Saturday, 12 December 2020

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

** शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा निर्णय अन्यायकारक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची टीका

** पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आज राज्यभरात आंदोलन

आणि

** वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक शांतितीर्थ स्वामी यांचं निधन; उद्या अंत्यसंस्कार

****

महाविकास आघाडी सरकार योजनांचं फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पाणी पुरवठा योजनेसह विविध चार विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते. एक हजार ६८०कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना २०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या ३३ लाख गृहीत धरुन तयार केली जात आहे. या योजनेच्या कोनशिलेचं अनावरण आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती वन आणि स्मारक, शहरालगत मिटमिटा परिसरात सफारी पार्क, तसंच औरंगाबाद शहरातल्या १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केली असल्याचं सांगितलं.

 

प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो. पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सकाळीच मी सूचना देऊन आलेलो आहे या शहराच्या गुंठेवारी बाबतीमध्ये आणि तो ही प्रश्न लवकरात लवकर सोडवल्याशिवाय राहणार नाही. मग गुंठेवारीचा प्रश्न असेल सिडकोतल्या घरांचा प्रश्न असेल मालकी हक्काचा प्रश्न असेल सूचना दिलेल्या आहेत.

 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या या समारंभाला राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पाणीपुरवठा योजनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

****

माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमधल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा राज्य शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं केली आहे. या निर्णयाचा सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत असल्याचं, संघटनेचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी म्हटलं आहे.

मान्यताप्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित शाळांमधले नाईक, पहारेकरी, रात्रीचे पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील, असं शिक्षण विभागानं आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.

हा शासन निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणे अपेक्षित होतं, असं खांडेकर यांनी म्हटलं आहे.

****

कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेनं काम केल्यास यश निश्चित मिळतं, सं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात वाघोली इथं लेक्सिकॉन कॅम्पसमध्ये पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते द लेक्सिकॉन लिडरशीप ॲवार्ड’ प्रदान करून सन्मान करण्यात आला.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद इथल्या सामाजिक कार्यकर्त्या स्मिता भोगले यांनी केलं आहे. 

   ****

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यत रक्तदान शिबीरांच आयोजन करण्यात आलं. यामध्ये जिल्हाभरातून अनेक तरुणांनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही रक्तदान शिबीर, फळवाटप आणि इतर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून पवार यांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत स्वनिधी योजनेअंतर्गत आज धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा शहरात भाजीपाला विकणाऱ्या ३७५ विक्रेत्यांना अर्थसहाय्याचं वाटप करण्यात आलं. माजी मंत्री जयकुमार रावल यांचे हस्ते या विक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये वितरीत करण्यात आले. 

****

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज राज्यभरात शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं करण्यात आलं

नंदुरबार आणि शहादा शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाड्यांना धक्का मारून चालवत दरवाढीचा प्रतिकात्मक निषेध केला. धुळ्यातही शिवसेनेच्या वतीनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं.

सोलापुरात सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

यवतमाळ शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन या दरवाढीविरोधात निदर्शनं केली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत कथित आक्षेपार्ह विधानाबाबत रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिक आणि पोलिसात यावेळी झटापट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलडाण्यातही जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवं, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं शिवसेना शाखेच्या वतीनं पेट्रोल दरवाढ विरोधात निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा या सर्वच ठिकाणी निषेध करण्यात आला.

****

अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक, शांतितीर्थ संगय्या स्वामी चाकूरकर यांचं आज पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं रेणुका विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी यांनी कपिलधार मासिकाचे संपादक म्हणून काम करतानाच, वीरशैव साहित्यातली असंख्य हस्तलिखितं, पोथ्या, पुस्तिका, ओव्या, अभंग, आरत्या, पदं तसंच भारूडांचा मोठा संग्रह केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वाराणसी इथं झालेल्या चौथ्या वीरशैव साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं, त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना काशी महापीठाचा डॉ चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी लातूर जिल्ह्यात चाकूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज एका कोविबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३३३ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ९७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बार हजार ९५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथं आज एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज सहा नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार २५६ झाली आहे. पाच जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आल्यानं जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ३७४ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत.

****

धुळे जिल्ह्यात आज नवे १८, सिंधुदूर्ग जिल्ह्यात २६, तर गडचिरोली जिल्ह्यात आज नवे ३५ कोविडग्रस्त आढळले.

//*************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...