Monday, 7 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं उद्या पुकारलेल्या भारत बंदला राजकीय पक्षांसह अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या बंदला सक्रीय पाठिंबा दिला आहे.

राज्यातल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे माथाडी कामगार आणि व्यापारी शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात सामील होणार आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस, माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आणि व्यापारी असोसिएशनने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

शेतकरी कामगार पक्षानंही या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शेतकर्‍यांच्या या बंदमध्ये देशातील जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.

****

दरम्यान, शेतकरी संघटना या बंद मध्ये संहभागी होणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितलं. नविन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये, असं आवाहन घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे नविन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील पन्नास वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार ना‍ही, असं ते म्हणाले.

****

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, दिव्यांग सैनिक आणि हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात मदत करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या सैनिकांचं शौर्य आणि देशभक्तीसाठी त्यांना सदैव नमन केलं पाहिजे, असं उपराष्ट्रपतींनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

देशाचा कोविड १९ रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९४ पूर्णांक ३७ शंतांश टक्के झाला आहे. काल सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक होती. काल दिवसभरात ३९ हजार १०९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत ९१ लाख ३९ हजार ९०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ३२ हजार ९८१ नवे रुग्ण आढळले असून, ३९१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ९६ लाख ७७ हजार २०३ झाली आहे. तर मृतांचा एकूण आकडा एक लाख ४० हजार ५७३ झाला आहे. देशात सध्या तीन लाख ९६ हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल आठ लाख एक हजार ८१ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत १४ कोटी ७७ लाख ८७ हजार ६५६ चाचण्या करणयात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.   

****

केंद्र सरकार चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीनुसार धानाची खरेदी करत आहेत. महाराष्ट्रासह १४ राज्यांमध्ये धान खरेदी योग्य रितीने सुरु असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० पूर्णांक २७ शतांश टक्के अधिक धानाची खरेदी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

****

आयुष निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात संवर्धन परिषद स्थापन करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या आयुष व्यापार आणि उद्योग यांच्या संयुक्त आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतात आणि जगभरात वाढत असलेल्या मागण्यांसाठी आयुष क्षेत्रातले उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रानं आपल्याला अधिक वेगाने उंचावण्याची आवश्यकता आहे, असं आयुष मंत्री नाईक यावेळी म्हणाले.

****

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीनं येत्या १२ आणि १३ डिसेंबरला राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांसाठी ७० हजार रिक्त पदं उपलब्ध आहेत. राज्यातले उद्योग, व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत, त्यामुळे रोजगाराच्या या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महा स्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट होत आहे. नांदेड जिल्ह्यात आज १३ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे शहरात पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. काल रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ तलवारी आणि एक चॉपर ताब्यात घेतलं. मालेगावातून हा शस्त्र साठा धुळ्यात अवैधपणे विक्रीसाठी आणला गेला होता अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी सांगितलं. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 19 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 19 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...