Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –
१६ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा
मोठा दिलासा; साखर निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या
बॅंक खात्यात जमा होणार
** कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं
निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
** सुधारित कृषी कायद्यांबाबत तीन दिवसांत
निर्णय न घेतल्यास, महाराष्ट्रातही आंदोलनाचा अखिल भारतीय किसान सभेचा इशारा
** औरंगाबाद इथं एका कोविडग्रस्ताचा मृत्यू तर जालन्यात नवे १५ रुग्ण
आणि
** नांदेड जिल्हा परिषदेचा ६३ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय; नियुक्तीपत्रं प्रदान
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
यंदा साखरेच्या निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी पाच हजार ३६८ कोटी रुपयांचा पहिला
हप्ता थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून, ऊस देयकाच्या थकबाकीपोटी
ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाच
कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसंच पाच लाख कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं, जावडेकर
यांनी सांगितलं. यंदा देशात ३१० लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे, देशातली साखरेची
मागणी २६० लाख टन आहे. साखरेच्या सुमारे ६० लाख टन अतिरिक्त साठ्याच्या निर्यातीसाठी
साडे तीन हजार कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, या निर्यातीतून
१८ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळणं अपेक्षित असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
मंत्रिमंडळानं स्पेक्ट्रम लिलावाच्या पुढच्या टप्प्यालाही आज मंजुरी दिली. केंद्रीय
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. या संदर्भातली सूचना याच महिन्यात
जारी होणार असून, लिलाव प्रक्रिया मार्च महिन्यात होणार आहे.
****
कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना
लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात
येणार आहे. लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत
नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती
स्तरावर प्रत्येक गटात एक दुष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारांना
देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य
सेवा केंद्रांनाही अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना
करण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
यांनी केलं आहे.
****
मुंबईत कांजूरमार्ग इथं सुरू केलेलं मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीएला दिले आहेत.
आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या ठिकाणचा भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यासह
जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. राज्य सरकारनं मेट्रो ३ ची कारशेड आरेतून कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय घेताच
केंद्र सरकारनं कांजूरमार्गच्या या जागेवर मालकी हक्क दाखवला होता. एका बांधकाम व्यावसायिकानेही
ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली असून, एमएमआरडीएने
मेट्रो कारशेडसाठी सुरू केलेलं खोदकाम तत्काळ थांबवण्याची सूचना मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी
मिलिंद बोरिकर यांना पाठवली होती.
****
केंद्र सरकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात योग्यरित्या राबवल्या जात नसल्याची टीका
विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत भारतीय
जनता युवा मोर्चाच्या आत्मनिर्भर कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत
देशात महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. फेरीवाल्यांसाठी
केंद्रशासनाची चांगली योजनाही राज्यात योग्य प्रकारे राबवली जात नसल्याचं ते म्हणाले.
केंद्राच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना
केलं.
****
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदी भाषेत चित्रपटविषयक
पुस्तक लेखनाकरता शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी मधील
कला, कलात्मकता आणि अभ्यास या संकल्पनेवर हिंदीतून पुस्तक लिहु इच्छिणाऱ्यांनी संस्थेशी
संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या अंतर्गत जास्तीतजास्त तीन जणांना दरमहा
पन्नास हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती एका वर्षाकरता दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीकरता
निवड झालेल्या उमेदवारांना निरीक्षण समितीसमोर आपल्या पुस्तकाचं सादरीकरणा करावं लागणार
आहे.
****
सुधारित कृषी कायद्यांबाबत तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास, महाराष्ट्रातूनही आंदोलनाचा
इशारा अखिल भारतीय किसान सभेनं दिला आहे. संघटनेचे सरचिटणीस अजित नवले यांनी पुण्यात
पत्रकारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र
सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप नवले यांनी केला.
****
दरम्यान, सुधारित कृषी कायद्यांबाबत आंदोलक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचना
स्वीकारण्यास तयार असल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये
विश्वास निर्माण करण्यात यश मिळेल, अशी आशाही सरकारनं व्यक्त केली आहे. केंद्रीय परिवहन
मंत्री नीतीन गडकरी यांनीही हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं, सांगितलं आहे.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज एका ६० वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या एक हजार
१७८ झाली आहे. घाटी रुग्णालयात आज १० नवे कोविड बाधित रुग्ण
दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या आता ४४ हजार ५३३ झाली आहे. दरम्यान, सहा जणांना आज उपचारानंतर बरे झाल्यानं
सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत
या संसर्गातून बरे झालेल्या
रुग्णांची संख्या ४२ हजार ८५८ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची
एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार, ८०७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या
४६ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार २०४ रुग्ण या आजारातून
बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्हा परिषदेने ६३ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. मुख्य
कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज याबाबतची नियुक्तीपत्रं या सर्वांना
प्रदान केली. यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार पशुधन पर्यवेक्षक- १, स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक- १, अंगणवाडी पर्यवेक्षीका- २, वरिष्ठ सहाय्यक लेखा- ४, आरोग्य सहाय्यक पुरुष- १४,
ग्रामसेवक - ५ तर ३६ परिचरांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
मंगाराणी अंबुलगेकर तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपलब्ध
तसंच भरतीयोग्य जागांची यादी, उमेदवारांची शैक्षणिक अर्हता
तसंच ज्येष्ठता यादी तपासून या नियुक्तीचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं
लव्ह औरंगाबाद अभियानांतर्गत घेतलेल्या छायाचित्रण स्पर्धेचा निकाल जाहीर
झाला आहे. प्रथम पुरस्कार डॉ. अजिंक्य मिस्त्री यांनी पटकावला असून,
दुसरा पुरस्कार संतोष राखेमल्लू यांनी तर तिसरा पुरस्कार करिष्मा साहुजी यांनी पटकावला
आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या छायात्रिकारांना मनपा स्वच्छता कर्मचारी
सफाई काम करताना, किंवा स्वच्छतेशी संबंधित कोणतेही काम करतानाचं छायाचित्र काढणं
आवश्यक होतं. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन तसंच नागरीकांमध्ये
स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या
दुसऱ्या टप्प्यातला हा एकोणिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना उद्या ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ
वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****////****
No comments:
Post a Comment