आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांची एकशे सत्ताविसावी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज संसद भवन परिसरातल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
डॉ. आंबेडकरांनी महिला आणि उपेक्षित वर्गाला समान अधिकार मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न
केल्याचं राष्ट्रपती म्हणाले. आपल्याला संविधान देणाऱ्या महामानवाला नमन करण्याचा हा
दिवस असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले, तर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात आंबेडकरांनी
देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देश सदैव त्यांचा ॠणी राहील, असं नमूद केलं. राष्ट्रपती आज मध्यप्रदेशात महू इथं बाबासाहेबांच्या जन्मस्थळी
त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत.
****
आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रातही डॉ. आबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक ॠषीकेश कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती
होती. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तीविकासाची मांडणी केल्याचं कांबळे यांनी यावेळी
सांगितलं.
****
अहमदनगर पोलीस अधीक्षक
कार्यालयात तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन
कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कर्डिले यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना
काल न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं आमदार कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना
न्यायालयीन कोठडी सुनावली तर याप्रकरणी काल अटक केलेल्या चार आरोपींना १६ एप्रिलपर्यत
पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
शिक्षणातून दुष्काळ
निवारण्याचं भान निर्माण होईल असं मत पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं
आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं क्रांतीसिंह नानासाहेब पाटील वसतीगृहाचं भूमिपूजन
काल लहाने यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, डॉ. लहाने यांनी काल
सेलू इथल्या उपजिल्हा रुग्णलायात आयोजित मोफत
नेत्र तपासणी शिबिरात रुग्णांची तपासणी केली.
*****
***
No comments:
Post a Comment