Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पहिल्या सत्राची
सर्वपक्षीय बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत
चालावं, यासाठी सरकारनं विरोधी पक्षाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र
मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदेचे कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रसचे गुलाम
नबी आझाद आणि आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रविड
मुन्नेत्र कळघम पक्षाचे के. टी. आर. बालू, तृणमूल काँग्रसचे देरेक ओब्रायन, नॅशनल कॉन्फरन्सचे
फारुख अब्दुल्ला, अण्णा द्रमुक पक्षाच्या नवनीता कृष्णन् आणि समाजवादी पक्षाचे नेते
रामगोपाल यादव या बैठकीत सामील होते.
पंतप्रधान, ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्द्यावर या
महिन्याच्या १९ तारखेला सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक घेणार आहेत. मुस्लीम महिला
विवाह संरक्षण, अर्थात तिहेरी तलाक विधेयक, आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयक २०१९,
या सत्रात सादर केली जाऊ शकतील. हे सत्र २६ जुलै पर्यंत चालेल. येत्या २० तारखेला राष्ट्रपती
रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. पाच जुलैला
अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील,
अशी माहिती दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर संसदेचे कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी
प्रसारमाध्यमांना दिली.
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या सहा जागांसाठी
आज पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. याची अधिसूचना मंगळवारी जारी केली जाईल. उमेदवारी
अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जूनपर्यंत असून, या जागांसाठी ५ जुलैला मतदान होणार आहे.
राज्यसभा सदस्य अमित शहा, स्मृती ईराणी, रविशंकर प्रसाद आणि अच्युतानंद सामंत हे लोकसभेवर,
तर प्रताप केसरी देव आणि सौम्य रंजन पटनाईक हे ओडिशा विधीमंडळात निवडून गेल्यामुळे
रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
****
बिहारमध्ये मेंदूज्वर आजारानं थैमान घातलं आहे. यात
आतापर्यंत ८३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर मुजफ्फरपूर इथं आणखी
१५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत मुज्जफरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल
महाविद्यालय आणि केजरीवाल रुग्णालयात ४१ रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय
आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आज मुज्जफरपूर इथं आहेत. राज्य सरकारला शक्य ती मदत पुरवली
जाईल, असं डॉ. हर्षवर्धन यांनी पाटणा इथं पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही उद्यापासून
सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आज मंत्रिमंडळाचा विस्तार करून मुंबईत राजभवनात राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी एकूण १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. संध्याकाळपर्यंत
मंत्र्यांना खाती वाटप केली जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार
परिषदेत बोलताना सांगितलं.
आतापर्यंत ४ हजार ७०० रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा करण्यात आल्याचं सांगतानाच, चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार केला जाऊ देणार
नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. येत्या अधिवेशनात एकूण २८ विधेयकं मांडण्यात येणार
असल्याचंही ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या स्टेशन रोडवर लागलेल्या
आगीत एक ऑटोमोबाईल्सचं दुकान आणि तीन उपहारगृहं जळून खाक झाल्याची घटना, आज सकाळी घडली
आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान
दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या मँचेस्टर इथं सुरु झाला. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून
प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या रोहित शर्मा आणि के. एल. राहूल या
जोडीनं सामन्याची जोरदार सुरुवात केली. के. एल. राहूल ५७ धावा करुन, तर रोहित शर्मा
१४० धावा करुन बाद झाला. कर्णधार विराट कोहलीनं ४१ धावा केल्या आहेत. तर त्याच्या जोडीला
आलेल्या हार्दिक पंड्याच्या आतापर्यंत ७ धावा झाल्या आहेत.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४१ षटकांत
एकूण २५२ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment