Sunday, 16 February 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.02.2020 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१६ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि हमी भाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबध्द- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** जालना जिल्ह्यातले नांदापूरचे शेतकरी दत्तात्रय चव्हाण अप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कारानं सन्मानित 
** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांना प्रारंभ
** औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षणावरच्या आक्षेपांवरची सुनावणी पूर्ण
आणि
** ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं वृद्धापकाळानं निधन
****
 शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि हमी भाव मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबध्द असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं काल जैन इरिगेशनच्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बदलाचे वारे देशभर पोहोचवावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टंचाईग्रस्त मराठवाडा, खानदेशसह राज्याच्या प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारनं करणं आवश्यक असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.
जालना जिल्ह्यातले नांदापूरचे शेतकरी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांना यावेळी अप्पासाहेब पवार आधुनिक कृषि पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. जैन हिल्स इथल्या कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन आणि विकास केंद्राचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

मुख्यमंत्र्यांनी काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथं शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. शेतीसाठी दिवसा पाणीपुरवठा आणि कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर राज्यशासन भर देत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं आवाहन सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. राज्य शासनाचा सहकार विभाग आणि राज्य सहकारी पतसंस्था संघटनेनं काल अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा घेतला, या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.
****
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था- एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं मत, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. आठवले यांनी, काल याबाबत जाहीर केलेल्या पत्रकात, राज्य सरकारमधले निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमतानं घेतले जावेत असंही म्हटलं आहे.
****
अपुरं ज्ञान, दावे - प्रतिदावे आणि न्यायालयावरचा अन्य ताण दूर झाला, तर न्यायदानाला गती मिळू शकेल, असं प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केलं आहे. नाशिक इथं काल राज्यस्तरीत वकील परिषदेला सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणं असं म्हटलं जात असलं तरी, जलद न्यायदान करताना चूक होणार नाही याचंही भान ठेवण्याची गरज असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या परिषदेत मार्गदर्शन करणार असून, सायंकाळी राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे.
****
जे राजकारणी आणि प्रसार माध्यमे म्हणतात त्याचीच पुनरावृत्ती करण्याची सवय जगातल्या नागरिकांना लागत असल्याची खंत लेखिका वैशाली करमरकर यांनी व्यक्त केली आहे. त्या काल औरंगाबाद इथं राजहंस गप्पा या सदरात ‘आंतरराष्ट्रीय दहशतवाद’ या विषयावर बोलत होत्या. माध्यम क्रांतीमुळे आपण फक्त मतं ऐकतो, मात्र स्वत: वाचन करत नसल्याचं त्या म्हणाल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- `सीबीएसई`च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांना कालपासून प्रारंभ झाला. दहावीची परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल तर बारावीची परीक्षा ३० मार्चला संपेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला यावर्षी १८ लाख ८९ हजार विद्यार्थी बसत असून, १२ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा येत्या मंगळवारी अठरा तारखेपासू सुरू होत आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहचावं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. निवडणुकांपेक्षा पक्षबांधणी आणि नागरिकांच्या समस्या सोडवणं महत्त्वाचं असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
****
लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत लातूर ग्रामीणचे तत्कालिन आमदार त्रंबक भिसे यांनी मागणी केली होती, त्याला अनुसरून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून अहवाल मागवण्यात आला होता. आता लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचं नाव विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर’ असं होणार आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी काढलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीबद्दल आलेल्या ३७० आक्षेपांवर काल सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी निवडणूक विभागानं साखर आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली होती. वॉर्ड रचना करताना आणि वॉर्डांचं आरक्षण काढताना गोपनियतेचा भंग झाल्याचा आरोप अनेक माजी नगरसेवकांनी यावेळी केला.
****
संत गजानन महाराजांचा एकशे बेचाळीसावा प्रगट दिन काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी सुमारे ८०० दिंड्या दाखल झाल्या होत्या. औरंगाबाद इथंही गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथल्या गजानन महाराज मंदिराच्यावतीनं किर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
ज्येष्ठ रंगकर्मी आणि दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळातले कलाकार राजा मयेकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. कामगार रंगभूमीवरून आपल्या अभियानाला सुरुवात केलेल्या राजा मयेकरांनी मालवणी नाटकं, मराठी चित्रपट आणि दूरदर्शनवरच्या अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या. सह्याद्री दूरदर्शनवरच्या आमची माती आमची माणसं या शेतीविषयक कार्यक्रमातल्या त्यांच्या गप्पा गोष्टी चांगल्याच गाजल्या होत्या.
****
ज्येष्ठ पत्रकार आणि चिंतन ग्रुपचे संस्थापक अभिनंदन थोरात यांचं काल दीर्घ आजारानं पुणे इथं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरु होते. थोरात यांनी सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली, त्यानंतर जनसंपर्क आणि प्रतिमा संवर्धन या क्षेत्रात काम केलं.
****
परभणीचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी विकास माळी यांचं काल पहाटे निधन झालं. अन्न विषबाधेच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल होत असताना, माळी यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.  
****
हिंगोली शहरातल्या गुरू प्रकाश वॉटर फिल्टर या कारखान्यावर नगरपालिकेच्या पथकानं काल छापा टाकून सुमारे दीड लाख रुपयांचा प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला. या कपंनीत पालिकेच्या नळाची अवैध जोडणी घेऊन पाण्याचा वापर केल्याचा संशय आहे. याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितलं. दोन दिवसांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवली जात आहे.
****
जालना शहरातल्या कुंडलिका आणि सीना नदी पात्रांच्या स्वच्छता अभियानाचा काल प्रारंभ झाला. आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यावेळी उपस्थित होते. या अभियानाद्वारे प्लास्टिक कचरा संकलनासह दोन्ही नदीपात्र स्वच्छ करण्यात येणार आहेत.
****
नकारात्मक परिस्थितीतून स्त्री पुढे जात असल्याचं मत भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केलं आहे.  औरंगाबाद इथल्या डॉक्टर इंदिराबाईं पाठक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. महिला ही फक्त मुलांना जन्म देण्यासाठी नाही, तर विचारांची आणि देशाला पुढे घेऊन जाण्याची जननी असल्याचं त्या म्हणाल्या.
****
महसुली वसुलीचं उद्दीष्ट साध्य न करणं आणि शासकीय कामात कामचुकारपणा केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे तहसिलदार विनोद गुंडमवार यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
****
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटणकर यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. यापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली होती, मात्र ती रद्द करुन आता इटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्राचा वैचारिक वारसा टिकला पाहिजे, असं मत ज्येष्ठ विचारवंत विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात फुले- शाहू आंबेडकर व्याख्यानमालेत शेवटचं पुष्प गुंफताना, ‘साठीतला महाराष्ट्र: दशा आणि दिशाया विषयावर ते बोलत होते. राज्यात डाव्या, समाजवादी चळवळी आता संपल्या असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलं.
//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...