Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मार्च २०१८ दुपारी १.०० वा.
****
इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेनं
केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेले सर्व ३९ भारतीय मारले गेल्याची माहिती परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत दिली. इसिस या अतिरेकी संघटनेनं जून
२०१४ मध्ये मोसूल भागातून ४० भारतीयांचं अपहरण केलं होतं. या भागात सापडलेल्या ३९ मृतदेहांची
डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात असून, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग
हे मृतदेह आणण्यासाठी इराकला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसभेनं या सर्व
मृतांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
लोकसभेत मात्र स्वराज यांना
हे निवेदन सादर करता आलं नाही. तेलगु देसम पक्ष, वाय एस आर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र
समिती, अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम - एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी आपल्या
मागण्या लाऊन धरत, अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन गेल्या बारा दिवसांपासूनची
घोषणाबाजी सुरु ठेवली. त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज बारावाजेपर्यंत
स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, मोसुल घटनेबाबत निवेदन करण्यासाठी सुषमा
स्वराज उभ्या राहिल्या मात्र विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे, अध्यक्षांनी कामकाज
दिवसभरासाठी स्थगित केलं. सरकारविरोधात सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावरही या गदारोळामुळे,
कार्यवाही होऊ शकत नसल्याचं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नमूद केलं.
राज्यसभेतही स्वराज यांच्या निवेदनानांतर विरोधकांनी
आपल्या विविध मागण्या लाऊन धरत घोषणाबाजीला सुरुवात केली. विरोधकांनाही सदनाचं कामकाज
सुरळीत चालवायचं असल्याचं सांगत, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, बँक घोटाळा
आणि आंध्र प्रदेशच्या मागण्यांसदर्भात चर्चेची मागणी केली. मात्र यासाठी सरकार पुढाकार
घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावर बोलताना संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल
यांनी, सरकार सुरवातीपासूनच सगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं.
त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यानं सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं
कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
बांधकाम क्षेत्रात कार्यरत कामगारांचं शिक्षण, आरोग्य,
सामाजिक सुरक्षा आणि निवृत्ती वेतन यासंबंधीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी येत्या
३० सप्टेंबर च्या आधी आदर्श योजना तयार करण्यात यावी, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र
सरकारला सूचित केलं आहे. या क्षेत्रातले कामगार आधारभूत सुविधांसोबतच देशाच्या निर्मितीतही
महत्त्वाचं योगदान देत असून, अशा नागरिकांना प्रतिष्ठेचं आयुष्य जगता यावं यासाठी देशाच्या
राज्यघटनेत तरतूद असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या सर्व माथाडी मंडळांमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी
आणि महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर कामगार कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणांसाठी
राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ गठित करण्याच्या उद्देशानं, एका अभ्यास गटाची नियुक्ती
करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये विधानसभा सदस्य तसंच राज्य माथाडी, वाहतुक आणि
जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिेंदे, सरचिटणीस नरेंद्र पाटील, भारतीय
जनता कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे.
****
संपूर्ण राज्यात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर आपलं
मंत्रालय प्रयत्न करत असल्याचं, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं
आहे. काल विधासभेत ऊर्जा मंत्रालयाच्या आठ हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांची मागणी मान्य
झाल्यावर ते बोलत होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा,
तसंच जलसिंचन योजनांसाठी सौर ऊर्जेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न असल्याचं, बावनकुळे यांनी
सांगितलं. या एकूण रकमेपैकी सात हजार कोटी रुपये हे शेतकरी तसंच हातमाग विणकरांच्या
अनुदानासाठी असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात शिकाऊ उमेदवारांनी
आज मुंबईत केलेल्या रेल रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यावरुन विधानसभेत
विरोधकांनी गदारोळ केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आंदोलनकर्त्यांनी
उपनगरी रेल्वेगाड्यांवर दगडफेक केल्यामुळे लाठीमार करण्यात आला, मात्र यामध्ये कोणीही
जखमी झालं नसल्याचं सांगितलं. शिकाऊ उमेदवारांना नोकरीत २० टक्के जागा राखीव ठेवल्या
आहेत, यावर लवकरच तोडगा निघेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यांनतर,
सरकारनं त्यांना पत्र लिहीलं आहे. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या
राळेगणसिद्धी इथं सरकारच्या वतीनं हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या केंद्र
सरकारच्या निगडित असल्यामुळे लोकसभेत या मागण्यांवर निर्णय होईल, असं आश्वासन महाजन
दिलं. मात्र तरीही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम असल्याचं आमच्या वर्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment