Tuesday, 23 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक २३ मार्च २०२१

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २३ मार्च २०२१

****

स्वातंत्र्य सेनानी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतमातेच्या या वीर पुत्रांचं बलिदान प्रत्येक पीढीसाठी प्रेरणादायी असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

विमा सुधारणा विधेयक २०२१ काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विमा कंपन्यामधली थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतूद या विधेयकात आहे. विमा कंपन्यांची मालकी आणि नियंत्रणावर सध्या लागू असलेले निर्बध हटवण्याचीतरतूदही याविधेयकामध्ये आहे.

****

उस्मानाबाद इथं मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाउस झाला. या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान होत आहे. नांदेड जिल्ह्यातही आज पहाटे पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसानं ७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गारपिटीमुळं कांदा, मका, गहू तसंच फळपिकांच मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील एकूण २०९ गावं बाधित झाली आहे.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सात जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित १४ जागांसाठी रविवारी मतदान झालं होतं.

****

लातूर जिल्ह्याऔसा तालुक्यातल्या बोरफळ आणि किल्लारी इथं काल शेत आणि पाणंद रस्ते कामाचा शुभारंभ झाला. आमदार अभिमन्यू पवार यांच्या या शेत आणि पाणंद रस्ते कामाला भारतीय जैन संघटनेची मदत मिळाली आहे. संघटनेच्या मदतीनं टप्प्या टप्प्यानं प्रत्येक गावाला साधनसामुग्री उपलब्ध होणार असून या कामाला आणखी वेग येणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं.

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...