Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशातील दहशतवाद समूळ नष्ट करणं
आवश्यक आहे कारण त्यामुळे सुरक्षेवर होणारा खर्च गरिबांसाठी उपयोगात आणता येईल, असं भाजपचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. ते आज दरभंगा इथं प्रचार सभेत बोलत होते. दहशतवादी तसंच त्यांना मदत करणाऱ्यांना त्यांच्या
घरात घुसून संपवलं जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. जे पक्ष केवळ काही जागांवर
निवडणूक लढवत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान बनण्यासाठी रांगेत उभे आहेत, अशी टीकाही
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला
तीनच दिवस शिल्लक असल्यानं, प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ,
जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची
काल नाशिक जिल्ह्यात गिरणारे इथं, प्रचारसभा झाली. पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात
टाकण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस हे वयानं लहान आहेत, त्यातच ते
अपघाताने मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांनी जपून टीका करावी असा सल्ला पवार यांनी यावेळी
दिला. नाशिक इथं काल शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा झाली. सैनिकांच्या शौर्याचे
राजकारण आम्ही करणार नाही, मात्र विरोधकांनी किमान सैनिकांच्या शौर्याविषयी शंका घेऊ
नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पालघर मतदार संघातल्या नालासोपारा इथं काल भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विजय संकल्प सभा घेतली.
शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नेवासा इथं सभा घेतली.
दरम्यान, नंदुरबार मतदार संघात, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण यांच्या आज तीन सभा होणार आहेत.
****
ईव्हीएम यंत्रांबरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी
करण्याबाबत न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा फेरआढावा घेण्याची मागणी विरोधी पक्षांच्या
२१ नेत्यांनी सर्वोच्च
न्यायालयाकडे केली आहे. किमान ५० टक्के
व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी केली जावी अशी विनंती या नेत्यांनी पुन्हा एकदा केली
आहे. न्यायालयानं याआधी यासंदर्भातली याचिका फेटाळली होती, आणि या निवडणुकीत प्रत्येक
विधानसभा मतदार संघातल्या किमान पाच केंद्रांवर ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची
पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, पाच मतदान केंद्रांची संख्या
पुरेशी नसल्याचं
सांगत या आदेशाचा फेरआढावा घेण्याची
मागणी या नेत्यांनी केली आहे.
****
जम्मू-कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात
बीजबेहरा इथं आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन
दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली
होती. त्याआधारे काल रात्री शोधमोहीम सुरु करण्यात आली. या मोहीमे दरम्यानच दहशतवाद्यां
सोबत चकमक सुरु झाली अशी माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडची
शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला आहे, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
****
बुलडाणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
दाखल याचिकेवरून बुलडाणा जिल्ह्यातील वाळू घाट लिलावात स्थगिती देण्यात आली आहे. बुलडाणा अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या पार्श्र्वभूमीवर
या सर्व वाळूघाटा मधील वाळू उत्खनन आणि वाहतूक बंद करण्याची कार्यवाही सुरू केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं ग्राहाकाला
पाच हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला काल रात्री
उशिरा अटक केली आहे. चांदूरबिस्वा येथील एका ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये बिघाड झाला
आहे. हा बिघाड ग्राहकानं स्वत:हून केला असा आरोप करंत ही लाच मागण्यात आली होती. या
प्रकरणी वडनेर भोलजी इथले महावितरणचे सहायक अभियंता अनंत प्रल्हाद वराडे आणि एका कंत्राटी
कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
****
बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या ज्ञानगंगा
अभयारण्याच्या बुलडाणा विभागामधील गोंधनखेड बिट मध्ये काल रात्री आग लागून मोठ्या प्रमाणात
जंगल संपत्तीचं नुकसान झालं. वीडी, सिगारेट सेवनातून ही आग लागली असण्याची शक्यता वनविभागानं
वर्तवली असून आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स
आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलाकाता इथं रात्री आठ वाजता सामना होणार आहे. काल रात्री
बंगळुरु इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा १७ धावांनी पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment