Sunday, 16 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस कायदा तयार करण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारांना निर्देश
Ø  द्यापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनापूर्वी, राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार
Ø  नदी जोड प्रकल्पातून मराठवाडा येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करणार - मुख्यमंत्री  
Ø  शिधापत्रिका धारकांना कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करून देणं बंधनकारक
आणि
Ø  मराठवाड्याच्या विकासासाठी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन पीक पध्दती स्वीकारण्याची आवश्यकता जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्याकडून व्यक्त
****

 डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक ठोस कायदा तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून हे निर्देश दिले. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधल्या घटनेनंतर देशभरात अनेक ठिकाणचे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली होती.
****

 संसदेच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सरकार विरोधी पक्षाला सहकार्य करण्याचं आवाहन करेल, अशी शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवली आहे.
****

 राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव मुंबईत राजभवन इथं सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ देतील. भाजपचे अनिल बोंडे, रिपाईचे आठवले गटाचे अविनाश महातेकर यांच्यासह आशिष शेलार, राधाकृष्ण विखेपाटील, जयदत्त क्षीरसागर, अतुल सावे यांची नावं या विस्तारासाठी चर्चेत आहेत. उद्यापासून सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मंत्रिमंडळ विस्ताराला उपस्थित नसतील, ठाकरे आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित अठरा खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत.
****

 लोकसभेत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून रत्नागिरी-सिंधर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांनी संसदीय कामकाज मंत्रालयाला याबाबत पत्र दिलं आहे.
****

 केंद्र आणि राज्यशासनाच्या सहकार्यानं नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. गोदावरी खोऱ्यात जास्तीत-जास्त पाणी आणण्याचं नियोजन असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****

 राज्य महिला आयोगाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘प्रज्वला योजने’च्या माध्यमातून राज्यातल्या तीन लाख बचतगटांद्वारे साठ लाख महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी दिली. या योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ काल विजया रहाटकर यांच्या हस्ते नंदुरबार इथं झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते.
****

 दुधाच्या पिशव्यांचं पुनर्निमाण केल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मुक्ती होईल असं मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केलं आहे. दुध वितरण करणाऱ्या प्लास्टीकवर उपाययोजनांसंदर्भात, काल मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यासाठी प्रभावी कार्यपद्धती अवलंबल्यास राज्यातून लवकरच प्लास्टिक हद्दपार होईल असं कदम म्हणाले.
****

 राज्यशासन येत्या काळात प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचं काल तावडे यांच्या हस्ते वितरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 शिधापत्रिका धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य घ्यायला आल्यास त्याला धान्य उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबतचं परिपत्रक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आलं असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी काल दिली. रास्तभाव दुकानदार महिन्यातल्या ठराविक तारखेनंतर धान्य उपलब्ध करून देत नाहीत अशा तक्रारी विभागाकडे आल्या होत्या, त्यांची दखल घेऊन हा निर्णय घेतला असलाचं रावल यांनी सांगितलं.
 ****

 ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट झाला असून, शाळांमधल्या विद्यार्थी संख्येत २३ हजारांनी वाढ झाली असल्याची माहिती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पोहनेर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण काल मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. या इमारतीचं काम अतिशय दर्जेदार झालं असून इमारतीची शोभा कायम ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. इमारत खराब करणाऱ्यांना ५०० रुपये दंड केला जावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 
****

 मराठवाड्याच्या विकासासाठी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन पीक पध्दती स्वीकारण्याची आवश्यकता, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आहे. काल लातूर इथं आयोजित, मराठवाडा विकास परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात बीज भाषण करताना राजेंद्रसिंह यांनी परखड मतं मांडली. ऊसामुळे मराठवाड्याचा विकास नाही तर विनाश होत असून, याबाबत कठोर कटू निर्णय घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड, भूजलाचा अत्यधिक उपसा, अशा अनेक चुकांकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारने या परिसरात केलेल्या जलसाक्षरते बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

 जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी, जिल्ह्यात सुरू असलेल्या टॅंकरपैकी, ७५ टक्के टॅंकर हे ऊस पट्टयातच सुरू आहेत याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****

 क्रिकेट- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा ८७ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेलं तीनशे पस्तीस धावांचं लक्ष्य गाठतांना श्रीलंकेचा संघ शेहेचाळीसाव्या षटकांत दोनशे सत्तेचाळीस धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान, या स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना होणार आहे.
****

 संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावं, पिक विमा त्वरित मंजूर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...