Sunday, 5 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  आज रात्री दीप प्रज्वलनाचं सर्व देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Ø  फक्त आपल्या घरातले विजेचे दिवे बंद करायचे; अन्य उपकरणं तसंच रुग्णालय, पोलिस स्थानक, यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयातले दिवे सुरूच राहतील- ऊर्जा विभागाचं स्पष्टीकरण
Ø  राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ६३५ वर;  लातूर जिल्ह्यात आठ रुग्ण आढळले
Ø  राज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक तसंच क्रीडा उपक्रमांना प्रतिबंध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आणि
Ø  राज्य सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांचं मोफत धान्य वाटप करावं- केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना आज रात्री दीप प्रज्वलनाचं आवाहन केलं आहे. रात्री नऊ वाजता घरातले विजेचे दिवे मालवून, घराच्या दारात, बाल्कनीत तेलाचे दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचे दिवे लावून देशाच्या सामुहिक शक्तीची ओळख करून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नऊ मिनिटं हे दिवे सुरू ठेवावेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

 दरम्यान, या नऊ मिनिटांच्या काळात लाईट बंद झाल्यानंतर विद्युत ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी योग्य खबरदारी घेतली असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अचानक सगळे लाईट बंद केल्यानंतर ग्रीडवर त्याचा परिणाम होऊन विद्युत उपकरणांना हानी पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जार होती, त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. फक्त आपल्या घरातले लाईट बंद करायचे असून, घरातली विद्युत उपकरणं सुरुच राहतील, त्याचबरोबर रुग्णालय, पोलिस स्थानक, यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयातले लाईट सुरुच राहतील, असं मंत्रालयानं सांगितलं आहे. या काळात रस्त्यांवरचे लाईट सुरुच ठेवण्याचे निर्देश मंत्रालयानं स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
****

 राज्यात काल १४५ कोरोना विषाणू बाधित नवीन रुग्ण सापडल्यानं राज्यात या रुग्णांचा आकडा आता ६३५ झाला आहे. तर काल सहा जणांचा मृत्यू झाला.
       
 लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आठ रुग्ण आढळले आहेत. हरयाणा राज्याच्या नूह जिल्ह्यातल्या फिरोजपूर झिरका इथं गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरु दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यात निलंगा इथल्या मशिदीत आढळून आले. या बारा जणांची तपासणी करून, त्यांच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे इथं पाठवले होते. त्यातल्या आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्वजण दिल्लीत झालेल्या मरकजमध्ये सहभागी झाल्यानंतर धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापुर मार्गे निलंग्याला पोहोचले आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांची माहिती घेणार असल्याचं, जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं. ते म्हणाले....

 ज्यांच्या  संपर्कात जे जे लोक होते सर्व लोकांचा संपर्क  त्यांच्याकडून  घेण्याचा कारवाई  सुरू आहेत. त्या अनुषंगाने खात्री केले जाईल. आणि त्या ठिकाणी जे लोक आहे होते त्या सर्व ठिकाणच्या लोकांची खात्री करण्याच्या  अनुषंगाने सूचना दिल्या जाईल.

 या कोरोना विषाणू बाधित आठ रुग्णांपैकी एकही स्थानिक रहिवाशी नाही, मात्र खबरदारी म्हणून लातूरकरांनी अधिक सतर्कता बाळगावी तसंच घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.

 दरम्यान, कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहरात आजपासून तीन दिवस किराणा, भाजीपाला, आणि दूधविक्रीसह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. नागरिकांनी आजिबात घराबाहेर पडू नये, असं आवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केलं आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी एक कोरोना बाधीत एक रुग्ण आढळला असून, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या तीन झाली आहे. उमरगा शहरातला हा रुग्ण असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली.
****

 कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उद्या साजरी होणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती आणि त्याचरात्री असलेल्या ‘शब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया,  असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.   
****

 नागरिकांनी लॉकडाऊनसंदर्भातली शिस्त पाळली नाही, आणि कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढली तर येत्या चौदा एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यात केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. महानगरांमध्ये दाट लोकसंख्येच्या ठिकाणी राहणाऱ्यांनी प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक शिस्त पाळणं अत्यंत आवश्यक असल्याचं टोपे यांनी नमूद केलं.
****

 कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्यात पुढील सूचनेपर्यंत धार्मिक तसंच क्रीडा उपक्रमांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे जनतेला संदेश देताना ही माहिती दिली. आगामी काळात येणारे सर्व सण सर्वधर्मीय नागरिकांनी घरातच साजरे करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. लोकांनी सर्दी - खोकला असेल तरच कोरोना विषाणूशी संबंधित विशेष रुग्णालयात जावं, घरात राहणं हाच कोरोनावर उपाय असल्याचं सांगतानाच, कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्यांची संख्या वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे कोरोना विषाणू आपली परीक्षा घेत असताना, दुसरीकडे समाजात दुहीचा विषाणू पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले....

आणखी एक व्हायरस जो आपल्या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय, समाजघातक हा व्हायरस आहे, नोटाला थुंकी लावून पसरवणं, वेगवेगळे काही इशारे देणं, असा जर का प्रयत्न केला तर कोविडपासून मी माझी जनता वाचवेन, पण तुम्हाला मी इशारा देतोय तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणून या जर कोणी वृत्ती अगदी मस्तीत किंवा गमतीत जरी करत असेल तर त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत.

 कोरोना विषाणूसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन कोरोना विषाणूशी लढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी राज्यभर स्वतंत्र रुग्णालयं सुरू करण्यात येत असून, चाचण्यांची केंद्र वाढवली जात आहेत. राज्य सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न असून, कोरोना विषाणूविरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्र्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
****

 `लॉकडाऊन`च्या नियमांचं गांभीर्यानं पालन होत नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत कोरोना विषाणू संसर्ग आणि उपाययोजनांबाबत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशात असलेल्या संभ्रमावस्थेबाबत बोलणं अपेक्षित असल्याचं ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं लोकांचे प्रश्र्न नीट सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा लावली पाहिजे, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य खात्यावर आजपर्यंत कमीत कमी लक्ष दिलं गेलं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
****

 कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण आहे. न्यायालयीन कामं वाढवून त्यांचा ताण अधिक वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. कारागृहात असलेल्या आरोपींनी तातडीचे नसल्यास जामीनासाठी अर्ज दाखल करू नयेत, अशा सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत. फसवणुकीच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीनं न्यायालयात जामीनासाठी केलेल्या अर्जाच्या पार्श्र्वभूमीवर न्यायालयानं हे आदेश दिले.
****

 इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशभरात एक लाख चौतीस हजार लोकांना या संदर्भात वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आलं असून सर्व राज्यांमध्ये वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. अकरा हजार ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारांना देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात देशभरात कोरोना विषाणूचे सहाशे एक नवे रुग्ण आढळले असून बारा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत निजामुद्दीन इथं झालेल्या तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबंधित रुग्ण सतरा राज्यांमध्ये आढळले असून अशा रुग्णांची एकूण संख्या एक हजार तेवीस इतकी आहे. देशभरातल्या रुग्णांच्या तुलनेत तीस टक्के रुग्ण तबलिगी कार्यक्रमाशी थेट संबंधित आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
****

 राज्यातल्या कामगारांच्या निर्माण होणाऱ्या रोजगारासंबंधी अडचणींचं निराकरण करण्यासाठी कामगार विभागातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करून विभाग निहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. कामगारांनी संबंधित संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या परिस्थितीत उद्भवणाऱ्या रोजगारा संबंधी अडचणींचे निराकरण करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे
****

 राज्यात लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री बंद असून, या कालावधीत अवैध मद्य विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध  राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई सुरु केली आहे. राज्यात एकूण  एक हजार २२१ गुन्हे नोंदवण्यात आले असून, दोन कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच ४७२ आरोपींना अटक केली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर प्रशासनाला एन ९५ चे ५ हजार `मास्क` तसंच इतर ५ हजार `मास्क`, हातमोजे, वैयक्तिक साधसामुग्रीसह इतर सुरक्षिततेचं आवश्यक असलेलं साहित्य दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर इथं कोरोना विषाणूचे दोन रुग्ण आढळल्यानं संगमनेर शहरात आणि तालुक्यातले व्यवहार पुढचे तीन दिवस शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

 अहमदनगर इथं कोरोना विषाणू बाधित एका रुग्णाच्या चाचण्या नकारात्मक आल्यानं त्याला काल घरी सोडण्यात आलं. उपचार घेऊन बरा झालेला अहमदनगर मधला हा दुसरा रुग्ण आहे. अहमदनगर इथल्या रुग्णालयात विलगीकरण कक्षात सध्या पंधरा कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात चौदा मार्च नंतर आलेल्या सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी स्वत: घरी विलगीकरणात राहावं, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी म्हटलं आहे. या नागरिकांना कोणताही आजार नसला तरीही त्यांनी चौदा दिवसांची विलगीकरणाची मर्यादा पाळावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. ते म्हणाले...

 आम्ही आपल्या सर्वांना आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत आपण कोरोना  फ्री  abad.in या पोर्टलवर जाऊन आपण ऊसपुर्ध पणे जे रजिस्ट्रेशन केलं. जे १ मार्च नंतर  भारतात आलेल्या आहेत किंवा 14 मार्च नंतर जे औरंगाबाद शहरात जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःच रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यामुळे आमच्याकडे जवळपास 25000 लोकांचा डेटा उपलब्ध आहे.  त्यांना आपण सल्ला देतोय की तुम्ही पुर्णतःहा  १४ दिवस  तुम्ही आपल्या आपल्याचं  स्वःताने होम कारंटाइन मध्ये राहा जेणेकरून जरी आपण असिंन्टोमेटीक करीअर्स असला  तरी पण याचा प्रादुर्भाव हा इतर समाजात किंवा इतर फॅमिलीत इतर ठिकाणी कुठे होणार नाही.

 औरंगाबाद इथं १३ संशयित रूग्ण काल जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात आता एकूण २६ संशयित रूग्ण दाखल असल्याचं जिल्हा शल्य  चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. या रूग्णालयात आतापर्यंत दोन हजार २४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. काल तपासणी झालेल्या १४५ रूग्णांपैकी ६३ जणांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
****

 जालना जिल्ह्यात परदेशातून तसंच मुंबई, पुण्यासह परराज्यातून आलेल्या पंधरा हजार ५७३ नागरिकांची आरोग्य विभागानं तपासणी करून त्यांना घरीच विलगीकरणात ठेवलं आहे. जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सध्या ४३ कोरोना संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी एका रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्याचा कोराना तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

 दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल नगरपरिषद आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांना आपल्या क्षेत्रातल्या कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांचा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून १४ दिवस पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं विशिष्ठ समाजाला उद्देशून सार्वजनिक माध्यमावर व्हिडिओ टाकल्याप्रकरणी एका युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद शहरात काल महारक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबीरातून नांदेड शहरातल्या गोलवळकर रक्त पेढीने एकशे ऐंशीं बाटल्या रक्त संकलीत केलं.
****

 बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत पंधरा ठिकाणी संशयित रुग्णांना विलगीकरण करण्याची सोय केली आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन इथल्या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातले २८ जण गेले होते. त्यापैकी १३ जण परत आले. १३ पैकी आठ जणांचे अहवाल नकारात्मक आले असून, पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

 दरम्यान, जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्याच्या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बदल केले आहेत. बीड, अंबाजोगाई, परळी आणि माजलगाव या चार शहरात सात, नऊ, ११ आणि १३ तारखेला सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे, तर उर्वरित भागात आठ, दहा आणि १२ तारखेला सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत संचारबंदी शिथिल राहील, असं जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****

 परभणी इथं अडकून पडलेल्या परप्रांतिय मजुरांना खासदार सुरेश जाधव यांनी २०० जणांना आवश्यक किराणा आणि भाजीपाल्याचं वाटप केलं. मागील आठ दिवसांपासून हे परप्रांतीय कामगार पालम तालुक्यात अडकून पडले आहेत. पूर्णा इथं अडकलेल्या कामगारांना बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महास्थवीर यांच्या मागदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. सेलू इथल्या श्री श्वेतांबर जैन संघाच्यावतीनं नूतन महाविद्यालय वसतीगृहात थांबलेल्या ४० जणांना मास्क, सॅनिटायझरसह जीवनावश्यक वस्तूंचं काल वाटप करण्यात आलं.

 नांदेड जिल्ह्यात मुखेड आणि नांदेड रुग्णालय इथं प्रत्येकी ५० खाटांचं विशेष कोरोना विषाणू रुग्णालय सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल या रुग्णालयांना भेट दिली. इटनकर यांनी जिल्ह्यातल्या स्थलांतरीत मजुरांचं समुपदेशन करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथल्या श्री सत्यगणपती देवस्थानच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पंचवीस लाख रुपयांचा धनादेश धर्मदाय आयुक्तांकडे काल सुपुर्द करण्यात आला.

 बीड जिल्ह्यात माजलगाव तालुका व्यापारी संघाच्या वतीनं मालीपारगांव आणि वारोळा गावातल्या ५१ गरीब गरजु कुटुंबांना प्रत्येकी बाराशे रूपयांचं किराणा सामान वाटप करण्यात आलं.
****

 मुंबईतल्या नालासोपारा इथून जीपमधून परत येणाऱ्या २७ जणांना काल परभणी जिल्ह्यातल्या देवगाव फाटा इथं पोलिसांनी ताब्यात घेतलं. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे सर्वजण हिंगोली आणि रिसोड तालुक्यातले असल्याचं समजतं.
****

 नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना विषाणूबाधित रूग्ण आढळला नसून, एकूण ४०५ लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. काल चार रूग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
****

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी काल जिल्ह्यातल्या आरोग्य, रेशन वाटप तसंच विविध कामांचा आढावा घेतला. अनेक गोर गरिबांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नसल्यामुळे गडाख यांनी, सामाजिक संस्थेच्या वतीनं एक किलो तांदूळ, साखर, अर्धा किलो दाळ असे ३० हजार पॅकेट देण्याचा निर्णय जाहीर केला. संपूर्ण जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत धान्य वाटप चांगल्या पद्धतीनं करावं, जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या अडवू नयेत, जिल्हा रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचार करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना दिल्या.
****

 राज्य सरकारनं स्वस्त धान्य दुकानांतून नियमित धान्य वितरणासह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांचं मोफत धान्य वाटप करावं, असं केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. कोराना विषाणूच्या प्रादुर्भावर त्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे संवाद साधला. ते म्हणाले...

 दर महिन्याला नेहमीप्रमाणं, तीन लाख त्र्याऐंशी हजार टन धान्याव्यतिरिक्त तीन महिन्याचे फ्री राशन दिल्या जाणार आहे. हे अतिरिक्त धान्य जे फ्री मिळणार आहे, ते प्रत्येक व्यक्ति प्रति महिना पाच किलो इतकंय. २० लाख मेट्रीक टन कोठा, एफसीआय मार्फत आमच्याजवळ महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. आपण फ्री राशन आणि रेग्युलर राशन एकाच वेळेस उचलून ते जनतेपर्यंत पोहोचवावे, अन्न नागरी पुरवठा राज्य मंत्री म्हणून मी राज्य सरकारला विनंती करतो.
****

 जनधन खात्यामध्ये जमा झालेले पाचशे रुपये काढण्यासाठी जालना शहरातल्या काही बँकांसमोर महिला गर्दी करत आहेत. जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनीच फक्त जालना बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला खरेदी करावा, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आलं आहे.
****

 नागरिकांनी घरातच रहावं, रस्त्यावर येऊ नये यासाठी वारंवार आवाहन करण्यात येऊनही अनेकजण निष्काळजीपणा दाखवत रस्त्यावर येत असल्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे. परभणी शहरांतील रस्त्यांवर अडथळे लावून रस्ते बंद करण्यात आले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. भाजी बाजार, किराणा दुकानदारांना सकाळी अकरा वाजता आपले व्यवहार बंद करण्यास सांगण्यात आलं. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना वाहनांसह ताब्यात घेतलं.
****

 नांदेड शहरात काल संचारबंदीचा नियम मोडून फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या १५० जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्या दुचाकी जप्त केल्या.
****

 जालना इथल्या राज्य राखीव बल -एसआरपीएफ गट क्रमांक तीनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. या जवानांनी काल रस्त्यालगत पाल ठोकून राहणाऱ्या गरजू कुटुंबांना जीवनाश्यक वस्तुंच्या तीनशे पाकिटांचं वाटप केलं.
****

 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नयेत यासाठी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी भायेगाव, राहेगाव, किकी या तीन गावांमध्ये काल निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करून घेतली.

 हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यामधल्या कांडली गावात काल निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.
****

 परभणी महानगरपालिकेच्या वतीनं मलेरिया विभागामार्फत कर्मचाऱ्यांना ड्रेसकोट वाटप करण्यात आले. विविध ठिकाणी कॉलनी अंतर्गत औषध फवारणी, धूर फवारणी अग्नीशामक गाड्यामार्फत दोन झोन करून अग्नीशामक अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. शहरात स्वच्छता मोहीमही राबवण्यात येत आहे.
****

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर, छायाचित्रं कोणत्याही समाज माध्यमांमध्ये पसरवू नये, असं आवाहन नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयानं केलं आहे. असा मजकूर लिहिलेला आढळून आला तर कडक करवाई करण्याचा इशारा कार्यालयानं काल जारी केलेल्या पत्रकात दिला आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...