Tuesday, 2 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø भीमा-कोरेगाव इथल्या दगडफेकीच्या घटनेनंतर औरंगाबाद आणि परभणी शहरात निर्माण झालेला तणाव निवळला

Ø भारतीय स्टेट बँकेच्या मूळ व्याज दर तसंच संदर्भीय मूळ व्याज दरात शून्य पूर्णांक ३०शतांश टक्क्यानं कपात

Ø संपूर्ण कर्जमाफीसाठी येत्या १ मार्चपासून सरकार विरोधात असहकार आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा निर्णय

आणि

Ø औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेचा पेपर फुटल्यानं एका विषयाची परीक्षा रद्द

****

 पुणे जिल्ह्यातल्या भीमा-कोरेगाव इथल्या विजयी स्तंभाला काल लाखो दलित बांधवांनी मानवंदना दिली. मात्र, यावेळी दगडफेकीची घटना घडल्यानं, या परीसरात तणाव निर्माण झाला होता. दोनशे वर्षांपूर्वी याच दिवशी दलित सैनिकांच्या मदतीनं, ब्रिटीश सेनेनं पेशव्यांना पराभूत केलं होतं. त्यानिमित्त भीमा -कोरेगाव इथं एक विजयी स्तंभ उभारण्यात आला. काल इथं जमलेल्या लोकांमध्ये वादावादी झाली, आणि दगडफेक झाल्याचं, पिटीआयच्या वृतात म्हटलं आहे. घटनेनंतर काही वेळातचं बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं, पोलिसांनी सांगितलं.

 दरम्यान, या घटनेचे काल औरंगाबाद इथं पडसाद उमटले. यामुळे शहराच्या काही भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन राज्य परीवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. याचबरोबर उस्मानपुरा भागातल्या एक शो रूमवर जमावानं दगडफेक केली, दगडफेक करणाऱ्या जमावानं क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरची दुकानं बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं. टी.व्ही.सेंटर भागातही जमावानं होर्डिंग पाडून टाकले. त्यानंतर भाजी बाजारात घुसून भाजीपाल्यांची दुकानं आणि हातगाड्यावाल्याचं नुकसान केलं. जयभवानीनगर भागातही एका बँकेच्या एटीएम केंद्रावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.

 त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, भागातल्या काही दुकानांच्याही जमावानं काचा फोडल्या यामुळे दुकानदारांनी भयभीत होऊन आपली दुकानं बंद केली. मुकुंदवाडी, रामनगर इथल्या लाईफ केअर हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली तसंच कॅनाट प्लेस बाजारातही जमावानं घुसून दुकाने बंद करायला लावल्यानं शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी यानंतर तणावग्रस्त भागात बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांत राहण्याचं तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. औरंगाबाद शहरातल्या दलित नेत्यांनीही जनतेला शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

 परभणीत या घटनेचा सर्व आंबेडकरी संघटनाकडून निषेध करण्यात आला. संध्याकाळच्या सुमारास काही तरुणांनी दगडफेक करत बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांनीही तातडीनं दुकानं बंद केली. मात्र काही वेळानं ती पुन्हा सुरू करण्यात आली.

****

 भारतीय स्टेट बँकेनं आपल्या मूळ व्याज दर तसंच संदर्भीय मूळ व्याज दरात शून्य पूर्णांक ३०शतांश टक्क्यानं कपात करण्याची काल घोषणा केली. या दर कपातीमुळे आता बँकेचा मूळ व्याज दर हा ८ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावरून ८ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर आला आहे. यामुळे गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जासह अन्य कर्ज घेतलेल्या कर्जदारांना मोठा लाभ होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी केलेल्या व्याज दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्टेट बँकेनं म्हटलं आहे.

***

 संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी, येत्या १ मार्चपासून राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय,  नाशिक इथं काल झालेल्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला, असल्याची माहिती, कॉम्रेड अजित नवले, रघुनाथ दादा पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिली. या असहकार आंदोलन अंतर्गत सरकारचं कोणतंही वीज बिल, कर आणि कर्ज शेतकरी भरणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं. औरंगाबाद इथं सुकाणू समितीच्या  बैठकीत  निर्माण झालेले गैरसमज दूर झाले असून, समिती एकसंघ असल्याचा दावाही नवले आणि पाटील यांनी यावेळी केला.

****

 राज्यात सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे अधिकार महानगरपालिका आणि नगरपालिकांना देण्याचा अध्यादेश काल सरकारनं जारी केला. यामुळे आता, रस्त्यांवर थुंकणं, कचरा टाकूण घाण करणं, उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्तीस महापालिका आणि नगर परिषद दंड ठोठावून तो वसूल करू शकतील. यामध्ये रस्त्यांवर  घाण केल्यास १८० रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रूपये, उघड्यावर मूत्र विसर्जन केल्यास, २०० रूपयांचा दंड, तर शौच केल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

****

 नॅशनल मेडिकल कमिशन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग या विधेयकामधल्या काही तरतुदींच्या विरोधात भारतीय वैद्यकीय संस्था अर्थात इंडीअन मेडीकल असोसिएशन तर्फे आज काळा दिवस पाळला जाणार असून, सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. हे विधेयक आज संसदेत चर्चेसाठी मांडलं जाणार आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत अकौटिंग फॉर मॅनेजर या विषयाची परीक्षा काल काल सुरू झाल्यावर काही वेळात रद्द करण्यात आली. काल सकाळी परीक्षा सुरू झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच शहरातल्या वसंतराव नाईक महाविद्यालयातल्या परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका व्हॉटस्अॅपवरून फुटल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, या विषयाची परीक्षा रद्द केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक दिगंबर नेटके यांनी दिली.

****

   परभणी शहरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डीजे लावण्याच्या कारणावरून तसंच पूर्ववैमनस्यातून मारामारीची घटना घडली. या प्रकरणी परभणीचे खा.संजय जाधव यांच्यासह १३ जणांच्या विरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समाजातल्या सर्वच घटकांनी मदत करण्याचं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी केलं आहे. धारुर इथं मिशन दिलासा अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ५० कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काल शेळी वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात धारुर तालुक्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

 चौथ्या झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथालेखक प्राचार्य भगवान देशमुख यांची निवड झाली आहे. येत्या १३ जानेवारीला जालना जिल्ह्यात जाफराबाद इथं होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. कवयित्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

****

 यंदाचा रणजी चषक विदर्भाच्या संघानं पटकावला आहे. इंदूर इथं झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघानं दिल्ली संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. विदर्भाच्या संघानं पहिल्यांदाच रणजी चषक जिंकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल संघांचं अभिनंदन केलं आहे.

****

 राज्य सरकारनं कर्ज माफीचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवाल पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. ते काल परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ३२ वर्षांपासून पहिल्यांदाच ३७ हजार कोटी रूपये पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

 नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि तिरुपती एक्स्प्रेस या गाड्या आज नांदेड इथून उशिरा सुटणार आहेत. अमृतसरहून येणारी सचखंड एक्स्प्रेस उत्तर भारताल्या धुक्यामुळे दहा तास उशिरा आली. त्यामुळे ही गाडी नांदेडहून उशिरा म्हणजे दुपारी साडे बारा वाजता सुटणार आहे. तर नांदेड - तिरुपती  एस्क्प्रेस ही गाडी नांदेड इथून तिच्या निर्धारित वेळेऐवजी नऊ वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

 उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघाच्या  निवडणुकीत सर्व ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकल्या आहेत. सर्वपक्षीय आघाडीचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही.

****

 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, पाणंद मुक्तीच्या प्रयत्नात कसूर केल्या प्रकरणी, राज्य शासनानं लातूर जिल्ह्यातल्या ६२ ग्राम पंचायतींच्या सरपंचांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यात औसा तालुक्यातल्या २२, लातूर तालुक्यातल्या १६, तर निलंगा तालुक्यातल्या २४ ग्राम पंचायतींचा समावेश आहे.

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 21 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 21 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...