Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८
एप्रिल २०१९ - २०.००
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होत आहे. या टप्प्यात नऊ
राज्यातल्या एकूण ७१ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबईतल्या
सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी,
मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा तसंच पोलीस प्रशासन यंत्रणा
सज्ज झाली आहे.
निवडणूक कर्मचारी सर्व साहित्या घेऊन मतदार केंद्रांवर पोहोचले आहेत. या टप्प्यात
भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री
उर्मिला मातोंडकर केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भूजबळ, पार्थ
पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य
उद्या मतदार यंत्रात बंद होणार आहे.
या १७ मतदारसंघात तीन कोटी ११ लाख ब्याण्णव हजार ८२३ मतदार आहेत. मतदानाचा टक्का
वाढवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं विविध उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग मतदारांना
मतदान केंद्रावर जाण्यासाठी सोयीच्या दृष्टीनं वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान
केंद्र असणार आहे.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव
बाह्य या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एक हजार ९४० मतदान केंद्रांवर एकूण १९
लाख चार हजार ८५९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
****
नंदुरबार मतदारसंघात १८ लाख ७१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी
दोन हजार १५० केंद्रे आहेत. यात सात ठिकाणी सखी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
यातील विविध तालुक्यांतल्या दहा टक्के मतदार केंद्रांची थेट वेब कास्टिंग केली जाणार
असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघांसाठी आज मतदान केंद्रांसाठी
कर्मचारी आणि साहित्य रवाना झाले आहे. दोन्ही मतदार संघात चार हजार ७२० मतदान केंद्रे
आहेत. या निवडणुकीसाठी २४ हजार ७२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी मतदार संघात या निवडणुकीसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.
एक हजार ७१० मतदान केंद्रावर १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार
आहेत. प्रत्येक मतदारानं मुक्त आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय
अधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षानं गोव्यातल्या पणजी विधानसभा पोट निवडणुकीसाठी सिद्धार्थ
कुंकलीयनेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे
या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
****
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या नवी मुंबई परीसरात खांदेश्वर इथल्या
देवत गावात आज शिवसेना कार्यकर्त्याला २६ हजार रुपये आणि
मतदान पावत्यांसह पकडण्यात आलं. तर पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून
२०० रुपयांची पाकिटं निवडणूक आयोगाच्या पथकानं जप्त केली आहेत. तर काल पनवेलमध्ये कामोठे इथं एकाला मतदार यादी आणि वीस हजार रूपयांच्या रक्कमेसह,
मतदारांना पैसे वाटप करतांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले होते.
****
निवडणूक
आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कमळ चिन्हाच्या खाली भारतीय जनता पक्षाच्या नावाचा
उल्लेख केल्याचा आरोप कॉंग्रेस, तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेससह पाच राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींनी केला आहे. ईव्हीएमवर कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख करणं हे निवडणूक निकषांचं
उल्लंघन आहे, असं कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी
बोलताना म्हटलं आहे. या प्रतिनिधींनी आयोगास पुढील सर्व टप्प्यांत होणाऱ्या मतदानापूर्वी
ही मतदान यंत्रं बदलण्याची मागणी केली आहे.
****
पश्चिम
बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ईव्हीएम कार्यान्वित केलं जात
असताना, त्यावर भाजपचं नाव नमूद असल्याचा आरोप तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी यांनी
केला आहे.
****
No comments:
Post a Comment