विजय असामान्य असल्याचं सांगून, बदलासाठी देश तयार असल्याचं, या निकालावरून
दिसून येतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर, विकासाच्या मुद्यावर भाजपला हा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी
यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचं सांगत जनतेचे आभार मानले आहेत. विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेनं पाठिंबा
दिला असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, कर्जमाफीसाठी
३४ हजार, २२ कोटी इतका निधी तातडीनं द्यायचा असून, खुल्या बाजारातून २० हजार कोटी रुपयांचं
कर्ज उभारणीस अनुमती देण्याची मागणी, केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री
दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत काल एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. राज्यात
कर्जमाफी जाहीर केल्यामुळे होणारी आर्थिक तूट दूर करण्याबाबत केलेल्या उपाय योजनांर्गत
सदस्य आनंदराव पाटील यांनी प्रश्न विचारला होता.
****
राज्यातल्या शाळांना पुरवण्यात येणाऱ्या, शालेय पोषक
आहाराच्या धान्य खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून, या प्रकरणाची विशेष तपास
पथका मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, भाजपचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांनी
केली आहे. विधानसभेत यासंदर्भात एका लक्षवेधी सूचने मार्फत त्यांनी काल ही मागणी केली.
****
हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकून मजुरी
घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचं रोजगार हमी मंत्री
जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या
प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. गरज भासल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या
संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
मुंबईत साकीनाका भागात काल पहाटे एका फरसाणाच्या दुकानाला
लागलेल्या आगीत १२ कामगारांचा भाजून मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला. शॉक सर्किटमुळे
ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी कामगार दुकानात
झोपलेले होते.
****
भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती बाळगल्याच्या आरोपावरून
तुरूंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ
या दोघांनाही काल मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं
जामीन नाकारला. यापूर्वी माजी मंत्री भुजबळ यांनी वैद्यकीय कारणावरून जामिन देण्यासाठी
केलेला अर्जदेखील न्यायालयानं फेटाळून लावला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नंदुरबार नगरपालिकेच्या
नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, तर नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदीही
काँग्रेसच्या हेमलता पाटील विजयी झाल्या. तर तळोदा नगरपालिकेत सत्तांतर झालं असून,
नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी विजयी झाले.
पालघर जिल्ह्यातल्या
वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विजयी झाल्या. त्यांनी
भारतीय जनता पक्षाच्या निशा सावरा यांचा पराभव केला. शिवसेनेनं सहा, भाजपनं सहा, काँग्रेसनं
दोन, बहुजन विकास आघाडीनं दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जागा जिंकली. डहाणू नगरपरिषदेच्या
नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे भरत राजपूत विजयी झाले. राजपूत यांनी राष्ट्रवादी
काँग्रेसचे उमेदवार मिहीर शहा यांचा पराभव केला. तर जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी
शिवसेनेचे चंद्रकांत पटेल विजयी झाले आहेत.
****
राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य
करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शालेय शिक्षण
मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी काल तावडे यांची भेट घेऊन त्यांना
निवेदन दिलं.
****
जालना जिल्ह्यातल्या
घनसावंगी तालुक्यातल्या घाणेगाव इथल्या ४० ग्रामस्थांनी काल जांबसमर्थ तलावात उतरून
चार तास जलसमाधी आंदोलन केलं. स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, विक्रेत्यांवर कारवाई करावी
आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला. तहसीलदार आश्विनी
डमरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन, संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे लेखी
आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं.
****
आणि आता ऐकू या
पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी…..
मुख्यमंत्री
ग्राम सहाय्यता निधीअंतर्गत मिळालेल्या
निधीतून गावाचा कसा कायापालट केला, सांगताहेत वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातल्या भामदेवी गावचे सरपंच सुभाष मोहकार ...........
आमचं भामदेवी गाव हे मुख्यमंत्र्यांनी
ग्राम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दत्तक घेतलं. आणि इथं दोन कोटी रूपये विकास कामासाठी
दिले.आणि त्या दोन कोटीतून आम्ही जलसिंचनाची कामं आणि कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
५६ लाभार्थ्यांना १७२ म्हशी दिल्या आणि त्या दुधाचं संकलन आणि पॅकिंग सेंटर सुध्दा
इथं उघडलं आहे. आणि वऱ्हाड दुध नावानं आम्ही पॅकींग करून ब्रँड करून आम्ही ते दुध मार्केट
मध्ये विकतो.तसंच इथं साडेसहा हजार झाडे सुध्दा लावली आहेत.तसंच नेटशेट, मछीपालन असे
विविध उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भामदेवी इथं झाली. तसंच विधवा महिलांना
कुटीर उद्योगाची कामे प्रस्तावित आहेत.आणि इथं मुख्यमंत्री साहेबांनी निधी दिल्यामुळे
गावचा भरपूर विकास झाला आणि शेतकऱ्यांना बेराजगार मुलांना कामं मिळाली.आणि कमी पैशांमध्ये
चांगला विकास इथं साधला आहे.
****
येत्या ३ फेब्रुवारी
पासून लातूर पर्यंत येणाऱ्या बेंगलूर - बिदर
या विस्तारीत रेल्वेगाडीला उदगीर आणि भालकी इथ थांबा देण्यात यावा अशी मागणी
ग्राहक पंचायतीचे मराठवाडा सहसंघटक शामसुंदर
मानधना यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. काल या संदर्भातलं निवेदन त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे
पाठवलं.
****
ग्राहकांनी जागरुक राहून ग्राहक चळवळ गतीमान करावी असं
आवाहन राज्य ग्राहक संरक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केलं आहे.
परभणी इथ ते वार्ताहरांशी बोलत होते. येणाऱ्या काळात राज्यातल्या ३५० तालुक्यात ग्राहक
चळवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
समाजातल्या विविध तक्रारी असणाऱ्या महिलांना, आपल्या तक्रारींचं
निराकरण करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या मुंबईच्या कार्यालयात जावं लागू नये, यासाठी,
राज्य महिला आयोग आज औरंगाबाद इथं सुनावणी घेणार आहे. सकाळी ११ वाजता सुभेदारी विश्रामगृहात
ही सुनावणी होईल.
****
जालना जिल्ह्यातल्या
जाफराबाद तालुक्याची पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी निवड
झाली आहे. या माध्यमातून तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपक्रमांची माहिती
देण्यासाठी काल उपविभागीय कार्यालयात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
*****
No comments:
Post a Comment