Thursday, 21 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –21 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****



Ø वीन ग्राहक संरक्षण विधेयक २०१७ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी;  ग्राहकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी प्राधिकरण स्थापण्याची तरतूद

Ø राज्यातली दुकानं, हॉटेल्स आणि मॉल्स आता दिवसरात्र सुरु राहणार

Ø राज्यात कंपन्यांना खाजगी शाळा सुरु करण्यास परवानगी देणाऱ्या विधेयकाला विधीमंडळाची मान्यता

आणि

Ø दिवंगत गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळाची एक महिन्यात स्थापना होणार 

****





      वीन ग्राहक संरक्षण विधेयक २०१७ला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामध्ये ग्राहकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर भेसळीची प्रकरणे आणि कंपन्याच्या भ्रामक जाहिरातींसाठी दंडाची शिक्षा करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या नामांकित व्यक्तींनाही दंड ठोठावण्याची तसंच तीन वर्षापर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याच्या शिक्षेचीही तरतूद या विधेयकात आहे.

इतर मागासवर्गीयांमधल्या उपगटांच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या, इतर मागासवर्ग आयोगास १२ आठवड्यांची मुदतवाढ देण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. आता हा आयोग  २ एप्रिल २०१८ पर्यंत कार्यरत राहील. गेल्या २ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. 

****

संरक्षण आणि सुरक्षाविषयक सुविधांसाठी संपादित केलेल्या स्थावर मालमत्तासाठी देय भरपाईंचं स्थावर मालमत्ता संपादन आणि भरपाई सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकानुसार आता मालमत्तेच्या मूळ मालकालाही आपली बाजू मांडता यावी, यासाठी केंद्र सरकार पुन्हा नोटीस जारी करू शकणार आहे. हे विधेयक १९५२ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू केलं जाईल.

****

विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काल लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. गुजरात इथं निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी, हे सदस्य करत होते. हा विषय काँग्रेसनं काल तिसऱ्या दिवशीही लावून धरला.

****

राज्यातली दुकानं, हॉटेल्स आणि मॉल्स आता दिवसरात्र सुरु राहू शकतील, यासंदर्भातलं विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे. मात्र बार, पब, आणि मद्य विक्रीच्या दुकानांसाठी ही परवानगी असणार नाही, असं कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. दुकानं आठवडाभर खुली राहणार असली तरी तिथं काम करणाऱ्या कामगारांना साप्ताहिक सुटी अनिवार्य असल्याचंही निलंगेकर यांनी सांगितलं.

****

राज्यात खाजगी शाळा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबतचं दुरुस्ती विधेयक काल विधानसभेत सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर मंजूर झालं. यामध्ये कंपन्यांना राज्यात खाजगी शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याची तरतूद आहे. या शाळांना राज्य शासनाच्या तसंच अनुदानित शाळांसाठी असलेले नियम लागू राहतील. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून या शाळा चालवल्या जाणार आहेत.

****

तूर खरेदी करण्यासाठी यावर्षापासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. डॉ. मिलींद माने यांनी जालना जिल्ह्यातल्या नाफेड केंद्रावर तूर विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला, असता त्याला लेखी उत्तर देताना खोत बोलत होते. यावर्षी तुरीच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्रं सुरु केली जाणार असून तुरीमध्ये आर्द्रता बारा टक्क्यापेक्षा जास्त असल्यास खरेदीमध्ये सवलत देण्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांची वीज बिलं दुरुस्त करण्यासाठी फिडर निहाय कॅम्प घेण्यात येतील तसंच विना नोटीस वीज जोडणी खंडीत केलं जाणार नाही असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य डी. एस. अहिरे यांनी धुळे जिल्ह्यातल्या कापडणे उपकेंद्राअंतर्गत असलेलं रोहीत्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर असलेल्या जोडणीधारकानं तीन वर्षासाठीचे प्रत्येकी तीन हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र सुरु केलं जाणार नाही, असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. 

राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत ऑक्टोबर अखेरपर्यंत २६ हजार ३५६ कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कृषी पंपांच्या वीज जोडणीकरिता विशेष योजना मंजूर करण्यात आली असल्याचंही अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णावर उपचार नाकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत, एका प्रश्नाला उत्तर देतांना काल सांगितलं.  धर्मादाय रुग्णालयांनी गरीबांसाठी २० टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

*****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

स्कुल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्किटेक्चर -एसपीए ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबाद इथं स्थापन होणार असून यासंदर्भात शासन स्तरावर तातडीनं कार्यवाही करून हा अभ्यासक्रम त्वरीत सुरू करण्यात यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत काल केली. औरंगाबाद शहरात  -एसपीए स्थापन करण्याच्या घोषणेला तीन वर्ष उलटूनही यासंदर्भात कुठलीच कार्यवाही झाली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं.  आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, भारतीय खेळ प्राधिकरणचं साई विभागीय केंद्र आदी संस्था नागपूरला गेल्यामुळे एसपीए ही संस्था देखील नागपूरला स्थापन करणार की काय असा  संभ्रम  मराठवाड्यातल्या जनतेत निर्माण झाला असल्याचं आमदार चव्हाण यावेळी म्हणाले.

****

दिवंगत गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ एका महिन्यात बीड जिल्ह्यात परळी इथं स्थापन करण्यात येईल, असं कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं. विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.  राज्यात आठ लाख ऊस तोड कामगार असून, त्यांच्यासाठी ऊस तोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना, श्रमजीवी कामगार मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत. या महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

उदगीर ते परळी हा रेल्वे मार्ग नांदेड विभागाशी जोडण्यासाठी आपण प्रयत्न करु, असं आश्वासन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. उदगीरच्या रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्ठमंडळानं मुंडे यांची नागपूर इथं भेट घेऊन, त्यांना या मागणीचं निवेदन दिलं.

****

परभणी आणि पूर्णा शहरातल्या नागरिकांच्या  पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी जालनामधल्या निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदी पात्रात काल दुपारी, १ हजार २०० दशलक्ष घनफूट वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातल्या नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरं, नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन परभणी जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

त्याचबरोबर नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये असं आवाहन ही करण्यात आलं आहे.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल कटक इथं खेळल्या गेलेल्या, टी -२० क्रिकेट  मालिकेतला पहिला सामना भारतानं, ९३ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं २० षटकात ३ बाद १८० धावा केल्या. मात्र श्रीलंकेचा संघ १६ षटकात केवळ ८६ धावाच करू शकला. यजुवेंद्र चहलला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आलं. या मालिकेतला दुसरा सामना उद्या इंदोर इथं होणार आहे.

****

पाच वर्षात देशभरातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संशोधन करावं, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे.

अकोला इथल्या वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नूतन वास्तुचं लोकार्पण करतांना काल ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन शास्त्रज्ञ आणि कृषी विभागानं संशोधनांचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

*****




No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...