Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 22
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
गेल्या दोन दिवसांपासून
सुरू असलेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत
झपाट्याने वाढ झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातल्या नद्यांना
पूर आला आहे. दुष्काळी भागातल्या अनेक गावातले नाले, ओढे दुथडी भरून वाहत असून, तलाव
ओसंडून वाहत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात
अग्रणी नदीला पूर आल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. जत तालुक्यातही बोर नदीला
पूर आला, शिराळा आणि वाळवा तालुक्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे,
भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाळवा तालुक्यात
वारणा गावाकडे जाणाऱ्या मार्ग दहा फुटाने खचला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज सलग
तिसऱ्या दिवशी पावसाचं वातावरण आहे. शहरासह जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. धुळे शहरात सकाळी सुमारे
तासभर जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासात शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पाऊस
झाल्यानं अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे.
****
औरंगाबाद तसंच जालना
जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस झाला. अंबड तालुक्यात वडीगोद्री मंडळात ८१ मिलीमीटर
तर जाफ्राबाद तालुक्यात टेंभुर्णी मंडळात ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
****
दरम्यान काल पावसाळी
वातावरणातही राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी सरासरी ६० पूर्णांक ४६ शतांश टक्के मतदान
झालं. सर्वाधिक ८३ पूर्णांक दोन दशांश टक्के
मतदान कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर मतदार संघात तर सर्वात कमी ४० पूर्णांक दोन दशांश
टक्के मतदान मुंबईत कुलाबा मतदार संघात नोंदवल गेलं. परवा, २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीसाठी
प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. एक लाख १२ हजार ३२८ ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रांची
त्रिस्तरीय सुरक्षा प्रणालीअंतर्गत, सी सी टी व्हींच्या माध्यमातून २४ तास निगराणी
केली जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. या
सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे.
****
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या
आठ गावांनी, रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कालच्या मतदानावर
बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या या गावांतल्या
मतदान केंद्रांवर काल शुकशुकाट असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदान गुप्ततेचा भंग
केल्याचा प्रकार धुळे शहरात उघडकीस आला. दोन मतदारांनी मतदान करताना, मतदान यंत्रासोबत
छायाचित्र काढून ते सामाजिक संपर्क माध्यमावर प्रसारित केलं. या प्रकाराची तातडीनं
दखल घेत नायब तहसीलदार भाया भीमसिंग पावरा धुळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पीएमसी अर्थात पंजाब
महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणारे बँकेचे माजी संचालक राकेश वाधवन आणि
त्याचे पुत्र सारंग वाधवन यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँकेचे
माजी संचालक सुरजित सिंह अरोरा यांची पोलिस कोठडीही येत्या २४ तारखेपर्यंत वाढवण्यात
आली आहे. आज त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत होती. बँकेत सुमारे चार हजार ३५५ कोटी
रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी या सर्वांना अटक केलेली असून, रिजर्व्ह बँकेने पीएमसी
बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. बँकेच्या खातेधारकांना सध्या चाळीस
हजार रुपये काढण्याची मुभा आहे.
दरम्यान, या संदर्भात पुढच्या काही दिवसांत निर्णय जाहीर करणार
असल्याचं रिजर्व्ह बँकेनं म्हटल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात कापसाच्या
खरेदीस आजपासून सुरूवात करण्यात आली. औद्योगिक परिसरात, यावेळी कापसाच्या तराजूचं पूजन
करण्यात आलं, तसंच विक्रीसाठी कापूस आणलेल्या
शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
भारतीय क्रिकेट नियामक
मंडळाच्या नवनिर्वाचित प्रतिनिधी मंडळानं कार्यभार स्वीकारल्यावर, माजी लेखा आणि महानियंत्रक
विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या प्रशासकीय समितीनं पद सोडावं असं सर्वोच्च
न्यायालयानं सांगितलं आहे. उद्या नियामक मंडळाच्या
निवडणुकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह नवीन पदाधिकारी कार्यभार स्वीकारतील.
*****
***
No comments:
Post a Comment