आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जैन
धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभरात भक्तिभावानं साजरी होत
आहे. यानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम तसंच शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं
आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगात प्रेम आणि सद्भावनेचा
प्रसार करण्यासाठी आपल्याला भागवान महावीरांच्या जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे,
असं राष्ट्रपती आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले. महावीरांनी अहिंसा आणि करुणेचा उपदेश
देऊन, मानवजातीला आनंददायी जीवनाचा मार्ग दाखवला, असं उपराष्ट्रपती म्हणाले, तर महावीरांचा
शांतता, अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असल्याचं, पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथं महावीर जयंतीनिमित्त दुचाकी फेरी, शोभायात्रा,
तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, महावीर जयंतीनिमित्त आज शासकीय सुट्टी असल्यानं
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग
बंद राहणार आहे. मात्र उद्या शासकीय सुटी असली तरी विभाग सुरु राहणार असल्याचं घाटी
प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या
स्मृतीनिमित्त देण्यात येणारा गोविंद सन्मान पुरस्कार पक्षी मित्र डॉ.दिलीप यार्दी
यांना काल औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पाच हजार रूपये रोख आणि स्मृती
चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. लोकांनी आपला पक्षांबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याची
गरज व्यक्त करत, यार्दी यांनी, राज्य शासनाचा प्लास्टीक बंदीचा निर्णय पर्यावरण आणि
पक्षी संवर्धनासाठी महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं.
****
कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात
शासकीय पुजारी नियुक्ती संबंधीचं विधेयक काल एकमतानं मंजूर झालं. यामुळे आता राज्यस्तरीय
परीक्षा घेऊन मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये महिलांसाठी
५० टक्के आरक्षणही ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी देवीच्या मूर्तीला घागरा घालण्यावरुन
निर्माण झालेल्या वादामुळे पुजेसाठी शासकीय पुजारी नेमण्याची मागणी करण्यात आली होती,
त्यासाठी शहरात गेल्या एक वर्षापासून विविध
आंदोलनं करण्यात आली होती.
*****
***
No comments:
Post a Comment