Friday, 13 July 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.07.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १३ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****

·       नाणार प्रकल्पावरुन झालेल्या गदारोळामुळे विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

·       आर्थिक दुर्बल घटकांसाठी शंभर टक्के मोफत उपचार देण्याची राज्यसरकारची योजना

·       साधू वासवानी मिशनचे प्रमुख, दादा वासवानी यांचं निधन

·       आषाढी वारीसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार

आणि

·       पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर आठ गडी राखून विजय

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांबरोबरच शिवसेनेच्या आमदारांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी लावून धरली. विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याविषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. सरकारच्या घटक पक्षांमध्ये या प्रकल्पाबाबत विसंगती असून शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी हा आरोप फेटाळत, नाणार प्रकल्प रद्द व्हावा हीच शिवसेनेची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. मात्र विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. गदारोळ वाढत गेल्यामुळे, सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.



विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, नियम ९७ अंतर्गत या विषयावर मतदानासह चर्चेचा प्रस्ताव मांडला, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो फेटाळून लावला. सरकारनं या नाणार प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या दोन्ही पक्षांसह शिवसेनेनंही लावून धरल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

भटक्या विमुक्त समाजात स्थैर्य आणून त्यांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करावी,तसंच सामाजिक माध्यमांवर नियंत्रण आणण्याची मागणी काल विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली.धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं, संशयावरून पाच जणांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान, सदस्यांनी ही मागणी केली. सरकार भटक्या विमुक्तांच्या पाठीशी असून, त्यांची जनगणना करुन त्यांना ओळखपत्र द्यायला पाहिजे, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर यांनी मांडलं.

****

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म किंवा अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचं, सरकारनं स्पष्ट केलं आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

केंद्र सरकारने २०१४ मध्ये पाठवलेल्या अभिप्रायामध्ये लिंगायत समाज हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचं म्हटलं आहे. २०१३ मध्ये केंद्री गृह मंत्रालयानंही असाच अभिप्राय दिला होता, त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देता येणार नाही, असं तावडे यांनी लेखी उत्तरात म्हटल आहे.

***

भारतीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डनं नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. गरीबीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याची, तसंच कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आरोग्य विमा पुरवण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नसल्याचं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं. आधारकार्ड असलेल्या आणि नसलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत सुमारे १० कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा पुरवण्यात येणार आहे

****

राज्यातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतल्या नागरिकांना कोणत्याही आजारासाठी अनुदानाऐवजी शंभर टक्के मोफत उपचार उपलब्ध करुन देणारी योजना, आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधान परिषदेत दिली. मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाच्या औषधावरील वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याचा प्रस्ताव, वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. हाफकिन संस्थेकडून होणारा औषध पुरवठा येत्या सहा महिन्यात सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

****

केंद्र शासनाच्या पोषण अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज नागपूर इथून होणार आहे. जागतिक महिला दिनी गेल्या आठ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

साधू वासवानी मिशनचे प्रमुख, सिंधी समाजाचे धार्मिक गुरु दादा वासवानी यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते ९९ वर्षांचे होते. वासवानी यांनी मानवता, शांतता, प्राणी हक्क आणि शाकाहाराचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वासवानी यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन आणि समाज सेवे प्रति त्यांचं समर्पण नेहमी स्मरणात राहणार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर वासवानी यांच्या निधनानं मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

वासवानी यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पुण्यात समाधी संस्कार करण्यात येणार आहेत.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातली ३० खेडी पाणी पुरवठा योजना लवकरच सुरु करण्यात येईल अशी ग्वाही पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. नागपूर इथं यासंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेनं या संदर्भातला अहवाल येत्या १५ दिवसात सादर करावा असे निर्देश लोणीकर यांनी दिले.

दरम्यान, लातूर शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितलं. काल लातूर इथं, केंद्र शासनाच्या विविध योजनांच्यो अंमलबजावणीबाबत आढावा घेताना ते बोलत होते.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज अनुक्रमे बारामती आणि लोणंद मुक्कामी पोहोचतील.

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद ही गाडी आदिलाबादहून २२ जुलैला सकाळी नऊ वाजता सुटेल. नांदेड, परभणी, परळी, लातूर रोड मार्गे पंढरपूरला रात्री साडेअकरा वाजता ती पोहोचेल. लातूर रोड स्थानकावर या गाडीला बिदर - पंढरपूर गाडीचे डबे जोडण्यात येतील. तर परतीच्या प्रवासात ही गाडी २४ जुलैला सकाळी साडेपाच वाजता निघून आदिलाबादला रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान पोहोचेल.

नगरसोल -पंढरपूर- नगरसोल ही गाडी नगरसोलहून २२ जुलैला संध्याकाळी साडेपाच वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, परळी, लातूर रोड मार्गे पंढरपूरला सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. परभणी स्थानकावर या गाडीला अकोला पंढरपूर या गाडीचे डबे जोडण्यात येतील. परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूरहून रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटून २५ जुलैला दुपारी दीड वाजता नगरसोलला पोहोचेल.

****

दरम्यान, नांदेडहून अकोला मार्गे अमृतसर ला जाणारी साप्ताहिक रेल्वेगाडी येत्या २५ जुलै आणि एक ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. अमृतसर- नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मात्र या दिवशी नियमितपणे धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

****

क्रिकेट

कुलदीप यादवचे पंचवीस धावात सहा बळी आणि रोहित शर्माच्या नाबाद १३७ धावांच्या बळावर भारतानं इंग्लंडवर काल आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंड संघानं, सर्वबाद २६८ धावा केल्या, भारतीय संघानं चाळीस षटक आणि एका चेंडूत दोन गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पुढचा सामना उद्या, लंडनच्या लॉर्डस् मैदानावर खेळला जाणार आहे.

****

थायलंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्यावर २१-१६, २१-१४ असा सहज विजय मिळवला. आज अमेरिकेच्या सोनिया चेहबरोबर तिचा उपांत्यपूर्व सामना होणार आहे.

****

उस्मानाबाद इथल्या पुरोगामी विचारमंचतर्फे दिला जाणारा उद्धव पाटील जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंके यांना काल प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

विद्युत विभागानं जालना जिल्ह्यातल्या कोणत्याही गावाचा वीज पुरवठा खंडित करु नये, अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या आहेत. जालना विधानसभा मतदार संघातल्या वीज पुरवठ्या संबंधीच्या समस्यांवर चर्चेसाठी काल जालना इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...