Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १७ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
लष्करात महिलांना प्रमुख पदं देण्यासंदर्भात कायमस्वरूपी
कमिशन स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. फक्त
शारीरिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे महिलांना समान संधी नाकारता येणार नसल्याचं,
न्यायालयानं म्हटलं आहे. सैन्यादलात महिलांना तुकडीचं नेतृत्व दिलं जावं, असे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिले होते. या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आदेशावर कोणतीही स्थगिती नसताना, केंद्र सरकारकडून
मात्र गेल्या दहा वर्षांत त्यावर अंमलबजावणीचे काहीही प्रयत्न झाले नाही, असंही निरीक्षणही
न्यायालयानं नोंदवलं. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं येत्या तीन महिन्यात
कामयस्वरुपी कमीशन स्थापन करण्याचे निर्देश दिले.
****
स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव
प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी देशांची सी ओ पी-१३ परिषद आजपासून गुजरात
मधल्या गांधीनगर इथं सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. १३० देशांचे प्रतिनिधी, वन्यजीवांच्या जतन संवर्धनासाठी
काम करणाऱ्या सामाजिक संघटना या संमेलनात सहभागी होत आहेत. ही परिषद २२ फेब्रुवारीपर्यत
चालणार आहे.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणुन तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या
पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्यासोबतच मनिष सिसोदिया, सत्यंद्र जैन, राजेंद्र पाल
गौतम, आणि इम्रान हुसेन या मंत्र्यांनीही आज कार्यभार स्वीकारला. नव्या मंत्रिमंडऴाची आज बैठक होत असून त्यानंतर खात्यांचं वाटप होण्याची शक्यता असल्याचं
पीटीआयचं वृत्त आहे.
****
काँग्रेस पक्षाचे मुंबईचे
माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांची इच्छा असल्यास ते पक्षातून बाहेर पडू शकतात,
असं पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी म्हटलं आहे. देवरा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांच्या कामाचं कौतुक करत, दिल्ली राज्याच्या महसुली उत्पन्नात गेल्या
पाच वर्षांपासून सातत्यानं वाढ होत असल्याबद्दल एका ट्वीटद्वारे अभिनंदन केलं, त्यावर
माकन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
****
भारतीय जनता पक्ष येत्या
पंचवीस तारखेला राज्यात सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातलं महाविकास
आघाडीचं सरकार पाडण्यात आपल्याला काहीही रस नाही, असंही पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, येत्या २४ तारखेपासून
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू होणार आहे.
****
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी
एका स्वतंत्र प्राधिकरणाची
स्थापना करण्याचा
राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली
आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. या प्राधिकरणामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या
त्या त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीविषयी समजून घेणं आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजना
करण्यात मदत होईल असं चव्हाण यांनी सांगितलं. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा
एकमेव उपाय नसल्याचंही ते म्हणाले.
****
रत्नागिरीत नाणार इथं प्रस्तावित रिफायनरीबद्दल शिवसेनेची
भूमिका बदललेली नसल्याचं शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट
केलं आहे. ते काल धुळे इथं बातमीदारांशी बोलत होते. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना
या वृत्तपत्राच्या कोकण आवृत्तीत, शनिवारच्या अंकात नाणार प्रकल्पाचे लाभ सांगणारी
जाहिरात आली होती. त्यावरून या प्रकल्पावर शिवसेनं भूमिका बदलली असल्याची अटकळ राजकीय
वर्तृळात बांधली गेली. मात्र या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं देसाई यांनी
स्पष्ट केलं. या प्रकल्पासाठी काढलेली अधिसूचना सरकारनं याआधीच रद्द केली असल्याचंही
ते म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात तूरीच्या काढणीच्या कामाला वेग
आला आहे. मागच्या दोन-तीन दिवसात स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे शेतकरी कामाला
लागले आहेत. बाजारात तुरीचे भाव कमी झाले असून शासनाने हमी भावात तूर खरेदीची केंद्र
सूरू करावेत अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत.
****
धुऴे शहरात शिवजयंती निमित्ताने मोगलाई परिसरातल्या
विद्या विकास प्राथमिक शाळेच्या वतीनं शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन नगरसेविका किरण कुलेवार यांच्या हस्ते
करण्यात आलं आणि महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून मिरवणूक
काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक राहुल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
सोलापुर
जिल्ह्यातल्या एका वाहनाला तेलंगणातल्या वनापरसी जिल्ह्यातल्या कोत्ताकोट्टा गावाजवळ
अपघात झाल्यानं तिन जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. काल सायंकाळी
उशीरा ही दुर्घटना घडली.
हे सर्व भाविक तिरुपती इथं दर्शनासाठी जात होते. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण हरवल्यानं, गाडीनं
पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिल्यानं
हा भीषण अपघात घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment