Thursday, 18 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १८ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Ø मराठवाड्यातल्या वॉटर ग्रीड योजनेत तांत्रिक मदतीसाठी इस्त्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड इंटरप्रायजेस कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास सरकारची मान्यता

Ø औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत तर, नांदेडच्या पालकमंत्री पदी  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची नियुक्ती

आणि

Ø दुसऱ्या क्रिकेट कसोटीतही भारताचा १३५ धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेनं मालिका जिंकली.

****

 राज्यातल्या अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. अनाथ मुलांची जात नक्की माहित नसल्यानं त्यांना कोणत्या एका विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करता येत नाही. त्यामुळे ही मुलं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलतीपासून वंचित राहतात. यासाठी त्यांच्या भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****

 मराठवाड्यातल्या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक मदतीसाठी मेकोरोट डेव्हलपमेंट अँड इंटरप्रायजेस या इस्त्राईलच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास, काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मराठवाड्यातलं सरासरी पर्जन्यमान, ोरणांची साठवण क्षमता, जलसंधारण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण, नदी खोऱ्यांमध्ये उपलब्ध असलेलं पाणी समुद्राचे पाणी गोडे करणे आदी उपाययोजना करण्यासाठी या कंपनीचं तांत्रिक सहाय घेण्यात येणार आहे.

****

 सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित होणाऱ्या ग्रामीण भागातल्या जमिनींसाठी बाजारभावाच्या चार पट मोबदला देता यावा याकरता २०१३च्या अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातल्या जमिनी संपादित करून, औद्योगिक घटकांना भाडेपट्ट्यानं देण्यात आलेल्या, आणि कालांतरानं नागरी जमीन कायद्यानुसार सूट प्राप्त झालेल्या  जमिनींच्या हस्तांतरणासाठी, १०० टक्क्यांऐवजी आता २५ टक्के शुल्क आकारण्यास मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे.

 सिडको महामंडळातर्फे जमीन संपादन करून राबवण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प बाधितांना २०१३च्या जमीन संपादन कायद्याच्या तरतुदींपेक्षा जास्त मोबदला देऊन साडे बावीस टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.

****

 स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत नसलेल्या गावांसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याच्या निर्णयासही काल मान्यता देण्यात आली. या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख रूपये तर १००० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख रूपयांचा निधी मंजूर देण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातल्या चार हजार २५२ ग्रामपंचायतींना मिळणार आहे.

*****

 आगामी पाच वर्षात, पाच लाख रोजगार उद्योजकता विकसित करण्यासाठी, राज्यात स्टार्ट-अप धोरण राबवण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार पुढील पाच वर्षात जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आदी वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या धोरणांतर्गत स्टार्ट-अप करता नाविन्यपूर्ण क्लस्टर विकसित करण्यात येतील. स्टार्ट-अप उद्योगांना निधी उपलब्ध होण्याकरता, फंड ऑफ फंडस् द्वारे ५०० कोटी रुपयांचा निधी स्थापित करुन, क्राऊड फंडीगच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातल्या स्टार्ट-अप उद्योगांना पाच लाख रुपयांपर्यंतचं अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल.

कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याचा ठरावही राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

***

 मराठवाड्यातल्या औरंगाबाद, नांदेड तसंच परभणीच्या पालकमंत्री पदात बदल करण्यात आला असून औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचं पालकमंत्रीपद सांभाळणारे रामदास कदम यांची नियुक्ती नांदेडच्या पालकमंत्रीपदी करण्यात आली असून परभणीच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडच्या पालकमंत्री पदी असणारे अर्जुन खोतकर यांना मात्र कुठलंही पालकमंत्री पद देण्यात आलं नाही. काल एका शासन निर्णयाद्वारे या नियुक्या करण्यात आल्या आहेत.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 राज्यातलं सरकार कूचकामी ठरलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा काल बीड इथं पोहचल्यानंतर ते बोलत होते. बोड अळीनं झालेलं नुकसान संबंधित कंपन्यांकडून वसूल करून मग शेतकऱ्यास देण्याचं आश्वासन देणारं हे सरकार आहे, त्यामुळं त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत जाईल हे सांगणं कठीण असल्याचंही पवार यावेळी म्हणाले. 

****

 वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण केल्या प्रकरणी, आमदार बच्चू कडू यांच्या सह चार जणांना अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा न्यायालयानं काल सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. २३ एप्रिल २०१६ रोजी परतवाडा इथं वाहतूक नियमांचं आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लंघन केल्यानंतर मारहाण केल्याची तक्रार वाहतूक पोलिस शिपायानं नोंदवली होती.

****

 हैदराबाद मुक्तिसंग्रामातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी औरंगाबाद इथं पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोरीकर यांचं मंगळवारी सायंकाळी निधन झालं होतं. बोरीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सायंकाळी सरस्वती भुवन संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन इथं खेळला गेलेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना १३५ धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघानं दिलेल्या २८६ धावांचा पाठलाग करताना, भारताचा संघ अवघ्या १५१ धावांत सर्वबाद झाला. मालिकेत तिसरा आणि अंतिम सामना येत्या २५ जानेवारीपासून जोहान्सबर्ग इथं होणार आहे.

****

 आयकर विभागानं काल धुळे जिल्ह्यात अनेक राजकीय नेत्यांची निवासस्थानं तसंच कार्यालयांवर छापे घातले. यामध्ये कॉंग्रेसचे नेते विधान परिषद सदस्य अमरिश पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा समावेश आहे. डिसान कंपनीच्या व्यवहारांच्या संदर्भात, आयकर विभागाच्या नाशिक इथल्या पथकांकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

****

 आयटक प्रणित असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांनी, आपल्या विविध मागण्यांसाठी काल एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. किमान वेतन तसंच कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, विडी कामगारांचं किमान वेतन निश्चित करावं, सर्व क्षेत्रातल्या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या संपाचा भाग म्हणून औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काल आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महा धरणे आंदोलन केलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात, असंघटीत क्षेत्रातले कामगार सहभागी झाले होते.

****

 समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत लोकशाही पोहचवण्यासाठी ती बळकट करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयावरच्या विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाला घटनेमध्ये चांगले बदल करण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांनी सूचना कराव्यात असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी याप्रसंगी केलं.

****

 परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या साईबाबा जन्मभूमी विकासासाठी नगरपरिषदेनं सादर केलेल्या ९९ कोटी ९८ लाख रूपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

 परभणी जिल्हा परिषदच्या गंगाखेड उपविभागाचे उपअभियंता मोहनलाल भोई आणि त्यांच्या पत्नीवर अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे. नंदुरबार इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याचं आमच्या नंदुरबारच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...