Thursday, 4 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 04 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** तृणधान्य, डाळी, तेलबिया, खाद्य तेल, कांदा आणि बटाटा यांसारखी शेती उत्पादनं अत्यावश्यक वस्तू कायद्यातून मुक्त;  शेतमाल विक्रीसाठीही 'एक देश, एक बाजार' धोरणास मंजुरी, देशात कुठेही आणि कोणालाही शेतमाल विकण्याची शेतकऱ्यांना परवानगी
** निसर्ग चक्रीवादळाचा मध्य महाराष्ट्रातून ईशान्य दिशेला प्रवास सुरू;  तीव्रता कमी होत असल्याची हवामान विभागाची माहिती
** राज्यात काल एका दिवसात १२२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू, तर दोन हजार ५६० नव्या रुग्णांची भर
** औरंगाबादमध्येही चार रुग्णांचा मृत्यू तर ५५ नवीन बाधित रुग्ण
** नांदेडमध्ये २१ तर जालना, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये प्रत्येकी सहा नवीन रुग्ण
आणि
** कोरोना विषाणू चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांच्या दर आकारणीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं काल अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा आणि कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य ( प्रोत्साहन आणि सुविधा) अध्यादेशाला मंजुरी देऊन
शेतकऱ्यांच्या हिताचे आणि कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर या निर्णयांची वार्ताहरांना माहिती दिली.  अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे, तृणधान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटा यांसारखी शेती उत्पादने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून मुक्त झाली आहेत. या वस्तूंच्या साठ्यावर, किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजाराच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य तो फायदा घेता येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल चांगल्या दराने विकण्याचा पर्याय खुला होईल, तसंच खासगी गुंतवणुकदारांचा हस्तक्षेप कमी होईल. सरकारच्या या निर्णयामुळे शीतगृह, शेतमाल प्रक्रियेत खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.  यामुळे, खाजगी गुंतवणूकदारांना, आता नियमनांची आणि सरकारी हस्तक्षेपाची अवाजवी भीती असणार नाही,असं ते म्हणाले.

कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य ( प्रोत्साहन आणि सुविधा) अध्यादेशाला मंजुरी देऊन सरकारनं शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विकण्याच्या बंधनातून शेतकऱ्यांना मुक्त केलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच्या क्षेत्रात अगदी दुसऱ्या राज्यातही शेतकरी आपला शेतमाल विनासायास विकू शकतील, त्यासाठी त्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही, असा बदल सरकारनं कायद्यात केला आहे. शेतकरी आपल्या पसंतीनुसार, आपल्या सोयीनुसार हा माल देशात कुठेही आणि कोणालाही विकू शकणार आहेत. त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मही सरकार उपलब्ध करुन देणार असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.  एक भारत, एक कृषी बाजारपेठ या दिशेने ही वाटचाल असल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र जर, देशात युद्ध, दुष्काळ, असामान्य दरवाढ आणि नैसर्गिक संकटांसारखी परिस्थिती उद्भवली, तरच या सर्व कृषी उत्पादनांवर बंधनं लावण्याचे अधिकार सरकारनं आपल्याकडे कायम ठेवले आहेत.
या सुधारणेमुळे, शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मदत होईल आणि वस्तूंच्या किमती स्थिर राहतील. तसेच, साठवणूक सुविधांच्या अभावामुळे  कृषीमालाचे होणारे नुकसान देखील कमी होईल, असं तोमर म्हणाले.
देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयं आणि विभागांमध्ये परियोजना विकास सेल, तथा सचिवांचं दल स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. 
आयुष मंत्रालयाअंतर्गत सहायक कार्यालयाच्या रुपात भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठी फार्माकोपिया आयोगाच्या पुनर्स्थापनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
कोलकाता पोर्ट ट्रस्टचं नाव बदलून शामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असं करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
निसर्ग चक्रीवादळानं मध्य महाराष्ट्रातून ईशान्य दिशेला कूच करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र या वादळाची तीव्रता कमी होत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. नाशिकपासून ७० किलोमीटर तर औरंगाबादपासून ९० किलोमीटर अंतरावर या वादळाचा केंद्रबिंदू असून २७ किलोमीटर प्रतिघंटा या वेगानं ते पुढे सरकत आहे. यामुळे आगामी २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात तसंच नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री वाढलेला वाऱ्याचा वेग आज पहाटे कमी झाला. खानदेशात हे वादळ प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विधिज्ञ के.सी पाडवी यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, काल रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, दिवे आगार भागात हे चक्रीवादळ दाखल झालं त्यानंतर ते उरणच्या दिशेने अग्रेसर झालं. हे वादळ धडकल्यानंतर किनारपट्टीलगतची अनेक झाडं उन्मळून पडली. अलिबाग परिसरातल्या अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. मुंबई- गोवा महामार्गावरही अनेक झाडं उन्मळून पडल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. रेवदंडा आणि मुरूडला जोडणारा साळाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले तर जिल्ह्यात थळ बाजार मधल्या दीड हजार मच्छिमारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.
या वादळामुळे काल रायगड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातल्या उमटे इथं दशरथ वाघमारे यांचा अंगावर वीज मंडळाचा डीपी पडून मृत्यू झाला, तर श्रीवर्धन तालुक्यातल्या सोयगाव गवळीवाडा इथं अमर जावळकर या १६ वर्षाच्या मुलाचा अंगावर भिंत पडून मृत्यू झाला. अलिबाग  नजिक रामराज इथं डीपी अंगावर पडून एक जण जखमी झाला.
वादळानं आपली दिशा बदलल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र त्याच्या तडाख्यातून वाचलं. वादळापासून बचावासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सुमारे चाळीस हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.
या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोली इथल्या काही इमारतींवरचे याशिवाय समुद्र सपाटी लगत असलेल्या भागातल्या घरांवरचे पत्रे उडून गेले, झाडे उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले आहेत. आंबाघाट इथं एक मोठे झाड कोसळल्यानं वाहतूक थांबली होती. तर गुहागर-खेड मार्गही बंद आहे, अशी माहिती रत्नागिरी प्रशासनानं दिली आहे. दरम्यान रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर भगवती बंदरातून अँकर तुटल्यानं भरकटलेल्या बोटीवरच्या १३ खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. यात तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात  कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नाही.
****
या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. नाशिक जिल्ह्यात काल दुपारनंतर ३५ ते ४० किलो मीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते, वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वणी इथं घाट मार्गावर दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परीणाम झाला आहे.
****
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम काल राज्यभरात दिसून आला. कोकण किनारपट्टी, मुंबई, नाशिक, पुण्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रात्रभर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.
जालना शहरासह तालुक्याच्या काही भागात काल दुपारी अर्धा तास पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. जोरदार वाहणाऱ्या वादळामुळे खिरविरे विभागातल्या जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचं मोठं नुकसान झालं.
****
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे एका दिवसात सर्वाधिक १२२ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात या आजारानं दोन हजार ५८७ जणांचा मृत्यू झाला. काल राज्यभरात दोन हजार ५६० नव्या रुग्णांची भर पडल्यानं एकूण बाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. तर काल राज्यभरात ९९६ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३२ हजार ३२९ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर सध्या ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद शहरात काल दिवसभरात चार बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयामध्ये सिडको एन-फोरमधला ७४ वर्षीय पुरूष आणि अन्य एका ८९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला तर शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये रहीम नगरमधल्या ४२ वर्षीय पुरूष आणि बायजीपुऱ्यातल्या इंदिरा नगरमधल्या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ८५ कोरोना विषाणू बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक हजार ११३ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात ५५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता एक हजार सातशे वर गेली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये शिवशंकर कॉलनी पाच, कैलासनगर आणि मिल कॉर्नरमध्ये प्रत्येकी चार, खोकडपुरा, समता नगर, समृद्धी नगर, लेबर कॉलनी, भावसिंपुरा, आणि सुराणा नगर भागात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. जसवंतपुरा, संजय नगर मुकुंदवाडी, अजिंक्य नगर, सिडको एन-फोर, जय भवानी नगर, हमालवाडी, रेल्वे स्टेशन, पिसादेवी रोड, कटकट गेट, सिल्लेखाना, नूतन कॉलनी, बारी कॉलनी, उल्का नगरी, सिडको एन-सिक्स संभाजी कॉलनी, शरीफ कॉलनी, कैलास नगर, स्वप्न नगरी, गारखेडा परिसर, भवानी नगर, जुना मोंढा, पुंडलिक नगर रोड गारखेडा, करीम कॉलनी, इंदिरा नगर, शाह बाजार, घाटी हॉस्पिटल परिसर, नागसेन कॉलनी बायजीपुरा, किराडपुरा, कोहिनूर कॉलनी आणि रहीम नगर तसंच विद्यानिकेतन कॉलनी या भागात प्रत्येकी एक, आणि अन्य भागात तीन रुग्ण आढळले. पैठण शहरात यशवंत नगर इथं तीन तर सिल्लोड इथं अब्दुलशहा नगरात एक रुग्ण आढळला आहे.
****
नांदेड इथं काल आणखीन २१ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता १७५ झाली आहे. काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातल्या देगलूर नाका भागातले ११, शिवाजीनगर नई आबादी भागातले नऊ आणि देगलूर तालुक्यातल्या अमदापूर इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यात ४१ रुग्णांवर उपचार सुरु असून, नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत आठ रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. जालना शहरातल्या मोदीखाना भागातल्या तीन, म्हाडा कॉलनी, नूतन वसाहत भागातल्या प्रत्येकी एक तर मंठा शहरात एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता १५९ झाली आहे. मोदीखाना भागातले तिघे बाधित एकाच कुटुंबातले असून, ते यापूर्वी कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातले आहेत. दरम्यान, एका बाधित व्यक्तीच्या अंत्यविधीस हजर असलेल्या ४० नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर या व्यक्तीच्या अंत्यविधीस हजर राहणाऱ्या तीन नगरसेवकांसह, नगरपालिकेचे काही कर्मचारी आणि अन्य १०० नागरिकांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. केसरजवळगा, धुता, सुचबा, कारी इथले प्रत्येकी एक, तर कळंब तालुक्यातल्या अंदोरा इथले दोन रुग्ण आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. रेणापूर तालुक्यातल्या कामखेडा इथले आणि लातूर शहरातल्या संभाजी नगर इथले प्रत्येकी दोन, औसा तालुक्यातल्या हिप्परगा, औसा शहरातल्या केदार नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, अहमदपूर तालुक्यातल्या पाटोदा इथल्या एका व्यक्तीचा काल कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला.
****  
हिंगोली जिल्ह्यात काल ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात काल आणखी ५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. मनमाड आणि मालेगावमध्ये प्रत्येकी १५, नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालय वसाहतीत एक, तर नांदगाव, येवला, इगतपुरी इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. सोलापूर शहरात ४० नवे रुग्ण आढळून आले. यात महापालिकेच्या महिला पदाधिकारी आणि त्यांचे पती तसंच शहरातल्या एका आमदारांच्या बंधूंचा समावेश आहे. अमरावती इथं काल आणखी ७ जणांना, तर सांगली, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
****
कोरोना विषाणू चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांच्या दर आकारणीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी राज्य शासनानं चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जळगाव इथं ही माहिती दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे हे समितीच्या अध्यक्षपदी असतील, असं ते म्हणाले. खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणीचे दर पंधराशे ते अठराशे रुपयांपर्यंत कमी करण्यात येतील, असं टोपे यांनी सांगितलं. रुग्णांना सेवा देण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी, तसंच त्यांचे परवाने रद्द करावे, असे आदेशही टोपे यांनी दिले आहेत.
****
मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करावं अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र, तसंच महाराष्ट्र आणि गोवा राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. कामगार न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. इतर राज्यांमधल्या न्यायालयांनाही त्यांच्या राज्यांच्या नावावरुन ओळखलं जावं अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.   
****
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात महावितरण यंत्रणेने सतर्क राहून वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा करण्याच्या सूचना महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत. चव्हाण यांनी काल मराठवाड्यातल्या सर्व अधिक्षक अभियंत्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त साहित्य उपलब्ध केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त काल आदरांजली वाहण्यात आली.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक माध्यमाद्वारे समर्थकांशी संवाद माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण नव्या आत्मविश्वासानं जनसेवा करणार असल्याचं म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर आपण पक्ष सोडणार अशा अफवा पसरल्या होत्या, मात्र भारतीय जनता पक्ष सोडणार नसून, आपल्याला कोणत्याच पदाची लालसा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपल्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी यावेळी केली.
****
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपिनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण केली. गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित उपेक्षित, दीन - दुबळ्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
****
लातूर इथं महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मुंडे  यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आलं.
रेणापूर तालुक्यातल्या मौजे दवणगाव इथं मुंडे यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं उदघाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या हस्ते झालं.
उस्मानाबाद इथ जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं.
परभणी इथंही भाजपच्या वतीनं मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं.
मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठवाडा युवक विकास मंडळानं काल ‘कोविड १९ संघर्ष योद्धा संमेलन’ सामाजिक माध्यमाद्वारे घेतलं. या ऑनलाईन संमेलनाचं उद्घाटन करताना पद्मभूषण डॉ अशोक कुकडे यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
****
परभणी जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या एक हजार सातशे अंगणवाडीच्या लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसंच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या सर्व लाभार्थ्यांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. याविषयी अधिक माहिती देतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास घोडके म्हणाले …

या माध्यमातून दररोज या लाभार्थ्यांना एक लिंक शेअर करुन त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले तर ज्या गरोदर आणि स्तनदा माता हे त्यांना स्तनपान बाळाचा आहार किंवा यांची कशी काळजी घ्यावी याबाबतचे व्हिडिओ त्या माध्यमातून दररोज शेअर केले होते तर कुपोषित बालकांसाठी घरगुती ग्राम बाल विकास केंद्र म्हणजेच त्यांना कुपोषनातून बाहेर काढण्यासाठी घरातल्या पालकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली जावी या पद्धतींचे दररोज व्हिडिओ शेअर केले गेले आणि याचा अतिशय फायदा झालेला आहे.
अंगणवाडीताई ज्योती जवळेकर यांनी या व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना होत असलेल्या मदतीबाबत माहिती दिली.  त्या म्हणाल्या..

मी ज्योती मुंजाजी जवळेकर अंगणवाडी कार्यकर्ती बाबुळगाव क्रमांक तीन विभाग जाम दोन प्रकल्प परभणी दोन तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या पालकांचे व्हॉटसॲप ग्रुप करून त्यांना दैनिक अॅक्टिविटी देऊन ती घरी करून घेण्यास लावले तसेच गरोदर व स्तनदा मातांना व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना आहार आरोग्य व स्तनपानाविषयी माहिती दिली कुपोषित मुलांचे ग्रुप करून त्यांना आहार आरोग्य स्वच्छता विषयी माहिती देऊन अंगणवाडीच्या सेवांची व योजनांची गाव पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी केली याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
लातूर जिल्ह्यात देवणी इथल्या पोलीस कर्मचाऱ्याला काल दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. मुरलीधर मारोतीराव दंतराव असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, तक्रारदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात असलेले प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं वलांडी पोलीस चौकीत काल सापळा रचून त्याला अटक केली.
नांदेड जिल्ह्यातही मुदखेड तालुक्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला काल पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. श्याम अर्जुनराव काळे असं या पोलिसाचं नाव असून, आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद शहरातल्या बाजारपेठा उद्यापासून सुरु होत आहेत. मात्र, बाजारपेठ सुरु करण्यासाठी दुकानदारांवर घातलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा व्यापारी महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन महासंघाच्या वतीनं काल महापालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांना सादर करण्यात आलं. सम विषम तारखेला बाजारपेठ सुरु करणं, प्रत्येक दुकानदारानं थर्मल आणि ऑक्सीमीटर ठेवणं, आदी अटी रद्द करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या भोकरंबा इथल्या हरभरा खरेदी केंद्राविरूद्ध चार दिवसात कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षानं दिला आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, आमदार रमेश कराड यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी इथं विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं. या प्राध्यापकांची काल आमदार मोहन फड यांनी भेट घेतली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन फड यांनी यावेळी दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले डाव्या विचारसरणी कार्यकर्ते अरुण शेळके यांचं काल बार्शी इथं कर्करोगानं निधन झालं. १९७२ साली ते भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. १९७४ पासून ते कळंब इथं राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे ते बराच काळ जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
****



No comments: