Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 February
2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १७ फेब्रुवारी
२०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø ब्रिटीशकालीन
कायद्यांत आवश्यकते नुसार बदल करण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Ø राज्यातली सत्ताधारी आघाडी अनैसर्गिक आणि अनैतिक असल्याची भारतीय जनता पक्षाची टीका
Ø कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे
प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत घेऊन जाण्याचं राज्यपालांचं आवाहन
आणि
Ø राज्य बालनाट्य स्पर्धेच्या
अंतिम फेरीला आजपासून लातूरमध्ये प्रारंभ
****
समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर ब्रिटीशकालीन कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल करण्याची गरज
असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नाशिक इथं काल वकील
परिषदेत ‘जलद आणि आधुनिक न्यायदानाच्या दिशेनं’ या विषयावरच्या चर्चासत्रात ते
बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, परिवहन मंत्री अनिल परब,
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यावेळी उपस्थित होते. एखाद्या प्रकरणात आरोपी
दोषी आहे असं स्पष्ट असेल, तर संबंधितांचं आरोप पत्र घ्यावं किंवा नाही
याचा देखील वकिलांनी विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिक जिल्हा
न्याय संकुलाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. लोकशाहीचे चारही खांब एकमेकांशी स्पर्धा करत
बसले, तर लोकहित बाजूला सारलं जाईल, जनतेमुळेच
या चारही खांबांचं अस्तित्व आहे, हे विसरता कामा नये,
असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्रातली सध्याची सत्ताधारी आघाडी ही अनैसर्गिक
आणि अनैतिक असल्याची टिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी
केली आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथं भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य परिषद
अधिवेशनाचं उद्घाटन काल नड्डा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
राज्याची पुढची निवडणूक रचनात्मक असेल, ती स्वबळावर लढू आणि त्या निवडणुकीत
भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. राज्यात भाजप सध्या विरोधी पक्ष असून, पूर्ण ताकदीनं ही भुमिका पार पाडण्याचं आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना यावेळी
केलं. शेतकऱ्यांनी राज्यपालांना फसव्या
कर्जमाफीबाबत पत्र लिहावं, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकात
पाटील यांनी यावेळी केलं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका
निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएकडे सोपवल्याबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस
अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात जोपर्यंत आहे,
तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका
नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या
अंजनी इथं माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते
काल बोलत होते. सरकारच्या संदर्भात इतर कोणाच्या वक्तव्याला फार
महत्त्व देण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
****
कृषी विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये होणारे
प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत घेऊन जा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या डॉ.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात
ते काल बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सावंत, कृषी
मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी राज्याच्या सकल उत्पन्नामधला कृषी क्षेत्राचा
२८ टक्क्यांचा वाटा आता घटून १२ टक्क्यांवर आला असून, ही गंभीर बाब असल्याचं
राज्यपाल म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्य सांस्कृतिक
कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येत असलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला
आजपासून लातूरमध्ये प्रारंभ होत आहे. सांस्कृतिक
कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून निवडलेले उत्कृष्ट नाट्यसंघ त्यासाठी लातुरात
दाखल झाले आहेत. ही स्पर्धा २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आज
मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे
या बैठकीत पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
****
पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विविध योजना, विकासनिधी
आणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या योग्य पद्धतीनं राबवायच्या असल्याचं लातूर
ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या भादा इथं धिरज देशमुख यांच्यासह जिल्हा
परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचा काल नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार सर्वांचं
असून, सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम करणार असल्याचं ते म्हणाले.
****
ऊसतोड मजूर पुरवठा आणि
ऊस वाहतुकीच्या करारासंदर्भात दोन मुकादमांनी दिलेल्या
कागदपत्रांचा गैरवापर करुन २५ लाख ६० हजार रुपयांचं कर्ज उचलल्याच्या आरोपावरुन गंगाखेडचे
आमदार रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचे संचालक
तसंच अंबाजोगाई शाखेच्या बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. आमदार गुट्टे सध्या अन्य एका प्रकरणात
औरंगाबाद इथल्या हर्सुल तुरुंगात आहेत.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि
कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, येत्या एक मार्च रोजी
नांदेड इथं शंकर दरबार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून,
अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे असतील. श्री
शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी काल ही माहिती दिली.
****
जालना शहराचं आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराज
समाधी सोहळ्यानिमित्त जुना जालना भागातून काल पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक
मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामी
मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची काल सांगता झाली.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य
साधून परभणी जिल्ह्यात जिंतूर-शिरडशहापूर-जिंतूर दरम्यान
काल १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. जिंतूर रॉदिनर्सच्या
वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
****
नांदेडच्या नानकसाई फाऊंडेशनचे धनाजीराव
घोडजकर समाज भूषण पुरस्कार काल माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment