Tuesday, 2 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 02 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
आयात कमी करून, उत्पादकता वाढवणं हे आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय उद्योग महासंघ - सीआयआयच्या १२५ व्या वर्धापनदिनानिमित्त संघटनेच्या सदस्यांशी बोलत होते. कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करणं आणि अर्थव्यवस्था बळकट करणं, या दोन बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्या सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणा सुनियोजित, सुसंबद्ध आणि भविष्यकाळाचा विचारातून केलेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाला विकासाच्या मार्गावर पुन्हा अग्रेसर करण्यासाठी नवोन्मेष, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, या मुद्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज पंतप्रधानांनी या संबोधनातून व्यक्त केली.
****
पीएम केअर्स फंड - पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्ती परिस्थितीत मदत निधीत जमा झालेल्या पैसा जाहीर करावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेला केंद्र सरकारने विरोध दर्शवत ही याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली आहे. अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयाला ही विनंती केली. खंडपीठाने  केंद्र सरकारला या संदर्भात दोन आठवड्याच्या मुदतीत एका प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआरने गेल्या २४ तासात  कोविड संदर्भात एक लाख २८ हजार ६८६ नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. आता देशात परीक्षण केलेल्या नमुन्यांची संख्या ३९ लाख ६६ हजारावर पोहोचली आहे. सध्या देशात ४७६ सरकारी तर २०५ खासगी अशा एकूण ६८१ प्रयोगशाळांमधून या चाचण्या केल्या जात असल्याचं, आयसीएमआरकडून सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ५५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात २४ महिला आणि ३१ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. शहरातल्या शहा बाजार, चंपा चौक, कटकट गेट, नारळीबाग, गणेश कॉलनी,  हमालवाडी, ज्योतीनगर, फजलपुरा, मिलक़ॉर्नर, एन-३ सिडको, एमजीएम परिसर, रोशन गेट, विशालनगर गाराखेडा परिसर,अहिंसा नगर, मुकुंदवाडी, विद्या निकेतन कॉलनी, न्याय नगर, चंपा चौक म्हाडा कॉलनी ,नेहरू नगर, जुना मोंढा नाका परिसर इथं प्रत्येकी एक रूग्ण, भीम नगर, शिवशंकर कॉलनी,  नाथ नगर, बायजीपुरा , विजय नगर इथं प्रत्येकी दोन रूग्ण, जवाहर नगर इथं तीन,  एन सहा संभाजी कॉलनी इथं ७ तर समता नगर  इथं ५, संजय नगर मुकुंदवाडी इथल्या ४, यशवंत नगर पैठण इथल्या एक आणि अन्य तीन रुग्णांचा यात समावेश आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या एक हजार ६४२ झाली आहे. यापैकी एक हजार ४९ कोरोना विषाणू बधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सध्या ५१४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
दरम्यान, शहरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातल्या कोरोन विषाणू बाधित ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला
****
धुळे शहरात आणखी तीन रुग्णांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात एक ६८ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय तरूण आणि एका २४ वर्षीय महिलेचा समावेश  आहे. आता धुळे जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या १६७ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या शिरपूर इथं आज सकाळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या उप निरिक्षकास कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. रविवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. हे उप निरीक्षक शिरवळ इथल्या तपासणी नाक्यावर कार्यरत आहेत
****
राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबात आरोग्य विज्ञान विद्यापीठानं तातडीन निर्णय घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि या परीक्षांबाबत असलेली अनिश्वितता लवकरात लवकर दूर करण्यास सांगितलं आहे. या परीक्षांबाबत चा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो, या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत.
****
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यानं संभाव्य निसर्ग चक्री वादळाचा फटका पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्याच्या भागांत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्याला  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पालघर मध्ये १, डहाणू मध्ये १ आणि वसईमध्ये दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत चक्रीवादळाचा धोका असलेल्या सातपाटी गावात ग्रामपंचायतीच्या लोकांकडून घरोघरी जाऊन जनजागृती केली जात असून लोकांना गावात व्यवस्था केलेल्या ठिकाणी जाण्यास सांगण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातही आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे समुद्रात वेगवान वारे वाहत असल्याचं आहेत आमच्या वार्ताहरानं कळविले आहे
****

No comments: