Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
April 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००
****
लोकसभा
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे. या टप्प्यात नऊ
राज्यातल्या 71 मतदारसंघांमधे येत्या सोमवारी मतदान होणार आहे. प्रचार संपण्यासाठी आता तीन दिवस शिल्लक आहेत. आज विविध
राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. भाजप नेते सुरेश प्रभू यांच्या
दोन सभा आज सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी धुळे आणि मालेगाव - झोडगे इथं होत आहेत.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारासाठी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि पृथ्वीराज चव्हाण माटुंगा इथं सभा घेणार आहेत.
शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला
सीतारामन यांची जाहीर सभा शीव कोळीवाड्यात रात्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा तळेगाव दाभाडे इथं होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आज चार सभा घेत आहेत. ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी राज्याच्या
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सामाजिक न्याय
मंत्री दिलीप कांबळे यांची सभा घाटकोपर पूर्वमध्ये होत आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव
ठाकरे चाकणच्या बाजार समितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी तर सांगवीमध्ये
श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतील.
दरम्यान,
भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाराणसी मतदारसंघात
`रोड शो` केला असून ते उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या राज्यात प्रचारसभा
घेणार आहेत. मोदी यांची सभा बांद्रा कुर्ला मैदानावर होणार आहे तर साधारण त्याच वेळी
राहुल गांधी यांची सभा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातील संगमनेर इथं
होणार आहे.
चौथ्या
टप्प्यात महाराष्ट्रातल्या 17, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी 13, पश्चिम
बंगालमधल्या आठ, ओदिशा आणि मध्य प्रदेशातल्या सहा, बिहारमधल्या पाच, झारखंडमधल्या तीन
मतदारसंघात, तसंच जम्मू-कश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या
सर्व मतदार केंद्रांवर सोमवारी मतदान होणार आहे. लोकसभेच्या 71 जागांबरोबरच ओदिशा विधानसभेच्या
एकूण 147 जागांपैकी 42 जागांसाठी देखील या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान ओदिशातल्या
आठ मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे. नागालँडमधल्या त्युई विधानसभा मतदारसंघातल्या
एका मतदान केंद्रावरही आज फेरमतदान होत आहे. उत्तरप्रदेशात आग्रा लोकसभा मतदारसंघातल्याही
एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करून गेल्या निवडणुकीत केले्ल्या चुकीची पुनरावृत्ती
करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं
आहे. ते आज शिर्डीतील वंचित बहुजन आघाडीचे
उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारासाठी कोपरगाव इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
चलन विमुद्रीकरणामुळं देशातील काळ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
****
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग
जिल्ह्यातील आज सकाळी मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुल मुजाहीदीनचा
असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिजहेडामध्ये झालेल्या चकमकीत हे दोन दहशतवादी ठार झाल्याचं
सुरक्षा दलांनी स्पष्ट केलं आहे.
****
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट
सेवा देण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याची ग्वाही महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय
संचालक संजीव कुमार यांनी दिली आहे. संजीव कुमार यांनी, आज दूरदृष्य संवाद प्रणाली
- व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. दर्जेदार आणि अखंडित
वीजपुरवठा मिळावा, यासाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामं अधिक नियोजनबध्दपणे सातत्यानं
करावीत. असे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. मराठवाड्यासह
धुळे आणि विदर्भातल्या ग्राहक प्रतिनिधींनी या संवादात सहभाग नोंदवला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात मुंबई - नागपूर महामार्गावरील भीषण
अपघातात आज दोघांचा मृत्यू झाला. वैजापूर तालुक्यातल्या दत्तवाडी इथं ट्रक आणि मोटार
एकमेकावर आदळून झालेल्या या अपघातात मोटारीतील दोघं मृत्यूमुखी पडले.
****
सातारा शहर आणि तालुक्याच्या विविध भागात वादळी वारा
, मेघ गर्जनेसह हलक्या स्वरूपातील अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळं उकाड्यापासून
सातारावासीयांना दिलासा मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment