Monday, 21 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून आज प्रत्यक्ष पाहणी

** काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं निधन

** ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवादात्यावर कारवाई -  केंद्रीय ऊर्जा मंत्री

** सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयतक्रांती संघटना आणि भाजपची गुरुवापासून समर्थन फेरी

आणि

** औरंगाबाद इथं दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

****

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची आज केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार, केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव यशपाल, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल, नागपूर कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांची दोन पथकं वेगवेगळ्या जिल्ह्यात पाहणी करून पंचनामे करत आहेत.

एका पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यात निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यात शेकटा, गाजीपूर, निलजगाव तसंच गंगापूर तालुक्यात ढोरगाव, मुरमी, वरखेड या ठिकाणी या पथकानं पाहणी केली,

 

तर दुसऱ्या पथकाने उस्मानाबाद तालुक्यात पाटोदा आणि केशेगाव इथं पाहणी केली. केशेगाव इथं अतिवृष्टीमुळे भिंत फुटून वाहून गेलेला साठवण तलाव, तसंच नुकसानग्रस्त शेतीची तर पाटोदा इथं खरडून गेलेल्या शेतीची तसंच नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी करून या पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमानुसार शेतजमीन दुरुस्ती तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करावी, या मागणीचं निवेदन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पथकाकडे सादर केलं.

 

दरम्यान, हे पथक उद्यापासून २६ तारखेपर्यंत राज्यात सोलापूर, पुणे, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. २६ डिसेंबरला नागपूर इथं आढावा बैठक घेऊन हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.

****

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचं आज दिल्लीत निधन झालं, ते ९३ वर्षाचे होते. व्होरा यांना ऑक्टोबर महिन्यात कोविडची लागण झाली होती, त्या संसर्गातून ते बरे होऊन घरी परतले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना मूत्राशयाच्या संसर्गावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्होरा हे मध्यप्रदेश विधानसभेवर सहा वेळा निवडून गेले होते. त्यांनी दोन वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते चार वेळा लोकसभेवर तर एकदा राज्यसभेवर निवडून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण, तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. व्होरा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. प्रशासकीय आणि संघटनात्मक कार्याचा अनेक दशकांचा अनुभव असलेलं ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण करताना, पक्ष सदैव त्यांच्या कार्याचं स्मरण करेल, असं म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन अमरावतीचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केलं आहे. 

****

ब्रिटनमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, केंद्र सरकारनं ब्रिटनला जाणारी सगळी विमानं, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रद्द केली आहेत. उद्या २२ डिसेंबरच्या रात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. उद्या रात्रीपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानप्रवाशांना RTPCR चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

सरकार ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असून ग्राहकांना समाधानकारक सेवा न देणाऱ्या वीज सेवा दात्यास शिक्षा केली जाईल, असं केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री राजकुमार सिंह यांनी म्हटलं आहे. वीज ग्राहकांचे अधिकानिर्धारित करणाऱ्या नियमांची घोषणा आज मंत्री सिंह यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. नव्या नियमांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य ग्राहकांना क्तीशाली बनवत आहे. सर्वांना आपल्या अधिकारांची आणि अधिकारांच्या अंमलबजावणीची माहिती असली पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन प्रथमच कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना सेवा देतांना निर्धारित वेळेची मर्यादा ओलांडल्यास सेवादात्यास दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचं ऊर्जा मंत्री सिंह यांनी सांगितलं.

****

सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्यातले शेतकरी आज नाशिकहून दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यासह पालघर, डहाणू, अहमदनगर, तसंच सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जमण्यास सुरुवात झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. किसान सभेच्या वतीनं या शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे हे शेतकरी २४ डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचणार आहेत

****

सुधारित कृषी कायद्यांच्या समर्थनात रयतक्रांती संघटना आणि भाजपतर्फे राज्यभरात समर्थन फेरी काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना या कायद्याची माहिती करून देणं, हा या फेरीचा उद्देश असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते. या समर्थन फेरीला २४ डिसेंबरला सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यात येडे मच्छिंद्र या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून सुरुवात होईल, पहिल्या टप्प्यात ही फेरी सांगली तसंच कोल्हापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. एकूण सहा टप्प्यांत ही फेरी विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातून निघणार असल्याचं, खोत यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या दोन कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नऊ नवे कोविड बाधित रुग्ण आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार १८८ झाली असून एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ९२२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार १४६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ९२५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १६ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बार हजार २८५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज दोन नवे कोविडबाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार चारशे एकोणसाठ एकूण कोविडग्रस्तांपैकी तीन हजार तीनशे ब्याऐंशी रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

उत्तरेतल्या शीतलहरीमुळे मराठवाड्यात पारा खाली घसरला असून, आज सकाळी परभणीत पाच पूर्णांक सहा दशांश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. राज्यात धुळे जिल्ह्यात आज सहा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस तापमानाची तर नाशिक मध्ये आज नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...