Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 21 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०१९ सकाळी ७.१० मि.
****
§
वैद्यकीय पदव्युत्तर
अभ्यासक्रमांतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठीचा
अध्यादेश जारी
§
राज्यातल्या २० जिल्ह्यांमधल्या
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच पोटनिवडणुकांसाठी २३ जून रोजी मतदान; आचारसंहिता
लागू
§
मराठवाडा साहित्य
परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर
आणि
§
राज्यात काल विविध
जिल्ह्यात झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू
****
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठीचा, अध्यादेश
काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या स्वाक्षरीनं जारी करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळानं
घेतलेल्या निर्णयानुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास -एस ई बी सी- वर्गासाठी
देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू करण्यासाठी हा अध्यादेश
काढण्यात आला.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची
प्रवेश प्रक्रिया, हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी सुरू झाली असल्यामुळे एसईबीसी
वर्गासाठी असलेलं आरक्षण लागू करता येणार नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठानं दिला होता, हा निकाल सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला होता. यामुळे
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले होते. या विद्यार्थ्यांना आता
या अध्यादेशामुळे दिलासा मिळणार आहे. आरक्षणामुळे, खुल्या प्रवर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांना
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची
प्रतिपूर्ती करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतलेला
आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या
एका रिक्त जागेसाठी सात जून ला निवडणूक होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत
मतदान आणि सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. परिषदेचे सदस्य शिवाजीराव देशमुख
यांचं गेल्या १४ जानेवारीला निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
****
राज्यातल्या २० जिल्ह्यांमधल्या
१४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध
ग्रामपंचायतींमधल्या सहा हजार ७१९ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात
२३ जून रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती
दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार, नांदेड नऊ, उस्मानाबाद तीन, लातूर दोन,
तर परभणी जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातही दहा ग्रामपंचायतींमध्ये
निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुकांसाठी ३१ मे ते सहा जून दरम्यान नामनिर्देशनपत्रं
स्वीकारली जाणार असून, २३ जूनला मतदान तर २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व संबंधित
ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.
****
कोयना धरणातला जलसाठा कमी
झाल्यामुळे राज्यात वीज टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या
चौथ्या टप्प्यातून एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. १०५ दशलक्ष घनफूट जलसाठवण क्षमता
असलेल्या या धरणात सध्या फक्त २८ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. या साठ्यासह, जलविद्युत
प्रकल्पाच्या या चौथ्या टप्प्यात फक्त नऊ दशलक्ष घनफूट साठा उपलब्ध असेल, हा साठा पुढच्या
काही दिवसांसाठी पुरेसा असेल, असं यासंदर्भात जारी निवेदनात म्हटलं आहे.
****
भाजप सरकार हे दुष्काळाकडे
पक्षीय दृष्टीकोनातून बघत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या वतीनं काल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांचा
मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व करताना, जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर हा
आरोप केला. कर्नाटकात जनावरांना दावणीला चारा दिला जातोय, मात्र महाराष्ट्रात ना चारा
- ना चारा छावण्या अशी स्थिती असल्याचं, पाटील म्हणाले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा
जीवनगौरव पुरस्कार यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाला आहे.
मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. साहित्य क्षेत्रासह
मराठवाडा साहित्य परिषदेतलं त्यांचं योगदान लक्षात घेता, जीवनगौरव पुरस्कारासाठी चपळगावकर
यांची एकमतानं निवड झाल्याचं ठाले म्हणाले.
****
राज्यात मराठी शिक्षण कायदा
लागू व्हावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी प्राधिकरण स्थापन व्हावं, अशी मागणी
मराठवाडा साहित्य परिषदेनं केली आहे. ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. याबाबत परिषद लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं ठाले पाटील
यांनी सांगितलं. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांनी आपल्या भाषांसाठी कायदा
करून भाषा शिक्षण धोरणाची अंमलबजावणीही सुरू केली आहे. विधानसभेच्या येत्या अधिवेशनात
राज्य शासनानंही असा कायदा करावा, यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, असंही ठालेपाटील
म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांना आज २८ व्या पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन केलं जात आहे. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये पेरुम्बुदूर इथं,
एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी, बॉम्बस्फोट घडवून गांधी यांची हत्या केली होती. राजीव गांधी
यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज देशभरात अभिवादन सभांसह, अनेक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल विविध जिल्ह्यात
झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं काल भीषण
अपघातात १३ जण ठार झाले. भरधाव कंटेनरचा टायर फुटल्यानं, हा कंटेनर प्रवासी वाहुतक
करणाऱ्या एका वाहनावर आदळून हा अपघात झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे
या मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती.
रायगड जिल्ह्यात खालापूर
हद्दीत माडप नजीक खासगी प्रवासी बस आणि भरधाव मोटारीच्या अपघातात दोघं मृत्यूमुखी पडले.
काल सकाळी साडे सात वाजता हा अपघात घडला. मृतांमध्ये मोटारीचा चालक आणि एका प्रवाशाचा
समावेश आहे. हे सर्वजण महाबळेश्वर इथं सहलीसाठी निघाले होते.
नाशिक जिल्ह्यात रस्ता
अपघातात चार जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री वणी इथं देवदर्शनाहून
परतत असलेल्या भाविकांचं नादुरुस्त वाहन रस्त्याच्या कडेला उभं असताना, भरधाव ट्रकनं
या वाहनाला धडक दिल्यानं, ही दुर्घटना घडली.
परभणी जिल्ह्यातही भरधाव
टेंपो झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. जिंतूर
येलदरी रस्त्यावर शेवडी पाटी इथं, काल दुपारी ही घटना घडली. टेंपोचालकाचं वाहनावरचं
नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी परभणी इथल्या खाजगी रुग्णालयात
दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबादजवळ मिटमिटा इथं
वाळूनं भरलेला हायवा ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात सतरा वर्षीय तरूणीचा मृत्यू
झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. काल रात्री हा अपघात घडला. भरधाव असलेल्या हायवा
ट्रकनं अचानक वळण घेतल्यामुळं हा अपघात घडला.
लातूर औसा रस्त्यावर एका
कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन दोन जण ठार झाले, काल सायंकाळी हा स्फोट झाला.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव
इथल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातला कनिष्ठ लिपिक विशाल लोहार याला लाचलुचपत प्रतिबंधक
खात्याच्या पथकानं काल लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सात -बारा उताऱ्यावर वारस नोंद
लावण्यासंदर्भात दाखल अपिलाचा अनुकूल निकाल लावण्यासाठी, लोहार आणि मध्यस्थ नाना जाधव
यांनी एक लाख पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार रूपये घेतांना
काल लोहार याला अटक करण्यात आली. मध्यस्थ जाधव मात्र फरार आहे.
****
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
निर्मितीत अग्रेसर असलेल्या अमूल कंपनीनं दुधाच्या विक्री दरात लीटरमागे दोन रुपयांनी
वाढ केली आहे. आजपासून हे वाढीव दर लागू होतील. उत्पादन खर्चात झालेली वाढ तसंच दूध
उत्पादकांना दुधाचा चांगला दर देता यावा, यासाठी सुमारे दोन वर्षांनंतर विक्री दरात
वाढ केल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या
इचलकरंजी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्यासह बारा जणांविरुद्ध संघटित
गुन्हेगारी कारवाया प्रतिबंधक कायदा - मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीच्या
कथित बेकायदेशीर व्यवहारांच्या कायदेशीर बाजू सांभाळणारे विधिज्ञ पवन कुमार उपाध्ये
यांनादेखील मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ३० पेक्षा
अधिक संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात अमळनेर
नगरपालिकेच्या २२ नगरसेवकांना जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा अपात्र ठरवलं
आहे. अतिक्रमण हटाव कारवाई प्रकरणी अधिकाराचा गैरफायदा घेतल्याच्या कारणावरून ही कारवाई
करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी
राखून ठेवला आहे. जानेवारी २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांसह २२
नगरसेवकांना अपात्र ठरवलं होतं. मात्र नगरविकास राज्यमंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती
दिली होती. न्यायालयानं या प्रकरणी राज्यमंत्र्यांना दोन आठवड्यात निर्णय घेण्याच्या
सूचना दिल्या होत्या, त्यानुसार काल पुन्हा या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं.
****
मुंबई पोलिसांच्या अंमली
पदार्थविरोधी पथकानं गोरेगाव इथं चार नायजेरियन नागरिकांना अटक करून दोन लाख ४० हजार
रूपयांचं कोकेन जप्त केलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment