Tuesday, 20 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रोसिटी कायद्यातंर्गत तत्काळ अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. आज यासंदर्भात झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं, अशा प्रकरणांमध्ये अटकेपूर्वी प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. सरकारी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं आढळून आल्यामुळे, हा निर्णय दिल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीनेच अटक करता येईल, तसंच अटक झालेल्या लोकसेवकांना जामीन देण्यास मनाई नसल्याचंही, न्यायालयानं नमूद केलं आहे.

****

आर्थिक आमिषातून फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी, ठेवीदार संरक्षण कायद्यात दुरुस्ती करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. सदस्य प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. चालू अधिवेशनात पुढच्या आठवड्यात, यासंदर्भातलं विधेयक आणलं जाईल, भविष्यात अशा घटनांमधून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जागृती करणं आवश्यक असून, त्यासाठी महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या खासगी शाळांच्या भरमसाठ शुल्क वाढी विरोधात, नवीन शैक्षणिक वर्षांपासून शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार किंवा दाद मागता येणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. शैक्षणिक संस्था शुल्क विनियम अधिनियमात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही.जी.पळशीकर समितीनं आपल्या अहवालात सुचवलेली ही शिफारश शासनानं मान्य केली असल्याचं, तावडे यांनी सांगितलं. शैक्षणिक शुल्काबाबत तक्रार करणाऱ्या पालकांची संख्या २५ टक्क्यांच्या वर असल्यास शुल्क नियंत्रण समितीनं याची दखल घेऊन सुनावणी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचं तावडे म्हणाले.

तसंच शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सक्ती झाल्यासही, शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार नोंदवता येणार आहे. या समितीने दिलेल्या निर्णयात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.

****

पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत टाकून, परीक्षा प्रक्रियेतून कायमस्वरुपी बाद करणार असल्याचं, तावडे यांनी विधान परिषदेत सांगितलं. दहावी तसंच बारावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी ते बोलत होते. काँग्रेसचे संजय दत्त यांनी, काल कल्याण इथं, दहावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा, तसंच याआधी २८ फेब्रुवारीला रसायन शास्त्र, आठ मार्चला इंग्रजी, आणि १६ मार्चला पुन्हा विज्ञानाची प्रश्नपत्रिका फुटल्याकडे लक्ष वेधलं. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी हे अधिवेशन संपण्यापूर्वी तज्ज्ञांची बैठक घेऊन, ठोस उपाययोजना केली जाईल, असं तावडे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगारांच्या कक्षेत आणून, त्यांचा समावेश असंघटीत कामगार कल्याण मंहामंडळात केला जाईल आणि हे महामंडळ ३१ मार्चपूर्वी अस्तित्वात येईल, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिली. मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना वृत्तपत्र विक्रेत्यांना लागू करणार असल्याचं ते म्हणाले. सुनिल प्रभू यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

****

मुस्लिम समाजाचा विकास अणि उत्कर्षासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचं, अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेत ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. मुस्लिम समाजातल्या विविध घटकांसाठी सरकारनं विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्याचं, ते म्हणाले.

****

लघुउद्योजकांना परवडतील अशा दरात औद्योगित वसाहतींमध्ये गाळे उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. या चर्चेत बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी, औरंगाबाद शहरात चारशेपेक्षा जास्त लघुउद्योजक असून, त्यांना भाड्याच्या अपुऱ्या जागेत उद्योग चालवताना अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. लघुउद्योजकांना स्वस्तात गाळे अथवा भूखंड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या पाचलेगाव इथं श्री स्वामी संचारेश्वर संस्थानच्या वतीनं आजपासून २८ मार्चपर्यंत ‘सहस्त्रचंडी महायागा’चं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त आज याठिकाणी कलश मिरवणूक काढण्यात आली, पुढच्या बुधवारपर्यंत दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आयोजित कृषी महोत्सवाचा उद्या समारोप होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून या महोत्सवाला स्थानिकांचा विशेषत: महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments: