Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
कोरोना विषाणू बाधित रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी
डॉक्टरांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
**
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी
सज्ज - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
**
राज्यात आणखी दोन हजार ७३९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण तर उपचारादरम्यान
१२० जणांचा
मृत्यू
**
औरंगाबाद हर्सुल कारागृहात २९ रूग्ण, काल दिवसभरात १०४ रुग्णांची नोंद
** जालना २४, उस्मानाबाद सहा, लातूर दोन तर नांदेड जिल्ह्यातही
एक नवा रुग्ण
**
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेला तीन वर्षासाठी मुदतवाढ
** महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या
परीक्षांचं वेळापत्रक जाहीर,
१५ जुलैपासून परीक्षांना सुरुवात
आणि
** शिवराज्याभिषेक
सोहळा किल्ले रायगडासह राज्यभर उत्साहात साजरा
**
कोरोना विषाणू बाधित रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर
कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे इथं काल कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्म उपाययोजनांच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. या संकटकाळात खासगी रुग्णालयाकडून हलगर्जीपणा होत
असल्याची बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले. खासगी रुग्णालयांशी
समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही पवार यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसंच प्रशासन सर्वतोपरी सज्ज
असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं, जिल्ह्यात या संसर्गाबाबत करण्यात
येत असलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे उद्योगमंत्री तसंच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई
यांच्या नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत दोनशे खाटांचं विशेष रुग्णालय तयार होत असून,
जिल्ह्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचं रुग्णालय उपलब्ध होत
असल्याचं देशमुख म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूसंदर्भात ग्रामीण
स्तरापर्यंत योग्य पद्धतीनं जनजागृती होत असून, जिल्हा,
स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना
राबवण्यात येत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी नमूद केलं.
****
कोरोना विषाणू चाचण्यांसाठी जालना इथं आरटी-पीसीआर
प्रयोगशाळेला मान्यता मिळाली असून ही प्रयोगशाळा तातडीनं कार्यान्वित करावी,
असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते काल जालना इथं बोलत होते. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी
सुमारे सव्वा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, टोपे यांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
वरिष्ठ अधिकारी आणि खाजगी डॉक्टरांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात
कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री
टोपे यांनी दिले. जिल्ह्यातल्या खाजगी डॉक्टरांसह शासकीय वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी बाधितांवर एकत्रितपणे उपचार करावेत, खासगी डॉक्टरांनी
त्यांच्या नियमित सेवेबरोबरच कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या सेवेसाठी पुरेसा वेळ
द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. खासगी डॉक्टरांसाठी दीड हजार पीपीईकीट्स आणि एन ९५ मास्क उपलब्ध करून देण्यात
येणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतात कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा विस्फोट झाला नसला तरी त्याचा धोका कायम असल्याचं
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. देशातली टाळेबंदी
उठवली जात असताना रुग्णांची संख्या सध्या तीन आठवड्यांमधे दुप्पट होत असल्याचं संघटनेच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीसारख्या उपायांमुळे
देशात विषाणूचा प्रसार होण्यावर नियंत्रण राहिलं आहे, परंतू टाळेबंदी
उठल्यानंतर लोकांची हालचाल सुरू होईल तेंव्हा हा आजार पुन्हा बळावण्याचा धोका असेल,
असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी दोन हजार ७३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८ झाली आहे. काल या आजारानं १२० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत
दोन हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यभरात काल दोन
हजार २३४ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३७ हजार ३९० जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचे नवे एकशे चार रुग्ण आढळले. यापैकी एकोणतीस नवे रुग्ण हर्सुल कारागृहात आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या आता एक हजार नऊशे पन्नास झाली आहे.
यापैकी एक हजार एकशे चौऱ्यांशी रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नव्व्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात
सहाशे सदुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं, जिल्हा
प्रशासनानं कळवलं आहे.
काल आढळलेल्या रुग्णांमध्ये रोशन
गेट परिसरात पाच, पीर बाजार उस्मानपुरा इथं
चार, गारखेडा परिसर, हुसेन कॉलनी,
लेबर कॉलनी इथं प्रत्येकी तीन, मिल
कॉर्नर, भवानी नगर, आंबेडकर
नगर, एन अकरा टी.व्ही सेंटर, एन आठ- सिडको, भीमनगर, भावसिंगपुरा, संजय नगर, नॅशनल
कॉलनी, या भागात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. राधास्वामी कॉलनी, भारतमाता नगर, सिडको एन बारा, हर्सुल परिसर, अहिंसा नगर,
शिवशंकर कॉलनी, न्याय नगर, कैलास नगर,
बीड बायपास, हनुमान नगर, गादिया विहार, शंभू नगर, तोफखाना-
छावणी, जुनी मुकुंदवाडी,
पदमपुरा, समता नगर, युनुस कॉलनी,
जुना बाजार, जय भीम नगर, गौतम नगर, देवडी बाजार, वेदांत
नगर, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी, अल्तमश कॉलनी , पैठण गेट, रेहमानिया कॉलनी, बारुदगर नाला, जिन्सी, सादात नगर,
घाटी परिसर, पिसादेवी रोड इथं प्रत्येकी एक नवा
रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात पिंपळगाव देवशी, गंगापूर इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये किराडपुरा भागातली ५० वर्षीय महिला, जटवाडा इथली
६३ वर्षीय महिला, चंपाचौक इथला ५० वर्षीय पुरुष तसंच सवेरा पार्क
इथल्या ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २४ रुग्ण आढळले.
जालना शहरातल्या पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पाच, तर संभाजी
नगर, काद्राबाद, शंकरनगर, बालाजी नगर, क्रांतीनगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला. मंठा तालुक्यातल्या नानशी आणि आकणी इथं प्रत्येकी दोन, घनसावंगी तालुक्यातल्या
यावलपपिंपरी इथं एक, तर पांगरा इथं पाच जण बाधित आढळले. त्यामुळे जालना जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या १९८ झाली आहे.
घनसावंगी तालुक्यातल्या पांगरी इथल्या ६५ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा
काल जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील
कोरोना विषाणमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. तर
काल जालना जिल्ह्यात सात बाधित रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत ८८ जण विषाणू मुक्त झाले आहेत.
दरम्यान, मोदीखाना परिसरात कोरोना विषाणूचा
संसर्ग वाढत असल्यानं हा संपूर्ण परिसर
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी
काल या भागाची पाहणी केली. नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडू नये
यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित
पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. कळंब तालुक्यातल्या
शिराढोण इथले चार, सास्तुर इथला एक, तर उस्मानाबाद शहरातल्या उस्मानपुरा भागातला एक
रुग्ण आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. त्यापैकी ५९ रुग्ण बरे झाले
आहेत.
****
लातूर
जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात लातूर शहरातला एक आणि
उदगीर शहरातल्या आझादनगर इथला एक रुग्ण आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल ११ रुग्णांचा बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत
१११ रुग्ण बरे झाले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल एक कोरोना विषाणूचा रुग्ण आढल्यामुळे जिल्ह्यात या विषाणूचा
संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एकशे नव्वद झाली आहे. दरम्यान, तीन रुग्ण काल बरे झाले. आतापर्यंत जिल्ह्यात १२९ कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तर ५३ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाविषाणू
संसर्गामुळे आजपर्यंत आठ रुग्ण मृत्यू पावले आहेत.
****
सांगली जिल्ह्यात काल एका अठ्ठावन्न वर्षीय कोरोना विषाणू बाधीत महिलेचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्या आता पाच झाली आहे. सध्या सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू
असून आतापर्यंत एक्क्याऐंशी रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली
आहे.
****
कोरोना
विषाणूचा संसर्ग झालेल्या सर्वांना उपचार मोफत मिळावेत, आणि उपचारात गरीब श्रीमंत असा
भेदभाव नसावा, असा विचार राज्यातल्या साहित्यकांनी मांडला आहे. याबाबतचं निवेदन काल
जारी करण्यात आलं. वैद्यकीय सेवांचं राष्ट्रीयीकरण व्हावं, आरोग्य विम्यावरच अवलंबित्व
बंद करावं, सरकारी दवाखान्यांची संख्या आणि दर्जात वाढ करावी, सर्वांना रोजगाराचा मूलभूत
अधिकार असावा,आदी मागण्याही या साहित्यकांनी केल्या आहेत. याशिवाय नागरिकांनी आपल्या
परिसरातल्या गरजूंना मदत करावी, तसंच साहित्यिकांनी आपल्या उत्पन्नातून मदत निधीत योगदान
करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
****
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार शंभर टक्के अपयशी ठरले असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते काल अहमदनगर इथं आढावा बैठकींनंतर पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत राज्य सरकार फक्त केंद्राच्या मदतीकडे पाहत असल्याची
टीका करत, वाढत्या रुग्ण
संख्येला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सेवा देत नसल्याचंही दरेकर यांनी म्हटल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही
मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला परवडणाऱ्या दरात अखंडित वीज पुरवठा करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड कंपनीच्या नागपूर जवळ आदासा इथल्या एक आणि मध्यप्रदेशातल्या
दोन कोळसा खाणींचं दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करताना मुख्यमंत्री काल बोलत
होते. अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत आता उर्जेचाही समावेश करावा लागेल असं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांची वीजेची मागणी आणि अपेक्षा
शंभर टक्के पूर्ण झाली, असं आजही म्हणता येत नसल्याबद्दल त्यांनी
खंत व्यक्त केली. कोळसा खाणी पर्यावरण पूरक असाव्यात,
अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी व्यक्त केली.
****
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना पुढचे
तीन वर्ष म्हणजे २०२३ पर्यंत राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. कृषी
मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी
ही योजना ऐच्छिक असून शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. मृग
बहारात संत्रा, मोसंबी, डाळिंब,
पेरु, लिंबू आणि चिकू या सहा फळ पिकांसाठी
अठरा जिल्ह्यांमधे ही योजना राबवली जाणार आहे. आंबिया बहारामधे द्राक्षं, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि काजू या सात फळ
पिकांसाठी तेवीस जिल्ह्यांमधे आणि स्ट्रॉबेरी हे फळ पीक प्रायोगिक तत्वावर फक्त
सातारा जिल्ह्यात राबवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या
योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या फक्त पाच टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना
द्यावा लागणार असून उर्वरित विमा हप्ता राज्य आणि केंद्र शासन भरणार असल्याचं कृषी
मंत्री भुसे यांनी सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातल्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचं वेळापत्रक
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. परिक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली. येत्या
१५ जुलैपासून या परिक्षा सुरु होणार आहेत. वेळापत्रकात नमूद लेखी आणि प्रात्यक्षिक
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्थानिक
अथवा गावाजवळ उपलब्ध असलेलं परिक्षाकेंद्र देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून,
विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच
शांतपणे परीक्षेची तयारी करावी, असं त्यांनी सांगितलं. परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी
प्रसिद्ध करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
****
शिवराज्याभिषेक सोहळा काल किल्ले रायगडासह राज्यभर उत्साहात
साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर
गर्दी टाळून हा उत्सव साजरा झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक
महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शहाजीराजे यांच्या
हस्ते मेघडंबरीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
यावेळी करण्यात आला. शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखान्यासमोर
ध्वजवंदन करण्यात आलं.
****
‘शिवराज्याभिषेक दिन’ हा ‘संकल्प दिन’ मानून
शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढं नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, असं
आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला
शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कारभाराचा
जगापुढे आदर्श असून, शिवराज्याभिषेक दिन म्हणजे
महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, राज्य कारभाराचा आदर्श राज्याला सदैव मार्गदर्शऩ आणि प्रेरणा देत राहील,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांनी
राज्यात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ‘प्रजा सुखी तरच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार
केल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथं शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा झाला.
पुंडलिक नगर इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार अतुल सावे यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज नांदेड इथं खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
परभणी शहरातही शिवप्रेमींनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केलं.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात ‘आधुनिक
शेतीतील अद्ययावत डिजिटल आणि जैवतंत्रज्ञान साधने’ या विषयावर
ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. राष्ट्रीय
कृषी उच्च शिक्षण प्रकल्प - नाहेपच्या वतीनं घेण्यात आलेल्या
या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलॅड विद्यापीठाच्या संचालक डॉ.
निना मित्तर यांच्या भाषणाने झालं. शेतीत रासायनिक
कीटकनाशकांऐवजी जैवतंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या जैविक कीटकनाशकांचा वापर
केल्यास पर्यावरण संतुलन साधता येईल, असं मत मित्तर यांनी यावेळी
व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या मेंडका इथ बी बी एफ यंत्राद्वारे सोयाबीन
पेरणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबीर शेतकरी गंगाधर चंदलवाड यांच्या शेतात काल घेण्यात
आलं. यावेळी मुदखेड तालुका कृषि अधिकारी आर.
एन. शर्मा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीमुळे बारा जूनपर्यंत
वाढवण्यात आली आहे. संगणकीकृत पद्धतीनं हे अर्ज दाखल करायचे असून
संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं विद्यापीठानं प्रसिद्धीस दिलेल्या
निवेदनात नमूद केलं आहे.
****
राज्य सरकारनं विद्यार्थ्यांचं थकीत आणि चालू वर्षाचं शैक्षणिक शुल्क
माफ करावं अशी मागणी जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी
काल उस्मानाबाद इथं केली आहे. टाळेबंदीमुळे सर्वच पालक आर्थिक संकटात सापडले
असताना पालकांना थकीत शूल्क भरायची सूचना केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल भोकरदन इथं एका घरात छापा टाकून नऊ लाख
३८ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला. या कारवाईत
पोलिसांनी एक महागडी कारही जप्त केली असून, गुटखा तस्करी करणारा
संशयित शेख अजमत कुरेशी यास ताब्यात घेतलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दुसऱ्या कार्यकाळातलं
एक वर्ष पूर्ण केलं असून, या वर्षभरातली कामगिरी घराघरापर्यंत पोहचवण्याचा
निर्धार शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त
केला आहे. अनेक निर्णयांची माहिती लातूर शहर मतदारसंघातल्या
नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी शहर भाजपा आगामी महिनाभर विविध उपक्रम राबवणार असल्याचं
लातूर शहर भाजप अध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगण्यात आलं.
****
माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं
निधन झालं. त्या अठ्ठ्याऐँशी वर्षांच्या होत्या.
या आणि बाणीनंतरच्या काळात मुंबईतल्या माटुंगा मतदारसंघातून त्या तीनवेळा विधानसभेवर
निवडून आल्या होत्या. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या त्या आई होत.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपरिषदेनं नागरिकांना प्रतिकार शक्ती वाढवणारं होमिओपॅथिक
औषध अर्सेनिक अल्बम ३० चं वाटप करावं, आणि नगर परिषद कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना पिपीई
किटचे वाटप करण्याची मागणी कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा मनिषा मस्के यांनी केली आहे.
यासंदर्भातलं निवेदन त्यांनी काल नगरपरिषद मुख्यधिकारांना दिलं.
****
नांदेड इथल्या गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या बैठकीत काल आर्थिक वर्ष २०२० -
२१ साठी १२५ कोटी ८८ लाख रुपयाच्या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून ही बैठक घेण्यात आली. गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीनं टाळेबंदीच्या काळात सुमारे २८ लाख
४१ हजार रुपयांचे अन्नधान्याचे पाकिटं वितरीत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात
आली.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथला आषाढी यात्रा सोहळा
रद्द करण्यात आल्यामुळे बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथल्या संत
गहिनीनाथ महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरनं पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. माजी आमदार भीमराव धोंडे आणि गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी ही माहिती
दिली आहे. पालखी सोहळ्यात खंड पडू नये म्हणून हा निर्णय घेतला
असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या तीस जूनला पादुका
प्रस्थान सोहळा होणार असून, या संबंधी लवकरच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भीमराव धोंडे यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नगरपालिका प्रशासनानं भाजी बाजार योग्य ठिकाणी स्थलांतरीत
करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गर्दीच्या उद्देशानं
प्रशासनानं भाजी बाजार शहरापासून एक किलोमीटर दूर भरवण्यास सांगितलं होतं, मात्र याठिकाणी सर्वत्र घाण पसरली असून, पावसाळ्यात साथीचे
आजार होण्याची शक्यता असल्यानं, हा बाजार दुसरीकडे भरवावा,
अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या देवळा इथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटात ट्रॅक्टर
उलटून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण
चांदवड तालुक्यातले रहिवासी आहेत. काल सकाळी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरनं येत असताना भावडबारी
घाटाच्या पायथ्याशी अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं
ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला
आणि ट्रॅक्टर उलटल्यानं हा अपघात झाला.
****
कुटुंबप्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्यामुळे एकाकी
पडलेल्या महिलांसाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना लागू करण्यात आली आहे.
त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा, कामगार आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. अमरावती इथं तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.
या योजनेतून अचलपूर पंचायत समिती क्षेत्रात दोन लाख ८० हजार
रूपयांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं असल्याची माहिती राज्यमंत्री
कडू यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment