Thursday, 31 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –31 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांचं भारतासाठीचं योगदान अमूल्य आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चव्वेचाळीसाव्या  जयंतीदिनी अभिवादन केलं आहे. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुजरातमधील  केवडिया इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्यानजिक समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरदार पटेल यांना नवी दिल्ली इथं अभिवादन केलं. सरदार पटेल हे दुरदृष्टी असलेले राजकीयनेते होते, भारताच्या पोलादी चौकट असणा-या सनदी सेवांचे ते निर्माते होते, असं उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही पटेल यांना अभिवादन करतांना एका संदेशात म्हटलं आहे.  
****
मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जयंतीनिमित्त आयोजित एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. भारताला एकसंघ ठेवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं,  म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जातं. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यावेळी म्हणाले.
पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्मानाबाद इथं मुख्य प्रशासकीय इमारतीपासून पोलिस मुख्यालया दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.कणकवली, ळगाव, बुलडाणा, अहमदनगर, नंदुरबारसह राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज
`एकता दौड` झाली.   
****
आजपासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं शपथविधी झाला. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नायब राज्यपालांचे शपथविधी होत आहेत. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याचं अस्तित्व मध्यरात्रीपासून संपुष्टात आलं. गेल्या पाच ऑगस्टला संसदेनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारं राज्यघटनेतलं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णयही संसदेनं याच दिवशी घेतला. आता देशात राज्यांची संख्या २८ झाली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढली असून आता नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
दरम्यान, हिमालयाच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी लडाख इथं जी बी पंत हिमालयन पर्यावरण आणि विकास संस्थेची स्थापना करायला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजुरी दिली.
****
महायुतीतील प्रत्येक छोट्या घटक पक्षाला एक - एक मंत्रीपद मिळावं, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यावेळी उपस्थीत आहेत.
****
शिवसेनेच्या विधीमंडऴ नेत्याची निवड करण्यासाठी शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांची मुंबईत बैठक सुरू आहे.  दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं, या शिवसेनेच्या भूमिकेचा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुनरुच्चार केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 
****
पावसामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या भातशेती आणि मासेमारीच्य़ा नुकसानीची भरपाई मिऴावी, अशी मागणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र निलेश राणे आणि या जिल्ह्यांतील अन्य नेते या मागणीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
****
माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांचा आज पस्तीसावा स्मृतीदिन आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, अशोक गेहलोत आदींनी नवी दिल्लीत `शक्तीस्थळ` या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली. राहुल गांधी यांनी त्यांना एका संदेशात श्रद्धांजली अर्पण केली आहे. इंदिरा गांधी यांचं देशाच्या सुरक्षिततेसाठीचं आणि आर्थिक विकासासाठीचं योगदान देश नेहमी स्मरणात ठेवेल असं काँग्रेस पक्षाऩं म्हटलं आहे.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास दासगुप्ता यांचं आज दिर्घ आजारानं कोलकत्ता इथं निधन झालं. ते त्र्याऐंशी वर्षांचे होते.
****

No comments: