Wednesday, 2 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एका स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी काल सरासरी ६९ टक्के मतदान; औरंगाबाद पदवीधर मतदार संघात ६४ टक्के मतदानाची नोंद.

·      जलयुक्त शिवार अभियानाच्या खुल्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन.

·      लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची संख्यामर्यादा इतर कार्यक्रमांना लागू होऊ शकत नाही - मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट.

·      कोविड लसीकरणाच्या टप्य्यानुसारच प्रत्येकाला लस दिली जाणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे.

·      राज्यात काल चार हजार ९३० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल सात रुग्णांचा मृत्यू तर नव्या ३६६ रुग्णांची नोंद.

·      निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव.

आणि

·      नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून एकदिवसआड सुरु होणार.

****

विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी काल सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ६१ पूर्णांक आठ दशांश टक्के, पुणे पदवीधर ५० पूर्णांक ३० शतांश, नागपूर पदवीधर ५४ पूर्णांक ७६ शतांश, अमरावती शिक्षक मतदारसंघ सुमारे ८३ टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ ७० पूर्णांक ४४ शतांश तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तब्बल ९९ पूर्णांक ३१ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.

 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली, या मतदार संघातल्या ३५ उमेदवारांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालं. विभागात काल सरासरी ६४ पूर्णांक ४९ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात विभागात सर्वाधिक ६७ पूर्णांक ६४ शतांश टक्के मतदान झालं, तर बीड जिल्ह्यात सर्वात कमी ६२ टक्के मतदान झालं. औरंगाबाद ६३ पूर्णांक ५ दशांश टक्के, हिंगोली जिल्ह्यात ६५ पूर्णांक ५८ शतांश टक्के, जालना ६६ पूर्णांक ५४ शतांश टक्के, नांदेड ६४ पूर्णांक ७ दशांश टक्के, लातूर ६६ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सुमारे ६७ टक्के, मतदानाची नोंद झाली. मतमोजणी उद्या तीन तारखेला होणार आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह विद्यापीठातले संवैधानिक अधिकारी, पदाधिकारी यांनी, औरंगाबाद शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. प्र-कुलगुरु डॉ.शाम शिरसाट यांनी फुलंब्री इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रावर मतदान केलं.

औरंगाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयात तसंच महानगरपालिकेच्या कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल १२ रुग्णांनी, पीपीई कीट घालून मतदानाचा हक्क बजावला. या रुग्णांना सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान मतदानासाठी पाठवण्याचे निर्देश होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

****

राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली, समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय नियंत्रक आणि लेखा परीक्षक कॅगच्या अहवालात नमूद सहा जिल्ह्यातल्या १२० गावांमधल्या, एक हजार १२८ कामांपैकी कोणत्या कामाची खुली चौकशी, तर कोणत्या कामात प्रशासकीय किंवा विभागीय चौकशी करावी, याची शिफारस ही समिती करेल, त्याशिवाय समितीला आवश्यक वाटेल अशा अन्य कामांच्या चौकशीची शिफारसही ही समिती करणार आहे. समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असून, दर महिन्याला शासनाला अहवाल सादर करणं आवश्यक आहे.

****

राज्यातले कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, उलट इतर राज्यातले उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स - आय एम सीच्या वेब माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचं तसंच डिजीटल आर्ट, या डिजीटल प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. सरकार आणि उद्योजकांना एकत्रितपणे काम करताना मिशन एंगेज महाराष्ट्र हे अभियान उपयुक्त ठरेल, या अभियानातून उद्योजकांना महाराष्ट्राचा चेहरा म्हणूनही काम करता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

नागरिकांनी रक्तदानासाठी स्वयंस्फुर्तीनं पुढे यावं असं आवाहन, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. डॉ शिंगणे यांनी काल मुंबई तसंच ठाणे इथल्या रक्तपेढीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. टाळेबंदी उघडल्यानंतर आता नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे, तसंच थॅलेसेमिया, कर्करुग्णांसाठी सुद्धा नियमित रक्ताची गरज भासत असल्याचं, डॉ शिंगणे यांनी सांगितलं.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. लातूरचे अपर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचं तसंच वारंवार साबणानं हात धुण्याचं आवाहन केलं आहे.

****

लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची संख्यामर्यादा इतर कार्यक्रमांना लागू होऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या दोन कार्यक्रमांप्रमाणे इतरही छोट्या - मोठ्या कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्यामर्यादा निश्चित करण्याची मागणी, एका याचिकेद्वारे करण्यात आली होती, काल त्यावरच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या पीठानं, ही बाब स्पष्ट केली. प्रत्येक छोट्या - मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि कार्यक्रमस्थळाची क्षमता लक्षात घेऊन, उपस्थितांच्या संख्येला परवानगी देणं योग्य असल्याचं, न्यायालयानं सांगितलं आहे.

****

मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी, येत्या पाच डिसेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भटके विमुक्त तथा १२ बलुतेदारांना क्रिमिलिअर संज्ञेमधून वगळावं, अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्तांना बढतीत आरक्षण द्यावं, १२ बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावं, यासह अनेक प्रलंबित मागण्यांबाबत सरकारनं चार डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा राठोड यांनी दिला आहे.

****

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी, रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून उर्मिला मातोंडकर यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, उर्मिला मातोंडकर यांनी, महाविकास आघाडी सरकारचं काम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलं.

****

ठाण्यातल्या प्रसिद्ध मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी उपाहारगृहाचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचं काल निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात कोविडची लागण झाल्यापासून त्यांच्यावर ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल सकाळी त्यांचं निधन झालं.

****

कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल, प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्य्यानुसारच लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशातल्या पाच कंपन्यांकडून कोविड लस निर्मितीसाठी काम सुरु असून, लस आल्यानंतर ती कशा पद्धतीनं द्यायची याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पोलीस आणि विविध आजार असलेल्या नागरिकांना देण्याचं नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले –

वॅक्सिनेशन करण्यासाठीचं एक फार मोठं मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना येत आहेत. आणि त्यामध्ये टारगेटेड पहिलं जे आहे ते डॉक्टरर्स आणि पोलीस विभाग त्याचबरोबर आम्हाला जे सांगितलं आहे ते पन्नास वर्षांचे वरचे को-मॉरबीड असलेली पॉप्यूलेशन आणि नंतर मग सिनीअर सिटीझन्स क्रमवारीनं हा सगळा डेटा तयार करण्याचं काम आमच्याकडून सध्या सुरु आहे.

****

राज्यात काल चार हजार ९३० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. राज्यभरात काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार २९० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४९ शतांश टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात ८९ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३६६ रुग्णांची नोंद झाली.

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ९५ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, बीड जिल्ह्यात ७३, जालना जिल्ह्यात ६८, लातूर ४८, उस्मानाबाद ३६, नांदेड २३, परभणी १८, तर हिंगोली जिल्ह्यात १५ नवीन रुग्णांची नोंद झाली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना, निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्या प्रकरणी निलंबित करण्याचा प्रस्ताव, तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. कोठीकर यांची शहरी भागाकरता मुख्य आचारसंहिता तसंच कायदा सुव्यवस्था पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते गैरहजर असल्याचं दिसून आलं. कोठीकर हे मागील चार दिवसांपासून विनापरवानगी गैरहजर असल्यानं, त्यांना तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी, असं तहसीलदार शेवाळे यांनी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

****

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथले मतदार विजय भास्कर कुरुद यांनी, मतदान करतानाची चित्रफीत सामाजिक संपर्क माध्यमावर प्रदर्शित केल्याप्रकरणी, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही माहिती दिली.

****

परभणी जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करून, त्यांच्या ताब्यातून दोनशे रुपये दर्शनी मूल्याच्या ४८ नोटा जप्त केल्या. दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव सुक्रे इथं सोमवारी रात्री केलेल्या कार वाईत तीन जणांना तर माजलगाव इथून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, यापैकी एकजण अल्पवयीन असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडच्या महापौर मोहिनी येवणकर यांनी केलं आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून एकदिवसआड सुरु होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा वाहतूक समिती, कोरोना प्रतिबंधक समिती, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य केंद्र या यंत्रणांच्या समन्वयातून योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात लोदगा इथल्या अलमॅक टिशू कल्चर लॅबला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मान्यता दिली आहे. या प्रयोगशाळेत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनात बांबूच्या वेगवेगळ्या पाच जातींची रोपं तयार केली जात आहेत. बांबूची रोपं तयार करणारी ही देशातील नववी तर मराठवाड्यातली पहिलीच अधिकृत टिशू कल्चर प्रयोगशाळा आहे.

****

'जागतिक एड्स निर्मुलन' दिनानिमित्त काल विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं, जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात आले. उस्मानाबाद इथं विवेकानंद युवा मंडळातर्फे शासकीय रुग्णालयांत माहिती पत्रकं तसंच भित्तीपत्रकं वाटून नागरिकांमध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात आली.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस पुढचे दोन दिवस अंशत: रद्द करण्यात आली आहे. नांदेडहून अमृतसरला जाणारी गाडी आज दिल्ली ते अमृतसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे, परवा चार तारखेला ही गाडी अमृतसर ते दिल्लीदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

****

No comments: