Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात
सेंच्युरियन इथं सुरू असलेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना दक्षिण आफ्रिकेनं १३५ धावांनी
जिंकला असून, मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या
डावात दक्षिण आफ्रिका संघानं दिलेल्या २८६ धावांचा पाठलाग करताना, भारताचा संघ अवघ्या
१५१ धावांत सर्वबाद झाला. मालिकेत तिसरा आणि अंतिम सामना येत्या २५ जानेवारीपासून जोहान्सबर्ग
इथं होणार असून, येत्या एक फेब्रुवारीपासून दोन्ही देशात सहा एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेला सुरुवात होणार आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांची
मालिका खेळली जाणार आहे.
****
रिजर्व्ह बँकेनं जारी केलेली दहा
रुपये मूल्याची सर्व चौदा प्रकारची नाणी वैध असल्याचा निर्वाळा बँकेनं दिला आहे. ही
नाणी न स्वीकारण्याबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पत्रकारांशी
बोलताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी, ही नाणी बँकांसह सर्व आस्थापनांनी व्यवहारासाठी स्वीकारावीत,
असं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी
अतिरिक्त कर्जाची गरज ५० हजार कोटी रुपयांवरून २० हजार कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याचं
जाहीर केलं आहे. सरकारनं महसुलीचा ओघ आणि खर्चाच्या प्रमाणाचा आढावा घेतल्यानंतर कर्जाच्या
अंदाजात कपात केली, असं केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी ट्विटरवर म्हटलं
आहे.
****
आजच्या डिजीटल युगात दहशतवाद हे
अतिशय गंभीर आव्हान असल्याचं, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.
आज नवी दिल्लीत रायसीना चर्चासत्रात त्या बोलत होत्या. सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत
यावेळी उपस्थित होते, दहशतवाद्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणालींचा
वापर आंतरराष्ट्रीय सीमा भागात होतो आहे, यावर अंकुश ठेवण्याची गरज त्यांनी नमूद केलं.
****
मराठवाड्यातल्या वॉटर ग्रीडसाठी
मेकोरोट या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास, राज्य मंत्रिमंडळाच्या
आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर निर्णयांमध्ये
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी- २०१७ ला मान्यता, अनाथ मुलांच्या
सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी एक टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय, ग्रामपंचायतींच्या
स्वत:च्या कार्यालयासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
सुरू करण्यास मान्यता, नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उन्नतीकरण
- आधुनिकीकरण - देखभाल-संचलन आदी कामं खासगी सार्वजनिक भागिदारी - पीपीपी तसंच डीबीएफओटी
तत्त्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यास मान्यता, सरपंचांच्या थेट निवडणुकीसंदर्भात
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ च्या काही कलमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता,
सिडको महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी साडे बावीस टक्के
विकसित भूखंडाची योजना मंजूर करणं, आदी निर्णयांचा समावेश आहे.
कोल्हापूर जवळच्या उजळाईवाडी विमानतळाला
छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत
मंजूर करण्यात आला. कोल्हापूरकरांनी या निर्णयाचं स्वागत केलं. भाजपा नेत्यांनी कोल्हापूर
इथं छत्रपती राजाराम महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन तसंच साखर-पेढे
वाटून आनंदोत्सव साजरा केला.
****
राज्याचं पब्लिक क्लाऊड धोरण तयार
झालं असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी सर्व विभागांना प्राप्त झाली असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं राज्य शासनाच्या माहिती आणि
तंत्रज्ञान विभाग आणि फिक्की या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एम-टेक या एक
दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पब्लिक क्लाऊड धोरणामुळे विभागांतर्गत
कामांचा निपटारा करून योग्य परिणामांवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले. क्लाऊड कंप्युटींग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी पहिल्यांदाच
निर्माण झाल्या असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
आयकर विभागानं आज धुळे जिल्ह्यात
अनेक राजकीय नेत्यांची निवासस्थानं तसंच कार्यालयांवर छापे घातले. यामध्ये कॉंग्रेसचे
नेते विधान परिषद सदस्य अमरिश पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे
यांचा समावेश आहे. डिसान कंपनीच्या व्यवहारांच्या संदर्भात, आयकर विभागाच्या नाशिक
इथल्या पथकांकडून ही कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे.
****
६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी
संदर्भात औरंगाबाद इथं आज पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी
पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी विविध विभागाच्या विभागप्रमुखांना सूचना केल्या.
मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अनुषंगानं विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment