Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 3 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
दिव्यांगांच्या अधिकारांचं रक्षण करणं आवश्यक असून त्यांना
विविध सोयी सवलती पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात
ते आज बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरीत
करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या दोन व्यक्ती आणि तीन संस्थांचा समावेश आहे. दिव्यांगांना
आपलं कौशल्य दाखवण्यासाठी संधी देणं आवश्यक असून त्यांना आवश्यक वस्तू आणि उपकरणं पुरवण्यासाठी
देशभरात आठ हजारांहून अधिक शिबीरं आयोजित करण्यात आल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
मंत्री थावरचंद गहलोत यांनी यावेळी सांगितलं.
****
दिव्यांगांची स्थिती सुधारण्यासाठी केवळ कायदे पुरेसे
नसून त्यासाठी लोकांची विचारसरणी बदलणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं आहे. आसाममधल्या गुवाहाटी इथं ‘दिनदयाल दिव्यांगजन साहज्य योजने’ला
प्रारंभ करताना ते आज बोलत होते. दिव्यांगांबाबत समाजानं संवेदनशील असणं आणि कोणताही
भेदभाव न पाळणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांना सुलभ
वावरता येण्यासाठी सोयीसुविधा पुरवण्यावर त्यांनी यावेळी भर दिला.
****
येत्या बुधवारी रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण आढाव्याअंतर्गत
कोणत्याही मुख्य व्याजदरात बदल करणार नसल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय
पतमानांकन संस्थेनं देशाची अर्थव्यवस्था पाहता चांगलं मानांकन दिल्याच्या पार्श्वभूमीवर
व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र येत्या काही महिन्यात
महागाई वाढत राहण्याचा अंदाज असल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता नसल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास भाड्यात मिळणारी सूट
स्वेच्छेनं त्यागणाऱ्या लोकांची संख्या नऊ लाखावर पोहोचली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं
सांगितलं आहे. ही सूट स्वेच्छेनं न स्वीकारण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांची संख्या
यंदा दुपटीनं वाढली आहे. यामुळे रेल्वेची सुमारे चाळीस कोटी रुपयांची बचत झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे रेल्वेवर पडणारा एक हजार ३०० कोटी रुपयांचा
भार कमी करण्यासाठी या योजनेअंतर्गत आवाहन करण्यात आलं होतं. रेल्वेला वार्षिक तीस
हजार कोटी रुपयांचा तोटा होतो. त्यात एक हजार सहाशे कोटी रुपयांची सवलत समाविष्ट आहे.
****
राज्यात
दिव्यांगासाठी चालवल्या जाणाऱ्या सर्व संस्थांना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता
देण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
केली आहे. ते आज लातूर इथं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात
बोलत होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधीची तरतूद असून, प्रशासनातले अधिकारी
दिव्यांगाचे हक्क, अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतील अशी ग्वाही लातूरचे
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी दिली.
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त
उस्मानाबाद इथं दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या
दिव्यांगांच्या ३० शाळेतले ६६० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उस्मानाबाद
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
जालना
इथंही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं आज दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या
हस्ते स्पर्धेचं उदघाटन झालं. दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात
उत्साहानं सहभाग घेतला.
****
कसोटी क्रिकेटमध्ये
सहा द्विशतकं झळकवणारा विराट कोहली आज पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याबरोबरच वेस्ट
इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याचा विक्रम त्यानं मोडला तर सचिन
तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या सर्वाधिक द्विशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
नवी दिल्लीत फिरोझशहा कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या
दिवशी कोहलीनं हा विक्रम केला. या सामन्यात आज दिवसअखेर श्रीलंकेच्या तीन बाद १३१ धावा झाल्या.
मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी भारतानं
पहिला डाव ५३६ धावांवर घोषित केला. पहिल्या डावात विराट कोहलीनं २४३, मुरली विजयनं
१५५, रोहीत शर्मानं ६५ तर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं प्रत्येकी २३ धावा केल्या.
भारत ४०५ धावांनी आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment