Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०१८ दुपारी
१.०० वा.
****
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकात सुधारणा करण्यास केंद्रीय
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे
वादग्रस्त ब्रिज अभ्यासक्रम हटवण्यात आला आहे. या
अभ्याक्रमामुळे पर्यायी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना
अॅलोपॅथी उपचार पद्धती वापरण्याची मुभा देण्यात आली होती. अपात्र
व्यावसायिकांना कडक शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. एम बी बी एस अभ्यासक्रमाच्या
अंतिम वर्षाची परीक्षा देशभरात समान पातळीवर घेण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
सर्व
शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षक
शिक्षण या तीन योजना एकत्रित करुन शालेय शिक्षणासाठी सर्वंकष योजना तयार
करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय
समितीनं मंजुरी दिली आहे. ही योजना एक एप्रिल २०१८ ते
३१ मार्च २०२०
या कालावधीसाठी असून, यासाठी
अंदाजे ७५ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
देण्यात आली आहे.
शैक्षणिक
कर्ज योजनेसाठी कर्ज हमी निधीलाही समितीनं मंजुरी
दिली आहे. केंद्रीय कर्ज अनुदान योजनेत बदल करण्यात आला असून, २०१७-१८ ते
२०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सहा हजार ६०० कोटी
रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.
****
चालू
आर्थिक वर्षात सरकारनं सार्वजनिक अंगिकृत उपक्रमांमधली गुंतवणूक काढून घेत एक लाख
कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली आहे. केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. गेल्या
वर्षी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग विकून ४६ हजार
२५० कोटी रुपये मिळाले होते, त्यापेक्षा
ही रक्कम मोठी आहे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन
विभागानं आतापर्यंत यंदाचं लक्ष्य पार केलं असून, समभाग
विक्रीतून एक लाख ५६ कोटी रुपये उभे केले असल्याचं जेटली यांनी सांगितलं.
****
नीति
आयोगानं ११५ महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी
आणि जलसंपदा, आर्थिक समावेशकता आणि कौशल्य विकासासह
पाच क्षेत्रांमधील ४९ निर्देशांकांवर आधारित बेसलाईन क्रमवारी सुरु केली आहे. देशातल्या
अतिमागास जिल्ह्यांचं जलद आणि प्रभावीपणे परिवर्तन घडवून आणण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यात ‘महत्त्वाकांक्षी
जिल्ह्यांचं परिवर्तन’ हा कार्यक्रम सुरु केला होता.
****
स्मार्ट
इंडिया हॅकथॉन २०१८ ची अंतिम फेरी उद्या आणि परवा देशभरातल्या २८ केंद्रांवर होणार
आहे. याअंतर्गत विद्यार्थी देशाचा कायापालट करण्यासाठी योगदान देऊ शकतील, अशा
आपल्या नव्या कल्पनांचा आविष्कार करतील, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि उर्जेला
आकार देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा उपक्रम आहे.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज जी- सॅट सहा ए
हा दळणवळण उपग्रह अवकाशात सोडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजून ५६ मिनिटांनी
आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन हे प्रक्षेपण
केलं जाईल. हा उच्च शक्तीचा एस बँड दळणवळण उपग्रह असून, तो
दहा वर्षं काम करेल.
****
मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्याचा निर्णय कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. पहिली ते बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी या मागणी
संदर्भात विचार करण्यात येईल, असंही तावडे यांनी सांगितलं.
****
पालघर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,
सदस्य या विविध पदांवर निवडून आलेल्या उमेदवारांबाबत ग्रामपंचायत अधिनियमातील विविध
कलमांचा भंग केल्यानं त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी
झाली. यात पाम चे माजी उपसरपंच कृणाल पिंपळे, तळासरीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष रांधे,
टेणचे धर्मेश दळवी आणि वाढवणच्या हेमा पागी यांना तीन अपत्य असल्यानं त्यांचं सदस्यत्व
रद्द करण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी
लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या ३१ मार्चपूर्वी करण्याचे निर्देश
शासनानं स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या ५४
गावांमधून जात असलेल्या या समृद्धी महामार्गासाठी एकूण ९८८ पूर्णांक २५ हेक्टर जमीन
संपादित केली जाणार आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याबद्दल ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानं स्टीव्ह स्मिथ
आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची आंतरराष्ट्रीय
सामना खेळण्याची बंदी घातली आहे. तर या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कॅमेरॉन
बॅनक्रॉफ्ट याला नऊ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment