Friday, 19 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणूक काढण्यास आणि गर्दी करण्यास बंदी, साधेपणानं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** राज्यात आणखी तीन हजार ७५२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १०० रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्येही सहा जणांचा मृत्यू तर ८० नवे रुग्ण
** नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोलीतही रुग्णांच्या संख्येत वाढ
** भारत - चीन सीमा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक
** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग बाराव्या दिवशी वाढ
** राज्य सरकारसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण
** आणि
** मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२०चे ग्रंथ पुरस्कार जाहीर 
****
यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणूक काढण्यास आणि गर्दी करण्यास बंदी घालण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आगामी गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राज्यातल्या गणेश मंडळांचे तसंच मूर्तिकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेश मंडळांमार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा विचार व्हावा, आणि यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. 
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ओडिशात जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेला यंदा सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल हा निर्णय देताना, सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी यंदा रथयात्रेला परवानगी देता येणार नसल्याचं सांगितलं. जर रथयात्रेला परवानगी दिली, तर भगवान जगन्नाथ आपल्याला क्षमा करणार नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे.२३ जूनपासून ही रथयात्रा सुरू होणार होती.
****
राज्यात काल आणखी तीन हजार ७५२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख २० हजार ५०४ झाली आहे. काल १०० रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत पाच हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात एक हजार ६७२ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ६० हजार ८३८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये आंबेडकर नगरमधली ३३ वर्षीय, समता नगरमधली ५५ वर्षीय, गणेश कॉलनीतली ८१ वर्षीय महिला, आणि कैसर कॉलनीतल्या ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथली ५७ वर्षीय महिला आणि रायगड जिल्ह्यातल्या कळंबोली इथल्या ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी ८० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या तीन हजार ११६ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ६५ रुग्ण शहरातले आहेत. तर ग्रामीण भागात बजाज नगर इथं आठ, चिकलठाणा आणि पंढरपूर इथं प्रत्येकी दोन, तर पडेगाव, जटवाडा, नारेगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. 
द्‌रम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या एक हजार १९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****  
नांदेड जिल्ह्यात काल नव्याने दहा कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. यामुळे नांदेड जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या २९६ झाली आहे. सध्या १०२ रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकुण १८१ रूग्ण बरे झाले आहेत. १३ रूग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
जालना शहरात आणखी दहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, यामध्ये राज्य राखीव दलाच्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातल्या कादराबाद भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णसंख्या तीनशे चोवीस झाली आहे. दरम्यान, शहरातल्या लोधीमोहल्ला भागातल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा काल जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जालना जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या आता दहा झाली आहे.
****
दरम्यान, जालना जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना विषाणू बाधितांची संख्या चिंतेची बाब असून, जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध अधिक कडक करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय आयुक्तांनी काल जिल्हा कोवीड रुग्णालयास भेट देऊन रुग्णांना देत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोरोना चाचण्यांसाठी जालन्यात उभारण्यात येत असलेल्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर शहरातल्या भोई गल्ली इथं दोन, सुतमिल रोड, जुनी कापड लाईन इथं प्रतयेकी एक, आणि औसा तालुक्यातल्या माळकोंडजी, आणि निलंगा तालुक्यातल्या कासार बालकुंदा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर जळकोट तालुक्यातल्या एकुरगा इथंल्या एका रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल बाधित असा आला आहे. लातूर जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या ११ झाली आहे. तर आतापर्यंत १३९ रुग्ण बरे झाले असून, सध्या ६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. सलगरा इथले तीन, तुळजापूर तालुक्यातल्या माळंबरा आणि नळदुर्ग इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १६५ झाली आहे. त्यापैकी १२७ जण बरे झाले असून, सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. संतुर पिंपरी, कनेरगाव नाका आणि वसमत इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाचा अहवाल बाधित असा आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २३७ झाली आहे. त्यापैकी २०० जण बरे झाले असून, सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल एक हजार २९८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ६७ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ४७२ नवे रुग्ण तर सहा जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये ११६ आणखी बाधित रुग्ण आढळले, तर दोन मृत्यू, ठाणे जिल्ह्यात ८४५ नवे रुग्ण आणि ३० मृत्यूंची नोंद झाली. नवी मुंबई २०२, जळगाव १३५, सातारा १८, यवतमाळ नऊ आणि रत्नागिरी जिल्ह्यात काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांना दाखल करुन घेण्यास खासगी रुग्णालयांनी टाळाटाळ करु नये, अशी सूचना औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. प्रमुख खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या बैठीत ते काल बोलत होते.   खाजगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावं, कोणालाही परत पाठवू नये, रुग्ण गंभीर असल्यास वेंटिलेटरची किंवा आयसीयु बेडची उपलब्धता नसल्यास त्याबाबत पूर्वकल्पना देऊन उपचार सुरू करुन तातडीने महापालिका नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कोविड डेडीकेटेड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या १७ कोरोनाविषाणू बाधित रूग्णांची भेट घेऊन चर्चा केली.  त्यांनी रुग्णांना पुरवण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहिती घेतली. 
****
आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी उद्या शनिवारी गरीब कल्याण योजनेला सुरुवात केली जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होणारी ही योजना पुढचे १२५ दिवस एक अभियान म्हणून चालवली जाणार आहे. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा राज्यातल्या ११६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल.
दरम्यान, टाळेबंदीच्या काळात गावी गेलेले परराज्यातले मजुर पुन्हा राज्यात परत येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या औद्योगिक क्षेत्रातलं काम हळूहळू पूर्वपदावर येत असतांना दर दिवशी सुमारे १५ हजार मजूर राज्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सरासरी ११ हजार पाचशे तर उर्वरित मजूर गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यात परतत आहेत.  परतणाऱ्या मजुरांच्या बाबतीत तपासणी तसंच गृह विलगीकरण करून योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
****
भारत - चीन सीमा भागामधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्यकाळी पाच वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होणार असून, यावेळी विविध पक्षांचे प्रमुख सहभागी होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे.
****
लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय सैनिकांकडे नेहमी शस्त्रं असतात, त्यानुसार १५ जूनला गलवानमधे असलेल्या सैनिकांकडेही शस्त्रं होती, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. १९९६ आणि २००५ च्या करारांनुसार समोरासमोर असताना बंदुकीसारखी शस्त्रं वापरायची नाहीत, हा नियम पाळला जात असल्याचं ते म्हणाले.  
****
गलवानमधे झालेल्या चकमकीत कुणीही भारतीय सैनिक बेपत्ता झाले नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्समधे प्रकाशित झालेल्या एका लेखात तसा दावा केला असल्यानं लष्करानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. 
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग बाराव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर ५३ पैसे, तर डिझेलच्या दरात ६४ पैसे वाढ नोंदवण्यात आली. बारा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात लिटरमागे सहा रुपये ५५ पैसे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे सात रुपये चार पैसे वाढ झाली आहे.
****
राज्य सरकारसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारबाबत काँग्रेस पक्षात मतभेत असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर थोरात वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली असून, सरकारमध्ये समानता असावी इतकीच काँग्रेस पक्षाची अपेक्षा असून, वादाचा कोणताही विषय नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट  केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीनं राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले आहेत. शेट्टी यांनी काल यासंदर्भात सामाजिक संपर्क माध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली. आघाडीच्या या प्रस्तावाबाबत संघटनेची अंतर्गत बैठक होऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना होकार कळवण्यात आला होता, मात्र संघटनेतून काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला, विधान परिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होणं योग्य नाही, म्हणून हा प्रस्तावच नको, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.या विषयावर कोणीही आपल्याशी चर्चा करु नये असंही शेट्टी यांनी नमूद केलं आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे वर्ष २०२० साठीचे ग्रंथ पुरस्कार काल जाहीर झाले. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. नरेंद्र मोहरीर वाड्.मय पुरस्कार डॉ. देवकर्ण मदन यांच्या ‘मराठवाड्यातील साहित्य समिक्षा आणि संशोधन’ त्याचबरोबर डॉ. बाळू दुगडुमवार यांच्या ‘बाबा आमटे: व्यक्तिमत्व, कवित्व व कर्तुत्व’ या ग्रंथांना विभागून जाहीर झाला आजे. नरहर कुरुंदकर वाड्.मय पुरस्कार नांदेडचे मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीला, प्राचार्य म. भि. चिटणीस वाड्.मय पुरस्कार नागपूरचे चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही’? या ग्रंथाला, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार पैठणचे संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाला, बी. रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार बीडचे सोपान हाळमकर यांच्या ‘वाढण’ या कथासंग्रहाला, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार नांदेडचे जगदीश कदम यांच्या ‘वडगाव लाईव्ह’ या नाटकाला आणि सुनंदा गोरे यांच्या ‘नवीन प्रतिक्षा’ या बालनाट्याला विभागून जाहीर झाला आहे. आणि रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार पुण्याच्या संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनीताराजे पवार यांना जाहीर झाला आहे.
**** 
जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाला टाळेबंदीनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २८ हजार ६२१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून एक लाख ७ हजार ५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ७११ कोटी २३ लाख रुपये जमा झाले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावं, असं आवाहन जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावरच्या प्रत्येक नागरिकांनं ‘कोरोना दूत’ म्हणून वैयक्तिक जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं सात पथकं पाठवण्यात आली होती. या पथकांनी सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, वडोदबाजार, खुलताबाद, वैजापूर, शिल्लेगाव, पैठण या ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेऊन, नागरिकांना वैयक्तिक खबरदारी घेण्याबाबत माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे, यासंदर्भातलं पत्र जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे त्यांनी सादर केलं. जिल्ह्यातल्या हरभरा उत्पादन करणाऱ्या पन्नास हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली असल्याचं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
****
लातूरच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकातल्या रुग्णांसाठी ५४० खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाचे डॉ. एन. पी. जमादार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत हे आरक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं
****
परभणी जिल्ह्यातल्या वारकरी सांप्रदायाचे अनुयायी अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘वारी पंढरीची’ हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या दोनशेहून अधिक कीर्तनकारांनी तसंच सामाजिक संपर्क माध्यमातून वीस हजार लोकांनी सहभाग घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात यंदा खरीप पीक कर्ज वाटपासाठी दोन हजार कोटी रुपयाचं आणि रब्बीसाठी ५१० कोटी रुपयांचं उदिष्ट असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश पठारे यांनी काल दिली. सामाजिक माध्यमाद्वारे त्यांनी काल जनतेशी संवाद साधला. जिल्ह्यात आतापर्यंत २०० कोटी रुपयांचं खरीपसाठी पीककर्जाचं वाटप झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले….

कोरोनाचे संकट आहे त्याच्यानंतर आपला थोडासा महात्मा फुले कर्ज माफीचे थांबलेले काम वगैरे त्यामध्ये लागलेला जो वेळ आहे हे असतानाही आपण आत्तापर्यंत दोनशे कोटींचे कर्जवाटप आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे महात्मा फुले कर्ज माफी योजना लाभधाराक आहेत त्यांना बँकांमध्ये बोलून काही ठिकाणी जमलं तर कॅम्प घेऊन काही ठिकाणी इतर लोक प्रतिनिधी त्यांची मदत घेऊन इतर सगळ्या मार्गांनी लवकरात लवकर कर्जपुरवठा करण्यात येईल.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या देवपिंपरी इथं एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याचं काल उघडकीस आलं. पालख्या डोंगरावरच्या मंदीरात ११ जून रोजी हे लग्न लावण्यात आलं होतं. याप्रकरणी ४० जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक  कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड पोलिस ठाण्यातला पोलिस हवालदार सुरेश बाजीराव पाटील याला लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रशासनानं शासकीय सेवेतून बडतर्फ केलं आहे. वीज जोडणीचं काम करणाऱ्या एका कामगाराच्या कुटुंबियांविरूध्द दाखल प्रकरण मिटवण्यासाठी सुरेश पाटील याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती
****
नांदेड जिल्ह्याच्या इस्लापूर पोलिस स्थानकात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक केशव जाधव यांना सहा  हजार रुपयाची लाच घेताना पकडण्यात आलं. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयाची लाच मागितली होती, तडजोडीअंती ती सहा हजार इतकी ठरली. 
****
मुंबईसह राज्यात अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि पूर्णा शहर आणि परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जालना तालुक्यातल्या रामनगर, सिंधीकाळेगाव, मौजपुरी, अंबड तालुक्यातल्या मळपिंपळगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुधना नदीला पूर आला होता. बदनापूर शहरासह डोंगरगाव परिसरात, तसंच घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातल्या विविध भागात सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी असं आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे. विलगीकरणाच्या भितीमुळे काही नागरिक खोटी माहिती देत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे. शहरातल्या नऊ झोनचे पालक अधिकारी आणि कोविड निरीक्षकांची काल आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या कर्मचाऱ्यांना शरीरातला ताप आणि ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आतापर्यंत शहरातल्या एक लाख २६ हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ५३ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
****
चीनने आपल्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं काल शहरातल्या गुलमंडी इथं निदर्शने केली. यावेळी व्यापारी महासंघानं चिनी माला वर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी चिनी वस्तू मागू नये असं आवाहनही यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, प्रफुल्ल मालानी यांच्यासह अन्य उपस्थितीत व्यापारी बांधवांनी केलं आहे. 
*****
नांदेड शहरात पर्यावरण संरक्षण ग्रुपच्या वतीनं काल शहरात ‘एक झाड माझे अभियान’, या उपक्रमाअंतर्गत पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. नांदेड शहरातल्या पाच किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर गतवर्षी या ग्रुपच्या वतीनं पाच हजार वृक्ष लावण्यात आले होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना फेरफार नक्कलेची मागणी केली जात असून, ही अट रद्द करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या अटीमुळे तलाठी कार्यालयात रांगा लागत असून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत आहे.  वेळेवर पेरणी नाही झाली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल, असं पक्षानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...