Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –30 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यात सरकार
स्थापनेबाबतची चर्चा अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नसून भाजपचे आमदार
आज विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक घेणार आहेत. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक
म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित
राहणार आहेत. दरम्यान चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपला
बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. नवी मुंबईतल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले
अपक्ष आमदार महेश बालदी तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते शाहूवाडीचे आमदार डॉ. विनयकुमार
कोरे यांनी यापुर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला
आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपनं १०५ जागांवर विजय मिळविला असून अपक्ष आणि अन्य छोट्या
पक्षांच्या पंधरा आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सत्तास्थापनेमध्ये शिवसेनेनं
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक घेत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. तिथल्या प्रमुख नेत्यांशी झालेल्या
चर्चेला पंतप्रधानांनी एका संदेशात लाभकारी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान
झालेल्या करारानुसार भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन
करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. यात दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर
सहकार्य वाढवण्याचा निर्धार झाला असून परस्पर हितांच्या क्षेत्रातल्या बारा सामंजस्य
करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
****
पुढच्या पाच
वर्षात भारताला पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं झालेल्या
एका भाविष्यातील गुंतवणुकीसंदर्भातील परिषदेत ते काल बोलत होते. `स्टार्ट अप` गुंतवणूकीसाठी
सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन
पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, `स्टार्ट
अप`साठी गुंतवणूकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी, असंही ते म्हणाले. भारतातल्या
`स्टार्ट अप` कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. तंत्रज्ञानाच प्रभाव,
पायाभूत सुविधेचं महत्त्व, मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग, अनुकूल सरकार या पाच गोष्टी
भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमुद केलं.
****
पाकिस्तानी सैन्यानं
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारामध्ये एक भारतीय मृत्यूमुखी पडला आहे
तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील मच्छील भागात काल रात्री हा गोळीबार
करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्ताननं केलेल्या या
गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना उपचारांसाठी
रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, कुलगाम
जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून गेलेल्या पाच कामगारांची दहशतवाद्यांनी काल रात्री गोळ्या
घालून हत्या केल्याच्या पार्श्र्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
युरापीय देशांतील संसदेच्या २३ सदस्यांचं शिष्टमंडळ दोन दिवसीय काश्मीर दौऱ्यावर आलं
असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड
आदी देशांच्या संसदेचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.
****
अल्पसंख्याक
समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दहावी पूर्व शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षी पुनरनोंदणी आणि नवीन नोंदणी
करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. एकही पात्र विद्यार्थी या
शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी कळवलं
आहे.
****
नाशिकमधील देवळाली
कँप येथे आयोजित लष्कर भऱती मेळाव्यावेळी आज गोंधळ उडाला. त्रेसष्ट जागांसाठी असलेल्या
या भरतीसाठी राज्यभरातील हजारो युवक नाशिकमध्ये दाखल झाले हा गोंधळ उडाल्याचं
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
भारताचा युवा
मल्ल रविंद्र यानं हंगेरीतील बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या तेवीस वर्षे वयोगटातील विश्वचषक
कुस्ती स्पर्धेत एकसष्ट किलो वजन गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बावीस वर्षीय
रविंद्रनं हंगेरीचा प्रतिस्पर्धी मार्केल बुडाई याला उपउपांत्यपूर्व फेरीत १२-१ असं
पराभूत केल्यानंतर उपउपांत्य फेरीत रशियाच्या दिनिइस्मा ताख्तारोफविरुद्ध ११-० असा
सहज विजय नोंदवला आहे.
****
No comments:
Post a Comment