आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जानेवारी २०१८ सकाळी ११.००
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेची
आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. या बैठकीत वस्तू आणि सेवा कर विवरण पत्र दाखल करण्याचा
तसंच मोठ्या आस्थापनांच्या नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्याच्या प्रस्तावावर चर्चा
होण्याची शक्यता आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून इ-वे बील प्रणालीची
अंमलबजावणी होणार असून, त्याच्या तयारीचा तसंच वस्तू आणि सेवा कर नेटवर्कची परतावे
हाताळण्याच्या क्षमतेचाही आढावा या बैठकीत घेतला जाईल.
****
भारताच्या
दौऱ्यावर असलेले इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात
मुंबईला भेट देणार आहेत. मुंबईतल्या ताजमहाल हॉटेलमध्ये होणाऱ्या भारत - इस्त्राइल
व्यापार शिखर परिषदेत ते सहभागी होतील, तसंच २६/११ हल्ल्यातल्या
मृतांना आदरांजली वाहतील. त्यानंतर ज्यू समाजाचं केंद्र असलेल्या छाबड हाऊसला भेट
देऊन त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मृतिदालनाचं उद्घाटनही नेतन्याहू यांच्या हस्ते
होणार आहे.
****
ज्येष्ठ नाट्य कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय
गायक पद्मा तळवळकर आणि प्रभाकर कारेकर तसंच तबला वादक अरविंद मुळगावकर यांना काल राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीत
राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात देशातील ४३ कलाकारांना अकादमीचे पुरस्कार
प्रदान करण्यात आले. एक लाख रूपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप
आहे.
राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या २०१६ - १७ च्या पुरस्कारांचं
वितरण काल मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी
दोन अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार, आठ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार आणि अन्य २९
विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
मराठवाड्यातल्या औरंगाबाद, नांदेड तसंच परभणीच्या
पालकमंत्री पदात बदल करण्यात आला असून औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी आरोग्यमंत्री दिपक
सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचं पालकमंत्रीपद सांभाळणारे रामदास
कदम यांची नियुक्ती नांदेडच्या पालकमंत्रीपदी करण्यात आली असून परभणीच्या पालकमंत्रीपदी
गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडच्या पालकमंत्री पदी असणारे
अर्जुन खोतकर यांना मात्र कुठलंही पालकमंत्री पद देण्यात आलं नाही.
****
***
No comments:
Post a Comment