Monday, 22 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

****

आयुष्याच्या अर्थव्यवस्थेसाठी पाण्याचं संवर्धन आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्तानं जलशक्ती अभियान - कॅच द रेन या अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला, त्यावेळी ते बोलत होते. पाण्याची बचत करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून, येणाऱ्या पिढीसाठी पाणी वाचवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. जलपुनर्भरण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, असं पंतप्रधान म्हणाले. “पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय” या संकल्पनेसह हे अभियान देशभरात राबवलं जाईल. याची अंमलबजावणी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीत म्हणजे २२ मार्च २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत होईल.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देसमुख यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. या मुद्यावरुन शिवसेना आणि भारतीय पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप खासदारांनी केली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहीली नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप खासदार गिरीष बापट यांनी केली.  

खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस तुरुंगात राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं, असा प्रश्न राणा यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप खासदार राकेश सिंह यांनी केली.

राज्यसभेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात, हे सगळ्या देशाने पाहिलं असल्याचं ते म्हणाले. शिवसेना खासदारांनी परमबीर सिंग यांची चौकशी करण्याची मागणी केली. यामुळे सदनात गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. 

****

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरचे आरोप खोटे असून, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. परमबीरसिंग यांचं पत्र हे तपासाची दिशा बदलण्यासाठी असल्याचं सांगून पवार यांनी, त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. अनिल देशमुख यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानं फेब्रुवारी महिन्यात ते वाझे यांना भेटलेच नाही, असा दाखला त्यांनी दिला. मूळ मुद्दा हा परमबीर यांचं पत्र नसून, स्फोटकं ठेवली हे प्रकरण असल्याचं, पवार यांनी नमूद केलं.  

****

दरम्यान, १५ फेब्रुवारीला देशमुख विलगीकरणात होते, तर त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली, असा प्रश्न भारतीय जनता पक्षानं उपस्थित केला आहे. देशमुख यांना अटक करण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे, ते आज माध्यमांशी बोलत होते.

****

जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात मनिहाल क्षेत्रात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली, त्यादरम्यान ही चकमक झाली.

****

देशात काल नव्या ४६ हजार ९५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २१२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी १६ लाख ४६ हजार ८१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५९ हजार ९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २१ हजार १८० रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी ११ लाख ५१ हजार ४६८ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन लाख ३४ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत चार कोटी ५० लाख ६५ हजार ९९८ नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.  

****

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमावलीचं कठोरपणे पालन करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी जलद अँटीजेन चाचण्या सुरु करण्याची शिफारस राज्यस्तरीय कृती गटानं केली आहे. संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, तर राज्य सरकारने काही निर्णयांची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, विशेषतः कोरोनाविषयक नियमावलीचा सार्वजनिक ठिकाणी भंग करणाऱ्यांना कोणतीही सूट देता कामा नये, असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे. गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध लागू करतानाच, या गर्दीतील लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणे आवश्यक असून, त्यामुळे संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवताना जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरु करून, समाजाच्या सर्व गटातल्या लोकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज, कृती गटानं अधोरेखित केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं कृती गटानं नमूद केलं आहे.

//*******//

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...