Saturday, 16 December 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 16.12.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सामान्य माणसाच्या भाषेत न्यायालयीन कामकाज व्हायला पाहिजे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निवासी आणि प्रशिक्षण परिसर - न्यायग्रामचा कोनशिला समारंभ आज राष्ट्रपतींच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. गरीब नागरिकांना न्याय देताना न्यायालयांनी सुनावणी उशीरानं घेण्याची सवय मोडली पाहिजे, असं ते म्हणाले. जलद आणि स्वस्त न्याय मिळण्यासाठी समांतर न्यायिक व्यवस्था उपलब्ध करण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालय राज्यातल्या शिलाँग - नाँगस्टॉईन - राँगजेंग - तुरा या रस्त्याचं उद्घाटन केलं. या रस्त्यामुळे ईशान्येकडच्या राज्यांचा संपर्क वाढणार असून, व्यापाराला चालना मिळून आर्थिक विकास होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मेघालय राज्यात पर्यटन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांगत, सरकारनं यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्र सरकार शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याबाबत गंभीर असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागात दळणवळणाची चांगली व्यवस्था, सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणं, प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचवणं, चांगल्या आरोग्य व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं जेटली म्हणाले. सातत्यपूर्ण विकासासाठी ग्रामीण आणि कृषी व्यवस्थेची भूमिका याबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते.

****

उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरपूरच्या स्थानिक न्यायालयानं मंत्री सुरेश राणा, माजी केंद्रीय मंत्री संजीव बलीयान, भाजपचे आमदार संगीत सोम आणि त्यांच्या मुलाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. २०१३ मधल्या मुझफ्फरपूर दंगली प्रकरणी राज्य सरकारकडून या आरोपींविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये या आरोपींनी महापंचायतीमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

राज्यात तुरुंगामधल्या कैद्यांच्या सोयींबाबत दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यातल्या तुरुंगातल्या सोयींबाबत सुधारणा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले होते. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारनं कोणतेही निर्देश पाळले नसल्याचं काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली.

****

उस्मानाबाद इथं आज ‘जिल्हास्तरीय बाल महोत्सवा’चं उद्घाटन, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं. १८ वर्षांखालील मुलांमध्ये इंटरनेटचा वापर वाढत असल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांविषयी युनिसेफच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली असून, या बाल महोत्सवाच्या आयोजनातून मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याची गरज घुगे यांनी व्यक्त केली. बालकांच्या व्यक्तीमत्वाचा परिपूर्ण, सर्वांगिण विकास करण्यासाठी आणि बालकांना सक्षम नागरिक बनवण्यासाठी बालहक्क आयोग प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. या दोन दिवसीय महोत्सवात अनाथ मुलांच्या विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

धुळे शहरात अमृत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मलनि:सारण योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्यास धुळे महापालिकेनं विरोध केला आहे. याबाबत राज्य सरकार राजकीय हेतूनं ही योजना प्राधिकरणाकडे हस्तांतरित करत असल्याचा आरोप महापौर कल्पना महाले यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. धुळे महानगरपालिकेकडे तांत्रिक मनुष्यबळ असतांना अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण देऊन, केवळ धुळे शहराची योजना कार्यान्वयासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारावर गदा आली असल्याचं त्या म्हणाल्या.

****

५२व्या अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नेरूरपारच्या वसुंधरा संस्थेत आज सुरुवात झाली. भारताच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रभाकर देवधर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. पुण्याच्या डॉ. कल्पना जोशी आणि डॉ. पराग गोगटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १८ डिसेंबरला या अधिवेशनाची सांगता होणार आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.

****

No comments: