Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 14 February
2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी
२०२० सकाळी ७.१० मि.
****
** आर्थिक सुरक्षा आणि राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेत नौदलाची भूमिका
महत्त्वपूर्ण - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
** राजकीय पक्षांनी उमेदवारांविरुद्ध प्रलंबित फौजदारी प्रकरणांचे
तपशील प्रसिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
** एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आठ दिवसांत
बैठक घेण्याची खासदार शरद पवार यांची सूचना
** वैभवशाली इतिहासाचं चिंतन करण्याऐवजी वादाच्याच गोष्टींमध्ये
आपण अडकून पडत असल्याची ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांची खंत
आणि
** बीड इथं आयोजित पहिल्या वृक्ष संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद;
आज समारोप
****
देशाची आर्थिक सुरक्षा आणि राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेत भारतीय नौदलाची
भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
लोणावळा इथल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला काल राष्ट्रपतींच्या
हस्ते राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी, नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यावेळी उपस्थित होते. सागरी सीमांचं संरक्षण
करण्यासाठी, व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यात
नौदलाच्या योगदानाचा देशाला अभिमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी नौदलाच्या कार्याचा
गौरव केला.
****
राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी
प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
दिले आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल एका अवमान याचिकेवर न्यायमूर्ती
फली नरिमन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल हे आदेश दिले. फौजदारी गुन्हे दाखल
असलेल्या उमेदवाराच्या निवडीची कारणंही राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
करावीत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
डॉ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा खटला
कधी सुरू होईल याची माहिती २४ मार्च पर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय
आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहेत. खटला सुरु करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत
न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. या प्रकरणांमध्ये न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता
पणाला लागली असून, जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास ढळू देऊ नका असं आवाहन न्यायालयानं
केलं.
****
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह परिवहन मंत्री, परिवहन सचिव तसंच अर्थमंत्री आणि
अर्थ सचिवांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसात मुंबईत घ्यावी, अशी सूचना राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. कोल्हापूर इथं काल एसटी कर्मचारी
संघटनेच्या ५६व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या
मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर त्यांचे प्रश्न जवळून जाणून घेण्याची संधी मिळते, त्यामुळे
राज्यकर्त्यांनी अशा अधिवेशनाला हजेरी लावावी असं आवाहनही पवार यांनी केलं. या अधिवेशनाला
राज्यातून ३५ हजाराहून अधिक एसटी कर्मचारी उपस्थित होते.
****
शिर्डी इथल्या साईबाबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.
एम. मुगळीकर यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर परभणीचे जिल्हाधिकारी
पी. शिवशंकर यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम
कुंटे यांनी काल हे आदेश जारी केले.
****
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची
फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची
नियुक्ती झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी काल या नियुक्त्यांची माहिती
दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे.
****
ऑरिक सिटीच्या माध्यमातून तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध
होणार असल्याचं पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांनी
काल उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह ऑरिक सिटीची पाहणी
केली, त्यानंतर ते बोलत होते. ठाकरे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्यटन विकास
कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सर्व पर्यटन स्थळांच्या विकास कामांसाठी प्राधान्यानं
निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या
विकास कामांचाही ठाकरे यांनी काल आढावा घेतला. शहरात प्लास्टिक बंदी कारवाई अधिक कडक
करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल सायंकाळी औरंगाबाद
शहराच्या दौऱ्यावर दाखल झाले. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत करून शहरातून
वाहन फेरी काढली. तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी
विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
****
देशाला वैभवशाली इतिहासाचं चिंतन करण्याऐवजी वादाच्याच गोष्टींमध्ये
आपण अडकून पडत असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद
इथं देवगिरी महाविद्यालयाच्या फुले, शाहू, आंबेडकर व्याख्यान मालेत पवार यांनी, २१
व्या शतकातील युवक चळवळ आणि भारतीय राजकारण या विषयावर काल पहिलं पुष्प गुंफलं. आज
वैचारिक मंथन, विचारांची देवाण घेवाण ठप्प झाली असून चमकोगिरीच्या आंदोलनाचं चित्र
दिसत असल्याचं, परखड मत त्यांनी व्यक्त केलं. जातीअंत झाला पाहिजे असं सांगताना, सर्वांनी
जातीच्या रकान्यात भारतीय लिहिण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, आज या व्याख्यानमालेत भारतीय महिला सबलीकरण या विषयावर
खासदार वृंदा करात या दुसरं पुष्प गुंफतील.
****
झाडे लावा, ती जगवा तरच भविष्य आहे, असं मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी
शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. बीड तालुक्यातल्या पालवण इथं सह्याद्री देवराई प्रकल्पावर
काल पहिल्या वृक्ष संमेलनाचं उद्घाटन झालं. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या
वडाच्या झाडाचं मनोगत व्यक्त करताना, शिंदे बोलत होते. विविध शाळा-महाविद्यालयातल्या
१०१ विद्यार्थिनींच्या हस्ते १०१ रोपांना पाणी देऊन, पूजन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात
आलं. या संमेलनात दुर्मिळ वनस्पती, गवताळ परिसंस्था, अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची
मार्गदर्शपर व्याख्यानं होत असून, आज या संमलेनाचा समारोप होणार आहे.
****
उस्मानाबाद इथं काल केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेणाऱ्या
दिशा समितीची बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, उज्ज्वला योजना, कृषी
सिंचाई, फसल बीमा योजना, तसंच कौशल्य विकास योजनेचा आढावा घेण्यात आला.
****
हिंगोली शहरातल्या जलेश्वर तलावाकाठावरचं अतिक्रमण हटवलं जाणार
आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रथम पुनर्वसनाच्या मागणीसाठी काल जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. हे अतिक्रमण काढण्यासाठी १९५ जणांना नोटीस पाठवण्यात
आली आहे.
****
औरंगाबाद इथं काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे
घऱगुती गॅसच्या दरवाढी विरोधात क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी
यावेळी चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदवला. गॅस दरवाढ रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन
यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
नांदेड जिल्हाच्या मुखेड तालुक्यात
प्रस्तावित असलेल्या लेंडी धरणात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं
नांदेड इथं आंदोलन सुरू आहे. सरकारनं तीस वर्षांपूर्वी अकरा गावांची शेतजमीन संपादीत केली होती. या धरणाचं काम अद्याप पूर्ण झालं नसल्यामुळे,
केंद्र सरकारच्या नविन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी
आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे.
****
No comments:
Post a Comment