Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा.
****
श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं गेल्या रविवारी झालेल्या
भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर देशातली परिस्थिती आता सुधारत असल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान
रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे. कोलंबो मधल्या आकाशवाणी प्रतिनिधीला दिलेल्या
एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. द्वीप राष्ट्रांत सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांची
अधिक माहिती सुरक्षा दलांमार्फत गोळा केली जात असून, दररोज नवीन पुरावे शोधले जात आहेत,
तसंच विदेशी तपास संस्थांचंही सहकार्य मिळत असल्याचं ते म्हणाले. भविष्यात सरकार अशा
गोष्टींचा गंभीरपणे विचार करेल. या हल्ल्यांमुळे देशातील पर्यटन व्यवसायावर परिणाम
झाला असला, तरी ऑगस्टनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
बिहार मधल्या पाटणा न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष
राहुल गांधी यांना २० मे पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारचे
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनुसार
हे निर्देश देण्यात आले आहेत. मानहानीच्या याचिकेत त्यांनी राहुल गांधी यांच्या, मोदी
आडनाव असलेले सर्व चोर आहेत, या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे
आपली प्रतिमा खराब झाल्याचा दावा या याचिकेत त्यांनी केला आहे.
****
निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कमळ
चिन्हाच्या खाली भारतीय जनता पक्षाच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप कॉंग्रेस, तृणमूल
आणि राष्ट्रवादी काँग्रेससह पाच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे. ईव्हीएमवर
कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख करणं हे निवडणूक निकषांचं उल्लंघन आहे, असं कॉंग्रेस नेते
अभिषेक मनु सिंघवी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. या प्रतिनिधींनी
आयोगास पुढील सर्व टप्प्यांत होणाऱ्या मतदानापूर्वी ही मतदान यंत्रं बदलण्याची मागणी
केली आहे.
पश्चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी
ईव्हीएम कार्यान्वित केलं जात असताना, त्यावर भाजपचं नाव नमूद असल्याचा आरोप तृणमूलचे
नेते दिनेश त्रिवेदी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी हे ही
या शिष्टमंडळाचा भाग होते. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भाजपने आदर्श आचारसंहितेचे
उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
****
एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये काल झालेल्या बिघाडामुळं
आजही १३७ उड्डाणांना उशीर होणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं काल पहाटे साडे तीन वाजे
पासून रात्री पावणे नऊपर्यंत सर्व्हर बंद राहिलं. त्यामुळे जवळपास दीडशे उड्डाणांना
उशीर झाल्यानं जगभरात अनेक प्रवासी विमानतळांवर अडकलेले
आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात चितेगाव इथं
व्हिडिओकॉन कंपनीत भंगार आणि कच्च्या मालाला आग लागल्याची घटना आज पहाटे तीनच्या सुमारास
घडली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. यात कोणतीही
जीवितहानी झालेली नाही.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सापुतारा घाटात प्रवासी बसला
झालेल्या अपघातात १२ प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. ब्रेक निकामी होऊन चालकाचा बसवरील
ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. गुजरातमधल्या सूरत
इथून शिर्डीकडे ही बस निघाली होती. यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते.
****
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेला ट्रक उलटल्यानं, सोलापूर
जिल्ह्यातल्या बार्शी-भूम राज्य मार्गावर चुंब जवळ अपघात झाला आहे. या अपघातात ३ जण
गंभीर, तर २० जण किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
भारतीय क्रिकेट
नियामक मंडळ- बीसीसीआयनं अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह,
रविंद्र जडेजा आणि पूनम यादव या क्रिकेटपटूंना नामांकन
देण्यात आली आहेत. नवी दिल्लीतल्या
प्रशासनाच्या सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला असल्याचं या बाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment