Saturday, 24 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

काँग्रेस पक्षानं संसदेच्या कामकाजात व्यत्यय न आणता काम सुरळीत चालु द्यावं, असं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी इथं प्रभाग प्रमुखांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकार कोणत्याही अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी इशान्येकडील राज्यांमध्ये २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २५ पैकी २१ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातल्या न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत तसंच न्यायाधीशांच्या रिक्त जागांबाबत कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ५५ हजार हून अधिक, उच्च न्यायालयांमध्ये ३७ लाखांपेक्षा जास्त तर कनिष्ठ स्तर न्यायालयांमध्ये दोन कोटी ६० लाखांहून अधिक प्रकरणं प्रलंबित असतानाही उच्च न्यायालयात ४०० तर कनिष्ठस्तर न्यायालयांमध्ये सहा हजार न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नसल्याचा आरोप गांधी यांनी केला.

****

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज पुन्हा हिरे व्यापारी नीरव मोदीची २५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. मंगळवारपासून ईडीसह केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयची संयुक्तरित्या नीरव मोदीच्या निवासस्थानी शोधमोहीम सुरु असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. बँकेचं साडे तेरा हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याप्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी विरोधात आर्थिक तपास संस्थेनं स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यातल्या क्षयरोग निर्मुलनासाठी शासन प्रयत्नशील असून, याबाबत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह आशा कर्मचारी यांच्याकडून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध झाल्या असून, जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचं काम आरोग्य विभागाच्या वतीनं सुरु असल्याचं ते म्हणाले.

नांदेड इथंही यानिमित्त कार्यक्रमाचं आणि जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

औरंगाबाद शहरातला कचऱ्याचा प्रश्न परस्पर सहकार्यानं सोडवण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आज शहरातल्या कचरा प्रश्नासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यावेळी बोलताना, शहरात साठलेल्या १५ हजार १६८ टन कचऱ्यापैकी १४ हजार ४६६ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली असल्याचं सांगितलं. 

****

नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन येत्या २६ ते ३० मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा उत्पादीत शेतमाल तसंच शेतकरी गट आणि महिला बचतगटांची उत्पादनं थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. शेतकरी आणि नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

‘अरविंद वैद्य स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ नागनाथ फटाले यांना, तर युवा पत्रकार पुरस्कार संकेत कुलकर्णी यांना आज ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘काळानुसार विकास’ या संकल्पनेत नवनवीन गोष्टींना नैतिकतेची जोड मिळाली तर आधीच्या पिढीचं शाश्वत विकासाचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, असं मत फटाले यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

जालना इथल्या राजा बाग शेर सवार यांच्या उरुसाला आजपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या उरुसाचं हे ७४०वं वर्ष आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, आज रात्री नऊ वाजता सुन्नी परिषद होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यासाठी २०१८ या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यात तीन एप्रिल रोजी कंधारच्या हाजी सय्याह सरवरे मगदुम ऊर्स, २३ जुलै आषाढी एकादशी आणि सहा नोव्हेंबर नरक चतुर्दशी या दिवसांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालये, तसंच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना या सुट्ट्या लागू राहणार नाहीत.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...