Wednesday, 19 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19.02.2020 TIME 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक१९ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणीही घाबरू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा घटनेचा परस्परांशी संबंध नाही- शरद पवार
** राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात
** राज्यातल्या ६३ खेळाडू आणि पाच मार्गदर्शकांना शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर
आणि
** छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन  
****
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही, त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणीही घाबरण्याचं कारण नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल सिंधुदुर्ग इथं वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआर हा जनगणनेचा एक भाग असल्यानं, राज्य सरकारला त्याच्या अंमलबजावणीबाबत काहीही हरकत नसल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रीय नागरिक नोंदणी - एनआरसी कायदा संपूर्ण देशभरात राबवण्याचा प्रस्ताव नसल्याचं, केंद्र सरकारनं पूर्वीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे त्याबाबतही चिंतेचं कारण नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे तीनही वेगवेगळे विषय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, भीमा कोरेगाव आणि आणि एल्गार परिषद हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. फक्त एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएकडे देण्यात आलेला आहे. भीमा कोरेगाव हा विषय केंद्रीय तपास संस्थेकडे दिलेला नाही आणि देणारही नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
पुण्यात झालेली एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा इथली घटना यांचा परस्पर संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एल्गार परिषदेत जे लोक सहभागी नव्हते, त्यांच्याविरोधातही या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचं पवार म्हणाले. मागच्या सरकारनं यासंदर्भात अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत, या प्रकरणी पुणे पोलिसांसह तत्कालिन सरकारमधल्या लोकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पवार यांनी केली.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरूवात झाली. औरंगाबाद विभागात ४०६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. नांदेड जिल्ह्यात ८२ परीक्षा केंद्रं स्थापन करण्यात आली असून, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे ३८ हजार ७११ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काल काही केंद्रांवर समन्वयाचा अभाव दिसून आला. हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं एका परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी दिल्यानं ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलावं लागलं, त्यामुळे परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची तारांबळ उडाली.
बीड इथंही काही परिक्षा केंद्रावर बैठक व्यवस्थेत गोंधळ उडाला तर काही परिक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांना जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली.
दरम्यान, बीड इथं सहा परीक्षार्थ्यांना नक्कल करतांना पकडण्यात आलं. परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी इथं चार पथकं तैनात करण्यात आली आहेत.
जालना जिल्ह्यातही नक्कल करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. परभणी इथंही नक्कल करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ६२ वा भाग असेल.
****
राज्यातल्या ६३ खेळाडू आणि पाच मार्गदर्शकांना शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार काल जाहीर झाले. पुणे इथले पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बीडचे कुस्ती प्रशिक्षक बाळासाहेब आवारे यांना क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार, औरंगाबादचे सागर बडवे यांना साहसी क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. औरंगाबादचे जिमनॅस्ट गौरव जोगदंड आणि तलवारबाजीसठी तुषार आहेर यांना राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या संभाजीनगर नामकरणावरून गदारोळ झाला. या सभेत भारतीय जनता पक्षाचे गटनेता प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवण्यात यावा यासंबंधीचं स्मरणपत्र महापौरांना सादर केलं. नगरसेवक राजू शिंदे आणि राजगौरव वानखेडे यांनी हा मुद्दा लावून धरला, मात्र एमआयएमच्या नगरसेवकांनी याला विरोध केल्यामुळे गदारोळ झाला. त्याचबरोबर मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्तावही या सभेत नाकारण्यात आला.
****
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विचार मंथन करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं औरंगाबाद इथं उद्या मंथन आणि दिशा पीक पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. या परिषदेतल्या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या नाट्यगृहात ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे यांचंलढाया पलिकडील शिवाजी महाराजया विषयावर व्याख्यान होणार आहे.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काल जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं क्रांती चौकात दीपोत्सव सोहळा झाला.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ग्रंथ पालखी सोहळा आणि आज्ञापत्र प्रदर्शनाचं उद्घाटन कुलगुरु उद्धव भोसले यांच्या हस्ते झालं. या पालखीत भारतीय संविधान, तुकाराम गाथा, धर्मग्रंथ ठेवण्यात आले होते. ही ग्रंथपालखी विद्यापीठातल्या विविध अभ्यासक्रम संकुलात नेण्यात आली होती.
****
परभणी इथल्या उर्समध्ये बेकायदेशिरपणे धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. शेख अजिम शेख अकबर, शेख रहिम शेख अकबर, सय्यद फेरोज सय्यद रज्जाक, आणि सलमान पठाण फय्याज पठाण, अशी या चौघांची नावं असून, हे सर्वजण औरंगाबाद इथले रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे, मोबाईल आणि रोख रक्कम असा ३६ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सेलू तालुक्यातल्या डासाळा शाखेची तिजोरी चोरट्यांनी सोमवारी रात्री पळवली, काल सकाळी ही घटना निदर्शनास आली. चोरट्यांनी बँकेच्या या शाखेतून रोख ७० हजार रुपयांसह, बॅंकेतील सीसीटीव्हीचे चार कॅमेरे, हार्डडिस्क, आणि डीव्हीआर पळवला आहे.
****
लातूर इथं महाराष्ट्र शिक्षक प्रदेश काँग्रेसच्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात काल झालेल्या विविध चर्चासत्रांमध्ये शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर राज्यस्तरीय बिंदू नामावली कार्यान्वित करावी, आणि विना अनुदान धोरण हद्दपार करून शाळा मूल्यांकन आणि प्रचलित नियमांनुसार शिक्षण संस्थांना अनुदान देण्याची मागणीही या संमेलनात करण्यात आली.
****
शिवरायांचावसा आणि वारसासर्वांनी नेटानं पुढे नेण्याचं आवाहन ज्येष्ठ अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रामध्ये ‘शेतकऱ्यांचा राजा : छत्रपती शिवाजी महाराजया विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
मध्ययुगीन कालखंडात छत्रपती शिवरायांनी शेतकरी हिताचं स्वराज्य निर्माण केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथले शेतकरी रामेश्वर जाधव यांनी मृदा आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत मातीचं परीक्षण करून घेतलं. यामुळे जमिनीतल्या मृदेची गुणवत्ता समजली. त्यामुळे पिकांना फक्त आवश्यक असलेली रासायनिक खतेचं दिली, परिणामी उत्पन्न वाढण्याबरोबरचं बचत झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आमच्या गावांमध्ये कृषी विभागाची माती परीक्षणची (व्हॅन) आली होती. त्यामध्ये  आम्ही माती परीक्षण करून आरोग्यपत्रिका आम्हाला भेटलेले आहे. व त्यामध्ये आम्हाला जमिनीमध्ये कोणते घटक पिकासाठी उपलब्ध आहेत व कोणते नाहीत याची पुरेपूर माहिती भेटली आहे. त्यामुळे आमचे पिकाचे खर्चाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. कारण की आम्ही जे पिकाला कमी पडलेले आहे तेच देतो. आणि इतर आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. आमच्या खर्चामध्ये बचत झालेली आहे.
****
उजनी धरणाचं पाणी लातूरला आणण्याचं काम सुरु झालं असल्याचं, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. देशमुख यांनी काल लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापारी आणि विविध संघटनांसोबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. उजनीचं पाणी धनेगावमार्गे लातूरला आणण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करणं सुरू असून, आणखी काही दिवस मंजुरीसाठी लागतील, असं ते म्हणाले.
****
जालना नगरपालिकेनं काल शहरात प्लास्टिक कचरा संकलन आणि जप्ती मोहीम राबवली. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह विविध सेवाभावी संस्था आणि शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत १५७ किलो प्लास्टिक कचऱ्याचं संकलन केलं. तसंच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या चार कापड विक्रेत्यांकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल केला.
****


No comments: