Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०२० सायंकाळी ६.००
****
Ø पीक कर्ज परतफेडीला
३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; खरीप
हंगामातल्या चौदा धान्यांचे किमान आधारभूत दर निश्चित - केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतले
निर्णय
Ø देशात कोविडग्रस्तांचं बरे होण्याचं
प्रमाण ४८ पूर्णांक १९ शतांश टक्क्यांवर
Ø औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
संख्या एक हजार पाचशे एकोणसत्तर
Ø हिंगोली तसंच जालन्यात प्रत्येकी दोन तर उस्मानाबादमध्ये
तीन नवे रुग्ण
आणि
Ø उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर
चक्रीवादळाचा
धोका
****
पीक कर्जाची परतफेड
करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या
बैठकीनंतर हि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी,
नरेंद्रसिंह तोमर यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. पीककर्जाची दिलेल्या
मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना चार टक्के व्याज दर आकारण्यात येणार असल्याचं,
यावेळी सांगण्यात आलं.
खरीप हंगामातल्या
चौदा धान्यांचे किमान आधारभूत दर निश्चित करण्यात आले आहेत, हे दर, संबंधित पिकाच्या
उत्पादन खर्चापेक्षा ५० ते ८३ टक्के अधिक असतील,
धानाची किमान आधारभूत किंमत या हंगामासाठी एक हजार ८६८ रुपये प्रतिक्विंटल ठरवण्यात
आल्याचं, या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
फेरीवाल्या विक्रेत्यांना
व्यवसायासाठी दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या
बैठकीत घेतला. सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग - एमएसएमईच्या निकषांचा विस्तार करण्यास
केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. ५० कोटी रुपये गुंतवणूक तसंच २५० कोटी रुपये
वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांचा एमएसएमईमध्ये समावेश असेल.
****
देशात कोविडग्रस्तांचं
बरे होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक १९ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात
चार हजार ८३५ लोक या आजारातून बरे झाले आहेत, तर सध्या ९३ हजार ३२२ रुग्णांवर देशात
उपचार सुरू आहेत. देशात या आजाराची लागण झालेल्यांची संख्या एक लाख ९०
हजार ५३५ वर पोहोचली आहे, यापैकी पाच हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातला या
आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर दोन पूर्णांक ८३ शतांश टक्के एवढा असल्याचं, आरोग्य मंत्रालयाकडून
सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची संख्या एक हजार पाचशे एकोणसत्तर इतकी झाली आहे. आज सकाळी या
आजाराचे २६ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार एकोणतीस रुग्णांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली असून बहात्तर जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या चारशे
अडूसष्ट रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात
आज नवीन दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईहून औंढा इथं
आलेल्या १७ वर्षीय पुरुषाचा तर वसमत इथं विलगीकरण कक्षात असलेल्या १२ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात
एकूण एकशे ब्याऐंशी रुग्ण आढळले असून त्यापैकी एकशे पाच रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी
देण्यात आली आहे. सध्या ७७ रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली
आहे.
****
जालना आणि अंबड शहरात
आज प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या
कोरोना विषाणू बाधितांची रुग्णांची संख्या एकशे अठ्ठावीस झाली आहे. जालना शहरातल्या मोदीखाना परिसरातली
३६ वर्षीय महिला आणि मुंबईहून परतलेली अंबड इथली २१ वर्षीय
गर्भवती महिला अंबड इथं न जाता जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
आज तीन जण कोरोना विषाणू बाधित आढळले आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात सुंबा इथल्या एका
महिलेचा तर परंडा तालुक्यातल्या वाटेफळ इथल्या दोन पुरुषांचा समावेश आहे,
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात
आज सकाळी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या तीन झाली
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज दुपारच्या सत्रात कोरोनाविषाणू
संसर्गातून १६ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १२० कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. आता नांदेड जिल्ह्यात
२१ कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज पर्यंत जिल्ह्यात १४९ रूग्ण
कोरोनाविषाणू बाधीत आढळून आले होते. यापैकी आठ रुग्ण मृत्यू पावले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आज
चौदा कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात १५६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, त्यापैकी एकोणीस
जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज धुळे
जिल्ह्यात सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनानं
केले.
****
नंदुरबार जिल्ह्यात
आज नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून उपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता फक्त तीन बाधितांवर उपचार सुरू
असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
जम्मू-काश्मीर मध्ये सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी
संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. बडगाम जिल्ह्यात ही
कारवाई करण्यात आली. या दहशतवादी टोळी
कडून स्फोटक साहित्य, शस्त्रे, एक किलो हेरॉईन आणि दीड लाख रुपये
रोख जप्त करण्यात
आले असल्याचं या वृत्तात
म्हटलं आहे. काश्मीर पोलिस, राष्ट्रीय रायफल्स दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाई
केली आहे.
****
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे
उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर परवा बुधवारपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं
वर्तवली आहे.
या चक्रीवादळाचा मुंबईला मोठा तडाखा बसण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सुमारे सव्वाशे
किलोमीटर प्रतितास वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून दमणकडे जाण्याचा
अंदाज आहे.
दरम्यान, केरळमध्ये आज नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन
झालं. केरळचा बहुतांश भाग मोसमी पावसानं व्यापला असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात
आलं आहे. देशात यंदा वेळेवर दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे या पावसाळ्यात सरासरी १०२
टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज आठ नवीन कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळून आले
आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातल्या साखरखेर्डा इथं एक, मलकापूर शहरात चार धरणगाव इथं
एक, तसंच मोताळा तालुक्यातल्या शेलापूर खुर्द इथं दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण
झाली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातल्या ४२ डॉक्टरांचा संघ
मुंबईत आरोग्य सेवेसाठी दाखल झाला आहे. पुढचे १५ दिवस डॉक्टरांचा हा संघ मुंबईतल्या
सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णसेवा देणार आहे. कोविडग्रस्तांचं वाढतं प्रमाण पाहता, डॉक्टर
आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी राज्यातल्या सर्व
वैद्यकीय महाविद्यालयातून काही डॉक्टर तसंच परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर मुंबईत पाठवण्याचे
निर्देश दिले होते, त्यानुसार हा संघ मुंबईत दाखल झाला आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं उदगीर तालुक्यातल्या
करडखेल इथं “मीच माझा रक्षक” या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे
यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रे यांनी गावातील परीसर स्वच्छता, वैयक्तिक
स्वच्छता, हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून अंतर राखून काम करणे या
नियमांचे पालन केले पाहिजे असे सांगितले.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या कळका भागात
ठिबक सिंचनाद्वारे शेतजमीनीला पाणी देऊन नंतर हळद लागवडीला सुरूवात झाली आहे. हिंगोली
जिल्ह्यातही कळमनुरी तालुक्यात काल झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी हळद पेरणीला सुरूवात
केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात
आज दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वझर इथं ही दुर्घटना घडली.
आज सकाळी हे
दोघे भाऊ धरणाजवळच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असताना, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
कर्जत, जामखेड तालुक्यांना कुकडी कालव्यातून
उन्हाळी आवर्तन मिळावं, यासाठी माजी जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आज
कर्जत तहसील कचेरीसमोर उपोषण केलं. उन्हाळा
संपून आता पावसाळा तोंडावर आला, मात्र दुष्काळी
असलेल्या या भागाला अद्यापही उन्हाळी आवर्तन मिळालेलं नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.
कुकडी कालव्याचे अभियंता हेमंत धुमाळ यांनी ६ जूनला या डाव्या कालव्यातून पाणी सोडले
जाणार असल्याचं सांगितलं आहे.
****
येत्या दहा तारखेपर्यंत
सचखंड रेल्वेने परभणी तसंच पूर्णा रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच
वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनास सहकार्य करावं,
असं आवाहन परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी केलं आहे.
दरम्यान आज परभणी इथून
६२ प्रवासी सचखंड रेल्वेने रवाना झाले
*****
***
No comments:
Post a Comment