Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणार; ‘महाडीबीटी पोर्टल’च्या माध्यमातून राबवणार योजना
** केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तुरीला योग्य भाव मिळत नसल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची टीका
** सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप; ज्येष्ठ सिने निर्मात्या-दिग्दर्शक, सुमित्रा भावे यांचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान
आणि
** एकोणीस वर्षांखालील युवकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं बांग्लादेशला अजिंक्यपद
****
येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. ‘महाडीबीटी पोर्टल’च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्यानं योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असं ते म्हणाले. “महाडीबीटी पोर्टल” आणि “महाभूलेख” संकेतस्थळाची जोडणी करण्याचं काम प्रगतिपथावर असून, ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत “सातबारा” आणि आठ अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत, असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भातली कार्यवाही सरकारनं तातडीनं पूर्ण करावी, तसंच आर्थिक अराजकता लपवण्यासाठी कायदे आणले जात आहेत का, हे स्पष्ट करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं काल मुंबईत बाहेरच्या देशातून आलेल्या घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला, त्यांनंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. नागरिक्तव सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला आपण समर्थन देत असून, या कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चांना प्रत्यूत्तर म्हणून हा भव्य मोर्चा काढण्यात आल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. देशात अनियंत्रितपणे होत असलेल्या घुसखोरीवर नियंत्रण आणले पाहिजे, असं ते म्हणाले. पिढ्यांपिढ्या भारतात राहणाऱ्या मुसलमान किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांबाबत आपलं काहीही म्हणणं नसून, ते भारताचेच नागरीक असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.
****
बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनीमधले कामगार आणि इतर क्षेत्रातल्या संघटीत आणि असंघटित कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी एका डिजिटल बसचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लोकार्पण केलं. ही डिजिटल बस कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. या बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री, डोळ्यांची तपासणी, फुफ्फुसाची तपासणी आणि रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणं आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.
****
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तुरीला योग्य भाव मिळत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल औरंगाबाद इथं बैठक झाली, त्यांनतर ते वार्ताहरांशी बोलत होते. शासनानं तुरीला प्रती क्विंटल पाच हजार आठशे रूपये हमीभाव जाहीर केला मात्र, प्रत्यक्षात चार हजार तिनशे रूपये भाव मिळत असल्याचं ते म्हणाले. राज्य शासनाच्या कर्जमाफीचा दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करून एकरी पंचवीस हजार रूपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता केंद्रानं मदत दिली तरच ही मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचं, शेट्टी म्हणाले.
****
मुंबईत छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २३ लाख ८६ हजार रूपयांचं बनावट भारतीय चलन काल पोलिसांनी पकडलं. दुबईमार्गे पाकिस्तानमधून हे चलन भारतात आणलं जात होतं, असं गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितलं. यापूर्वी अशाच प्रकारे भारतात बनावट चलन आणल्या गेलं होतं का याची माहिती पोलिस घेत असल्याचं, रस्तोगी यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तिचा वापर व्यापार आणि व्यवसायात झाला पाहिजे असं मत भाषा अभ्यासक-ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानसह रूपवेध ग्रंथालयानं आयोजित केलेल्या ‘भारतीय भाषांची विविधता’या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. कुरुंदकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या या व्याख्यानमालेचं हे ३८वं वर्षे असून आज देवी यांचच ‘भाषा, राष्ट्रवाद आणि लोकशाही’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरीचं साईधाम असं नामकरण करण्याच्या मागणीसाठी काल सेलू ते पाथरी पायी दिंडी काढण्यात आली. सेलू इथं केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या आरतीनं दिंडीला सुरुवात झाली आणि पाथरीच्या साईबाबा मंदिरातल्या आरतीनं समारोप झाला. आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह इतर राजकीय नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते.
****
सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल उद्योग, क्रीडा, पर्यटन , माहिती आणि जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. याप्रसंगी, ज्येष्ठ सिने निर्मात्या-दिग्दर्शक, पटकथाकार सुमित्रा भावे यांना पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. महोत्सवात,‘ मदाथी- ॲन अनफेअरी टेल ’हा तामिळ चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिकासह, एक लाख रूपये रोख, आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.तर ‘ॲडल्ट्स इन दी रूम’ला प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं.
****
सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्यावतीनं लातूर शहरात काल काढलेल्या रन फॉर मेरीटला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो लातूरकरांनी यात सहभागी होत गुणवत्तेवर अन्याय होऊ नये या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला. औरंगाबाद, जालनासह अन्य शहरातही रन फॉर मेरीटला चांगला प्रतिसाद मिळाला. .
****
शिवसेनेच्या नांदेड जिल्हा शाखेनं जिल्ह्यातल्या पत्रकारांना प्रत्येकी एक लाख रुपयांची अपघात विमा संरक्षण पॉलिसी दिली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पॉलिसीचं वितरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या जवळपास एक हजार पत्रकारांना हे विमा संरक्षण मिळाल्याचं शिवसेनेचे शहर सह प्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पिकं वाचवण्यासाठी औषधी निरूपयोगी ठरत असून, अळी आणी किटक याची प्रतिकार क्षमता वाढत असल्यानं फवारणी करूनही रोगांचा प्रादुर्भाव कायम राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या मालेगाव इथं काल शिवसेना शेतकरी मदत केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्या हस्ते झालं. शिवसेना शेतकरी मदत केंद्रामार्फत शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळवून देणं, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतल्या अडचणी सोडवणं, शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत करणं, आदी कामं केली जाणार असल्याचं नेरुरकर यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकोणीस वर्षांखालील युवकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतावर तीन गड्यांनी विजय मिळवत बांग्लादेशनं अजिंक्यपद पटकावलं. दुस-या डावात ४१व्या षटकात झालेल्या पावसामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार खेळला गेला. प्रारंभी नाणेफेक जिंकत बांग्लदेशनं भारताला फलंदाजीस पाचारण केलं. भारताचा डाव १७७ धावांवर रोखण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर फलंदाजी करताना बांग्लादेशनं हे आव्हान सहज पार केलं.
****
संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार आर. के. कोलगणे यांनी संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. परभणी महानगरपालिकेतही संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात विकास कामांना गती देणार असून त्यादृष्टीनं नव्या कामांचे प्रस्ताव देण्याचं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. मुदखेड इथं नगरपरिषदेनं विकसीत केलेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं.
***
बीड जिल्ह्यातल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना शासन निर्णयाप्रमाणे दोन हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पाटोदा तालुक्यातले थेरलाचे रहिवाशी जवान तुकाराम राख यांना २०१०मध्ये ऑपरेशन रक्षक मध्ये वीरमरण आलं होतं.
****
No comments:
Post a Comment