Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व्यवस्थित अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल- केंद्र सरकारची ग्वाही
** ॲट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाकडून वैध
** दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
** हिंगणघाटच्या पेट्रोल अंगावर टाकून जाळण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
** डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज दिक्षांत समारंभ
****
अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा व्यवस्थित अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. नोकरी आणि पदोन्नतीत अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. याबाबत काल, राज्यसभेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी निवेदन दिलं. संबंधीत खटल्यात केंद्र सरकार हा पक्ष नव्हता, तसंच कोणतेही प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलेलं नव्हतं असं सांगून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गियांच्या कल्याणासाठी बांधील आहे, असं गेहलोत म्हणाले. २०१२मधे उत्तराखंडातल्या तत्कालीन काँग्रेस सरकारनं जारी केलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केला आणि अनुसूचित जाती-जमातीच्या हितरक्षणासाठी तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली.
****
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८-ॲट्रासिटीची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८मध्ये दिलेल्या निकालानंतर केंद्र सरकारनं या कायद्यात केलेल्या सुधारणा, रद्द कराव्यात, या मागणीसाठी दाखल अनेक याचिकांवर न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्या प्रकरणांमध्ये सकृतदर्शनी खटला दाखल होऊ शकत नाही, अशाच प्रकरणांमध्ये आरोपीला हंगामी जामीन देता येईल, असं न्याययमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे. या कायद्याअंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी कोणत्याही चौकशीची, किंवा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी आकाशवाणीला दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी गेल्या शनिवारी ६२ टक्के मतदान झालं होतं. मागच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं ६७, तर भाजपानं तीन जागांवर विजय मिळवला होता.
****
देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात कालपासून `एक भारत श्रेष्ठ भारत` या अभियानाला सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहील. भारतातल्या विविध भागांना सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं, हे अभियान सुरू करावं, अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली मांडली होती. त्यांच्या या कल्पनेनुसार हे अभियान राबवलं जात आहे.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं पेट्रोल अंगावर टाकून जाळण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा काल सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पार्थीव देहावर दारोडा या तिच्या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिडीतेच्या मृत्यूनंतर दारोडा गावातल्या ग्रामस्थांनी आरोपीला त्वरीत शिक्षा करावी या मागणीसाठी वर्धा - औरंगाबाद महामार्गावर दोन तास `रस्ता बंद` आंदोलन केलं. पोलिसांना गावात झालेल्या दगडफेकीनंतर सौम्य बळाचा वापर करावा लागला. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिडितेच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिडीत शिक्षिकेच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, या हत्या प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल तसंच पिडीता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे सर्व संबंधित विभाग समन्वयानं काम करतील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईत पहिली बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील तसंच विजय वडेट्टीवार हे मंत्री या समितीचे सदस्य आहेत.
दरम्यान, मुंबईतल्या आझाद मैदान इथं आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या शिष्ठमंडळानं काल चव्हाण यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसंच नवे बदल स्वीकारावेत, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्य सहकारी बँकांच्या संघटनेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी कामकाजात बदल करावे, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्याच्या पुर्णा तालुक्यातल्या मौजे कातनेश्वर परिसरात रानडूकराने हैदोस घातला असून रविवारी रानडूकरानं हल्ला केल्यामुळं एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यात काल शेतकऱ्यांनी जागतिक कडधान्य दिवस साजरा केला. कडधान्य दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना किटकनाशक मीनी किट, बियाणे किट भेट देण्यात आल्याची माहिती कृषि विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.
****
जालना जिल्ह्यात अंबड इथं काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडच्या तूर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर तुरीला पाच हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात येणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी यासाठी आँनलाईन नाव नोंदणी करावी, असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्हा परिषद विषय समिती सभापतींचे खातेवाटप आणि स्थायी समितीच्या रिक्त पदांवरील निवड प्रक्रिया काल पार पडली. शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांना शिक्षण आणि आरोग्य तर काँग्रेसचे सदस्य किशोर बलांडे यांना वित्त आणि बांधकाम समिती सोपवण्यात आली आहे. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांची कृषी आणि पशुसंवर्धन समितीवर निवड करण्यात आली आहे.
****
थोर विचारवंत साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त काल नांदेड इथं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आलं. यावेळी भारतीय भाषांचे अभ्यासक डॉ. गणेश देवी, कुरूंदकर यांच्या कन्या शामल पत्की, साहित्यिक डॉक्टर शेषेराव मोरे उपस्थित होते. यावेळी आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत भाषा, राष्ट्रवाद आणि लोकशाही या विषयावर डॉक्टर गणेश देवी यांचं व्याख्यान झालं. नरहर कुरूंदकर प्रतिष्ठाण आणि रूपवेध ग्रंथालयानं संयुक्तपणे ही दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साठावा दिक्षांत समारंभ आज होत आहे. राज्यपाल तथा कुलपति भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक अश्विनीकुमार नांगिया हे समारंभाला उपस्थित रहाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगाव इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता दुकानदार ऊर्फ दत्तराव इंगोले मालेगावकर यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. दत्ता दुकानदार हे मराठवाडा सहकारी साखर कारखाना डोंगरकडाचे संचालक होते.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या माळीवडगांव इथला ग्रामसेवक राजेंद्र जयराम रावते याला पाच हजार रुपयांची लाच घेतांना लाच प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. रमाई आवास योजने अंतर्गत तक्रारदाराचं नाव पडताळणी कामी पाठवल्याचं बक्षीस म्हणून त्यानं लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
****
भारत आणि न्यूझिलंड यांच्यातला तिसरा आणि शेवटचा एक दिवसीय क्रिकेट सामना आज माउंट मोनगानुई इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल. यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकून यजमान न्यूझिलंडनं या श्रृखंलेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
पोपटांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या दोन लोकांसह १५० पोपटांना काल गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे पोपट छत्तीसगढ राज्यातल्या आदिवासी लोकांकडून विकत घेऊन नागपूरात ते विक्रीकरिता नेत असल्याचं आरोपींनी सांगितलं. या दोन्ही आरोपींची वन विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
****
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५० व्या महापौरपदी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेल्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली. भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मात्र या आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी सभेत उपस्थिती राहून, ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांना मतदान केलं. त्यामुळं ४८ विरुद्ध १ अशा मतांनी निलोफर आजरेकर विजयी झाल्या.
****
No comments:
Post a Comment