Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण
सलग तिसऱ्यांदा विजयी; नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर; धुळ्यात भाजपचे
अमरीश पटेल यांचा विजय.
·
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ तारखेला
मुंबईत.
·
सरकार अधिवेशनात चर्चेपासून पळ काढत असल्याची देवेंद्र फडणवीस
यांची टीका.
·
पंजाबमधल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात काँग्रेससह विविध संघटनांची
निदर्शनं.
·
राज्यात पाच हजार १८२ नव्या कोविडग्रस्तांची नोंद; मराठवाड्यात
नऊ रुग्णांचा मृत्यू तर नवे ३१४ रुग्ण.
आणि
·
सोलापूर जिल्हा परिषदेतले शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की
फाऊंडेशनचा शिक्षक पुरस्कार जाहीर.
****
औरंगाबाद
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा
विजयी झाले. काल सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया आज पहाटेच्या सुमारास पूर्ण
झाल्यावर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा निकाल
जाहीर करत, चव्हाण यांना निवडीबाबतचं प्रमाणपत्र प्रदान केलं. या निवडणुकीत एकूण २
लाख ४१ हजार ९०८ इतकं मतदान झालं होतं, त्यापैकी
२३ हजार ९२ मतं अवैध ठरली. वैध ठरलेल्या २ लाख १८ हजार ८१६ मतांपैकी सतीश चव्हाण यांना
१ लाख १६ हजार ६३८ मतं मिळाली. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतं
मिळाली.
नागपूर
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कोणताही उमेदवार विजयी होण्यासाठीची आवश्यक मतं, पाचव्या
फेरीअखेरही पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आता पहाटेपासून दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्यास
प्रारंभ झाला आहे. पाचव्या फेरीअखेर वैध ठरलेल्या एकूण १ लाख २१ हजार ४९३ मतांपैकी
काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ५५ हजार ९४७, तर भाजपचे संदीप जोशी यांना ४१ हजार ५४०
मतं मिळाली आहेत. ११ हजार ५६० मतं अवैध ठरली आहेत.
धुळे-नंदुरबार
स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांना ३३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित
पाटील यांना ९८ मतं मिळाली.
****
जनतेच्या
विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारनं वर्षपूर्ती केली असून,
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं
तयार केलेल्या, “महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात
मुख्यमंत्री बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह
मंत्रिमंडळातले सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन, सर्व मंत्र्यांचं
सहकार्य आणि जनतेचा विश्वास लाभल्यानं, गेल्या वर्षभरात समर्थपणे काम करता आलं, असं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्य
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ तारखेला मुंबईत होणार आहे. याआधी हे अधिवेशन
येत्या सात तारखेपासून नागपूर इथं होणार होतं. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर, हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनासाठी
येणाऱ्या दोन्ही सभागृहांतल्या आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातल्या अधिकारी-कर्मचारी,
सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची, १२ आणि १३ डिसेंबरला विधानभवन परिसरात संसर्ग
तपासणीसाठी तत्काळ चाचणी करण्यात येणार असून, संसर्ग असलेल्यांना विधानभवनात प्रवेश
दिला जाणार नाही. विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, यांच्या प्रमुख उपस्थितीत काल आढावा बैठक घेण्यात आली,
त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
****
राज्यभरात
सगळे व्यवहार सुरू होत असताना, विधिमंडळाच्या अधिवेशनावर निर्बंध आणणं योग्य नसल्याचं,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत विधिमंडळ
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. अतिवृष्टी, चक्रीवादळ, मराठा आरक्षण,
यासह अनेक मुद्यांवर विधिमंडळात चर्चा होण्याची, तसंच या मुद्यांवर सरकारचं धोरण स्पष्ट
होण्याची गरज असल्याचं, फडणवीस म्हणाले. मात्र सरकारनं पुन्हा एकदा अधिवेशन पुढे ढकललं,
आणि दोन आठवड्यांचं अधिवेशन घेणं आवश्यक असताना, फक्त दोन दिवसाचं अधिवेशन घेणं, ही
गंभीर बाब असून, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. पुढचं,
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
****
अखिल
भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी, काल पुणे इथं ओबीसी आरक्षण बचाओचा
नारा देत, ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर,
आंदोलकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं. इतर समाजांना
आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला विरोध केला जाईल,
असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी दिला.
****
राज्यातली
उच्च न्यायालय आणि त्यांची खंडपीठं, जिल्हा न्यायालयं, सर्व न्यायधीकरणं आणि तालुका
न्यायालयांच्या ठिकाणी, येत्या बारा तारखेला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात
येणार आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नामवंत
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गापूर्वी दरमहा सुमारे ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन
महामंडळाला संसर्ग काळात दररोज सरासरी २२ कोटी रुपये, याप्रमाणे सुमारे ३ हजार कोटी
रुपये महसूल गमवावा लागल्याची माहिती, परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष
अनिल परब यांनी दिली. ते काल महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत
होते. हा तोटा भरून काढण्यासाठी भविष्यात सुमारे ३ हजार मालवाहू वाहनं तयार करण्यासाठी
प्रयत्न केले जावेत, टायर पुनःस्थिरीकरण प्रकल्पाचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीनं
विस्तार करण्यात यावा, इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्यातून, मार्च २०२१ पर्यंत किमान
पाच पेट्रोल पंप सर्व सामान्य जनतेच्या वापरासाठी राज्य परिवहन महामंडळानं प्रत्यक्ष
संचालित करावेत, अशा सूचना मंत्री परब यांनी यावेळी केल्या.
****
महाराष्ट्र
राज्य विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागातर्फे, राज्यात
‘ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत येत्या ३१ तारखेपर्यंत मुलांचे आश्रम
गृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, रस्त्यावर भीक मागणारी आणि कचरा
गोळा करणारी मुलं, धार्मिक स्थळं, रुग्णालयं, उपाहारगृहं, दुकानं आदी ठिकाणी काम करणारी
मुलं, हरवलेली मुलं यासर्वांचं छायाचित्र घेऊन त्यांची माहिती प्रसारित केली जाणार
आहे.
****
‘एमडीएच’
मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९८ वर्षांचे
होते. गुलाटी यांची ‘महाशियां दी हट्टी’ म्हणजेच एमडीएच ही कंपनी, ही मसाल्याच्या पदार्थांचे
उत्पादन करणारी देशातली आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक
कमाईतला ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान म्हणून देत. गुलाटी यांना
भारत सरकारनं २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी गुलाटी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
केंद्र
सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु
असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली
चर्चा केली, आणखी काही मुद्यांवर पुढे चर्चा केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून
सांगण्यात आलं.
दरम्यान,
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी
आंदोलनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर हिंगोली शहरामध्ये महात्मा
गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. लातूर शहरात काँग्रेस
पक्षाच्या वतीनं महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. धुळे, जळगाव, बुलडाणा,
नाशिक, मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान,
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी या कृषी
कायद्यांचा विरोध आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपला पद्मविभूषण पुरस्कार काल
परत केला.
****
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला मुंबईत दादरमधल्या चैत्यभूमीवरुन
ऑनलाईन अभिवादनाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिका करत आहे. त्याचबरोबर इतर आवश्यक
व्यवस्थाही महापालिका करत आहेत. या अनुषंगानं अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल
यांनी काल चैत्यभूमी आणि परिसराची पाहणी केली.
****
मालेगाव
बॉम्बस्फोट खटल्याची पुढची सुनावणी येत्या १९ तारखेला होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींनी
न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश मुंबईतल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं
दिले आहेत. काल या प्रकरणातल्या ७ आरोपींपैकी कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी
आणि अजय राहीलकर हे तिघे न्यायालयात हजर होते, याची दखल घेत न्यायालयानं सर्व आरोपींना
व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राज्यात
काल पाच हजार १८२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ३७ हजार ३५८ झाली आहे. राज्यभरात काल ११५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४७ हजार ४७२ झाली आहे.
तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के एवढा आहे. काल आठ हजार ६६ रुग्ण बरे
झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ३ हजार २७४ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ७ दशांश टक्के एवढा झाला आहे.
सध्या राज्यात ८५ हजार ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३१४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद
आणि जालना इथं काल प्रत्येकी तीन, तर बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी
एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल नव्या ८४ रुग्णांची नोंद झाली, लातूर जिल्ह्यात ५३, नांदेड ४९, बीड ४५,
उस्मानाबाद ३३, परभणी २४, जालना १६, तर हिंगोली जिल्ह्यात काल १० रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान,
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर काल दिल्लीहून आलेल्या २०९ प्रवाशांची तर विमानतळावर ६०
प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत ३१ डिसेंबर पर्यंत रात्री १० ते सकाळी
५ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता इतर नागरिकांना बाहेर फिरण्यावर निर्बंध
घालण्यात आले आहेत. विवाह समारंभासाठी जास्तीत जास्त ५० तसंच अंत्यसंस्कार विधीसाठी
२० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
****
सोलापूर
जिल्हा परिषदेतले प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा
जागतिक शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे तसंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डिसले यांचं अभिनंदन केलं आहे.
डिसले यांनी क्युआर कोडच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील
१२ हजार शिक्षकांतून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्काराची ७ कोटी
रुपये रक्कम इतर देशातली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसंच टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरणार
असल्याचं डिसले यांनी सांगितलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिम
इथले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी केलं आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना
आज कॅनबेरा इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सामना
सुरू होईल. टी-ट्वेंटी मालिकेनंतर चार कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यात होणार आहे.
****
जागतिक
दिव्यांग दिनानिमित्त काल उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग आघाडीतर्फे
जिल्ह्यातल्या दिव्यांग उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तर तुळजापूर
नगर परिषदेच्या वतीने काल ३८ दिव्यांगांना प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान वाटप करण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment