आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
आजपासून दोन दिवसांच्या दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या भेटीवर
जाणार आहेत. या भेटी दरम्यान ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील तसंच काही प्रकल्पांची
कोनशिला ठेवतील. दमण जेट्टी ते जामपूर या सागरी
मार्गाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. दमण इथल्या आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचं
उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव
प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी देशांची सी ओ पी-१३ परिषद आजपासून गुजरात
मधल्या गांधीनगर इथं सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. १३० देशांचे प्रतिनिधी, वन्यजीवांच्या जतन संवर्धनासाठी
काम करणाऱ्या सामाजिक संघटना या संमेलनात सहभागी होत आहेत. या संमेलनाचे यजमान या नात्यानं
भारताकडे तीन वर्ष परिषदेचं अध्यक्षपद असणार आहे.
ही परिषद २२ फेब्रुवारीपर्यत चालणार आहे.
****
राज्यात काल झालेल्या चार वेगवेगळ्या
अपघातांमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यात जोडमोहा जवळ
वाहन उलटून खोल नाल्यात पडल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला, तर सोळा जण जखमी झाले. नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.
परभणी जिल्ह्यातल्या निपाणी टाकळीजवळ
खासगी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.
वाशिम जिल्ह्यात रिसोड-मालेगाव मार्गावर दुचाकी आणि पिकअपची
धडक होऊन झालेल्या अन्य एका अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.
तर चौथ्या अपघातात बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातल्या किन्ही गावानजीक, औरंगाबादकडे येणाऱ्या बोलेरो गाडीचं टायर फुटल्यानं
ती दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीचं औचित्य साधून परभणी जिल्ह्यात जिंतूर-शिरडशहापूर-जिंतूर दरम्यान
काल १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. जिंतूर रॉदिनर्सच्या
वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment