Saturday, 2 March 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD AURANGABAD 02.03.2019 11.00AM




आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट आय एन या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

****



 वाळू वाहतुकीसाठी एक लाख वीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला औरंगाबाद इथल्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. विजय गायकवाड असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातल्या गोंदी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. गायकवाडसह त्याच्या एका साथीदाराला काल लाचेची रक्कम घेताना, रंगेहात अटक करण्यात आली.

****



 हिंगोली इथल्या पत्रकार शांताबाई मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. हिंगोली इथून प्रसिद्ध होणाऱ्या 'साप्ताहिक हिंगोली समाचार' या वर्तमान पत्राच्या त्या संपादक आहेत.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हैद्राबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजेपासून सामन्याला सुरूवात होईल. या आधी या दोन्ही संघादरम्यान झालेली, दोन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं, दोन शून्यनं जिंकली आहे.

****



 धनगर समाजाच्या मागण्यांवर निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील निलंगेकर या मंत्र्यांचा समावेश आहे. या उपसमितीची पहिली बैठक आज होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...