Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक संलग्न करण्याची
मुदत सर्वोच्च न्यायालयानं ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं आज यासंबंधी
अंतिम आदेश दिला. मोबाईल क्रमांकालाही आधार क्रमांक संलग्न करण्याची मुदत सहा फेब्रुवारी
वरुन ३१ मार्च करण्यात आली आहे. नवीन बँक खातं उघडण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य नाही,
मात्र खातं उघडताना संबंधित व्यक्तीला आधार कार्डसाठी नोंदणी केल्याचा पुरावा द्यावा
लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. बँक खात उघडण्यासाठी, तसंच अन्य आर्थिक व्यवहारांसाठी
पॅन नंबर अनिवार्य करण्याची मुदतही सरकारनं ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवली आहे.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आलेल्या नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर तीन आजी
आणि सात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करुन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी
सदनाचं कामकाज सोमवार पर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेतही पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. सभापती व्यंकय्या
नायडू यांनी जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि पक्षाचे नेते अली अन्वर यांना पक्षानं
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरुन अपात्र घोषित केल्यानंतर त्यांचं राज्यसभा
सदस्यत्व रद्द केल्याचं सांगितलं. या मुद्यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि
समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अग्रवाल यांनी चर्चेची मागणी केली, मात्र ती सभापतींनी
नाकारल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यामुळे सभापतींनी कामकाज आधी
१२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकुब केलं.
****
दरम्यान, राज्यसभा सदस्यत्व अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शरद
यादव यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. आजपासून सुरु झालेल्या संसदेच्या
हिवाळी आधिवेशनाला उपस्थित राहण्याची परवानगी देणारा अंतरिम आदेश दयावा, अशी मागणी यादव यांनी केली होती.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे. देशासाठी पटेलांनी दिलेल्या महत्वपूर्ण
सेवांसाठी प्रत्येक भारतीय त्यांचा ॠणी असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं
आहे.
****
शिवजयंती दोनदा साजरी होण्याच्या मुद्यावरुन विधानसभेत आज विरोधकांनी
गदारोळ केला.सरकारतर्फे शिवाजी महाराज
यांच्या जन्मदिनी तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते, मात्र महाराजांची जयंती
तिथीनुसारच साजरी व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी लाऊन धरली.
यावरुन विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली.
****
न्यूटन हा हिंदी चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या उत्कृष्ट परदेशी भाषेच्या पुरस्काराच्या
शर्यतीतून बाहेर पडला आहे. अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा नऊ
अंतिम चित्रपटांच्या यादीत समावेश झाला नसल्याचं द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स
ॲण्ड सायन्सेसनं सांगितलं.
****
सार्वजनिक बँकींग क्षेत्राचं सक्षमीकरण करणं हे पुढच्या वर्षातला महत्त्वाचा
कार्यक्रम असेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते
बोलत होते. रेल्वे क्षेत्र तसंच शहरी भागांत पायाभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा
होणं आवश्यक असून, भारतानं मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक रचनात्मक बदल
अनुभवले असल्याचं ते म्हणाले. भारत हा पायाभूत सोयी सुविधांवर खर्च करणाऱ्या
अग्रणी देशांपैकी एक देश आहे, मात्र सध्याच्या गतीला शाश्वतता देण्याची गरज असल्याचं
त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
नाशिकहून मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनाच्या पथकर आकारणीवरून झालेल्या
वादात ट्रक चालकानं टोल वसूल करणाऱ्या युवकाला चिरडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास
नाशिक जवळच्या घोटी पथकर नाक्यावर घडली. या घटनेनंतर ट्रक घेऊन फरार झालेल्या चालकास
खर्डी इथं पकडण्यात आलं.
दरम्यान, युवकाचा मृतदेह आज घोटी पथकर नाक्यावर आणून, जोपर्यंत टोल प्रशासनाचे
जबाबदार अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह न हलवण्याचा निर्णय टोल कर्मचाऱ्यांनी
घेतला आहे, तसंच कामबंद आंदोलनही सुरू केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment